कविता पावसाच्या-कविता-त्रेचाळिसावी-पाऊस आला

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 08:30:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "कविता पावसाच्या"
                                     कविता-त्रेचाळिसावी 
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत. तसेच या ब्लॉग मध्ये मंगेश पाडगावकर यांच्या पाऊस कविता दिल्या गेल्या आहेत. या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या कविता माणसाला जगायला शिकवतात. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या पाऊस कविता खास तुमच्यासाठी...

                                     "पाऊस आला"
                                    --------------

पाऊस आला,
पाऊस आला,
पाऊस आला घरांवर,
पाऊस आला स्वरांवर,
पाऊस आला नाचणाऱ्या मोरांचा,
पाऊस आला

पाऊस आला वाऱ्याव्या श्वासाचा,
मातीच्या वासाचा,
हिरव्या हिरव्या ध्यासाचा;
करीत आला वेड्याचा बहाणा,
पाऊस आला आतून आतून शहाणा.

पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा, 
राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा,
पाऊस आला गोकुळातल्या माळावर,
पाऊस आला यशोदेव्या भाळावर,
पाऊस आला उनाडणारा गोवळा,
पाऊस आला पालवीसारखा कोवळा.

येथै येथै पाऊस आला,
तेथै तेथै पाऊस आला,
ताथै ताथै पाऊस आला.

फुलण्याचा उत्सव होऊन
पाऊस आला,
झुलण्याचा उत्सव होऊन
पाऊस आला.

पावसाने या जगण्याचा उत्सव केला,
पावसाने या मरण्याचा उत्सव केला.

जगणं आणि मरण,
बुडणे आणि तरणं,
यांच्या पल्याड कुठे तरी पाऊस आला.

पाऊस आला याद घेऊन,
ओली चिब साद घेऊन.

बाहेर जरी ढगातून पाऊस आला,
खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला,
पाऊस आला.

--मंगेश पाडगावकर
------------------

                      (साभार आणि सौजन्य-मराठी कविता.कॉम)
                     --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.