अभयदान-दादा-गिरी-अ

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:00:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "अभयदान"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अभय टिपणीस, यांच्या "अभयदान" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'दादा' गिरी"

                                'दादा' गिरी--अ
                               ---------------

     खरतर हा शब्द आपण लहानपणापासून सतत वापरत आलो आहोत. तुम्ही म्हणाल आता ह्या शब्दावर काय लिहायचे? अहो खूप काही आहे ह्या शब्दात! आजूबाजूला जरा नीट बघाल तर नक्की कळेल की मी काय म्हणतोय ते. आज दादागिरी आपल्याला सगळीकडेच बघायला मिळते. अहो अगदी डार्विन चा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो की ! 'सर्वैवल ऑफ दि फिटेस्ट' हाच तो सिद्धांत। आता फिटेस्ट म्हणजे कोण? डार्विनच्या मते कोणीही असो; माझ्या मते जो ताकदवान तो फिटेस्ट. मग आता पुढचा प्रश्न.... ताकदवान म्हणजे कोण? मनाने,शरीराने की पैशाने? आज ह्याच विषयावर जरा विचार करूया. अहो आपल्या लहानपणी "उगाच गावभर भटकतोस, जरा व्यायाम कर" असा प्रेमपूर्वक 'दम' रोज मिळायचा. "अरे शिकाला नाहीस ना तर मोलमजुरी करावी लागेल आणि त्यासाठी कमावलेले शरीर उपयोगी पडेल. जा व्यायाम कर लोळत पडण्यापेक्षा" अशी वाक्ये रोज घरोघरी ऐकू यायची. म्हणजे कमावलेले शरीर हे मोलमजुरी साठी उपयोगी पडते इथे पर्यंतच आपली झेप होती. कमावलेले शरीर हे कुस्ती सारखे मातीतले खेळ करण्यासाठीच असे मानणारा एक वर्ग होता (आणि आता ही आहे पण अतिशय कमी). अश्या पहिलवान लोकांना राजाश्रय सुद्धा मिळे. उदाहरण सांगायचे तर राजश्री शाहू महाराज! खरोखरी शरीराची ताकद ही सुखी आणि निरोगी जीवनाची किल्ली होती (आणि आजही आहे). तिचा (दूर)उपयोग दादागिरी साठी करावा इथपर्यंत विचार झालेला नव्हता.

     गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. शरीर कामायचे आणि त्या जोरावर दादागिरीचा 'पास' मिळवायचा हा एक उत्तम मार्ग अनेकांना समजलाय. अशी पहिलवान मंडळीना जसा पूर्वी मिळायचा तसा आज सुद्धा 'राजाश्रय' मिळतो. अर्थात दोन्ही मध्ये कमालीचा फरक आहे हे सांगायला नकोच. कडक स्टार्च केलेला सफेद कपड्यातील 'काळ्या' मनाची ही मंडळी कपाळावर मोठा टिळा लावून सभ्यतेचा खोटा बुरखा पांघरतात. आपल्या सारखे अनेक लोक ह्या पोसलेल्या 'पोळ' मंडळीना चांगले ओळखून असतो. पण 'राजाच्या' बैलाला अडविण्याचा गाढवपणा कोण करणार? आणि हीच आजची शरीराच्या ताकदीने सुरु असलेली 'दादा'गिरी!

--अभय टिपणीस
(सोमवार, २८ मार्च, २०११)
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-अभयदान.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.