शब्दांकित-गुलकंद-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 09:08:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "शब्दांकित"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "शब्दांकित" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गुलकंद"

माझ्या दृष्टीने विचारांचे ३ प्रकार पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि शब्दातीत. अशा विचारांना शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न!

                                       गुलकंद
            गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०--लेख क्रमांक-१--
           ----------------------------------------------------

     आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची एक वेगळीच excitement असते. तशी ती मधुश्रीलाही होती. मधुश्री अरविंद आपटे, दिसायला गोरीपान आणि अतिशय देखणी. दहावीत ८५% मिळवून, नावाजलेल्या डी. एम. कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला होता. खूप चांगला अभ्यास करून तिला बाबांसारखं इंजिनिअर व्हायचं होतं.
 
     अकरावीच्या वर्गात, काही शाळेतल्या मैत्रिणीही बरोबर होत्या. मधुश्री, आश्लेषा आणि मिताली, तिघी शाळेत तश्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या पण कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप झाला. तिघीही सुस्वरूप. कॉलेजमध्ये त्यांना बार्बी ग्रुप म्हणून नाव पडलं होतं. तिघी मिळून रोज सायकलवरून कॉलेजला जात. कॉलेजमध्ये मुलींसाठीचा पार्किंग लॉट वेगळा होता.   

     कॉलेज सुरु होऊन ६ महिने लोटले. आजचा कॉलेजचा दिवस इतर दिवसांसारखाच. आज फिजिक्सचं practical होतं. Practical झाल्यावर तिघी सायकल stand कडे चालत चालल्या. आज सायकल शोधायला फार कष्ट पडणार नव्हते. बराचसा कॉलेज लेक्चर्स संपवून घरी गेलं होतं. काही मोजक्याच सायकली पार्किंग लॉटमध्ये उरल्या होत्या. मधू, आशू आणि मितू तिघींना आज पार्किंग ला जवळ जवळच जागा मिळाली होती.  तिघी आपापल्या सायकलींपाशी पोहोचल्या. सायकलच्या पुढच्या बास्केटमध्ये sac ठेवताना मधूला काहीतरी दिसलं. तिच्या बास्केटमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं. अरे बापरे गुलाबाची फुलं? खाली चिठ्ठीही होती. तिने आशू आणि मितूला हाक मारली, "हे बघा ना काय आहे?"
"आं??" -आशू
"कोणी ठेवलं?" -मितू.
"आता मला काय माहित?.. काय करू मी?" -मधू.
"चिठ्ठीत काय आहे?" -आशू. मधूने चिठ्ठी उघडली.
"कविता आहे." -मधू.
"नाव आहे का?" -मितू.
"अनामी प्रेमिक म्हणून लिहिलंय. काय करू इथेच टाकून देऊ का?" – मधू.
"नको इथे नको." -आशू.
"अग घरी कशी नेऊ? आईला काय सांगू?" -मधू.
"चिठ्ठी आत्ता पुरती लपवून ठेव." -मितू.
"आणि फुलं?" -मधू.
"माझ्या बागेतली आहेत म्हणून सांग." -आशू. आशूचा मोठा बंगला होता. बंगल्याभोवती मोठी बाग होती. तिच्या नावावर हे खोटं बिनदिक्कत खपलं असतं.
"ओके". मधूला तेवढ्यापुरता तोडगा मिळाला होता.
"ए पण माझ्या बास्केट मध्ये का ठेवलं???.. तुमच्या दोघींपैकी कुणासाठी तर नसेल ठेवलेलं, चुकून माझ्या बास्केटमध्ये??..." मधूची उगाच शंका.
"परत ठेवलं तर बघू कुणाच्या बास्केट मध्ये आहे ते..." – आशू.

     घरी आल्यावर आईने मधूला विचारलंच फुलांबद्दल. "आशूच्या बागेत खूप फुलं आली होती. तिने दिली आहेत" असं मधूनं सांगितलं. आईशी खोटं बोलणं मधूला आवडलं नाही.
दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. सुदैवाने आज आईने काही विचारलं नाही. फुलं आशूच्या बागेतलीच असावीत असा समज तिने करून घेतला असावा. मधूला खोटं बोलायला लागलं नाही, ह्याचं समाधान होतं.

     पुढं हे वारंवार घडायला लागलं. दोनदा तीनदा आई म्हणलीही, "आशूच्या बागेत केवढी फुलं येतात ना?" एवढ्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्नही आईने परस्पर सोडवला होता. काही फुलं देवासाठी ठेऊन, उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा ती गुलकंद करत होती. गुलकंद फारच चांगला होत होता.

--संपदा म्हाळगी-आडकर
(जानेवारी 31, 2010)
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-शब्दांकित.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.