अभयदान-दादा-गिरी-ब

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:03:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "अभयदान"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अभय टिपणीस, यांच्या "अभयदान" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'दादा' गिरी"

                               'दादा' गिरी--ब
                               --------------

     पैशाच्या जोरावर सुरु असलेली दादागिरी ह्या विषयावर ग्रंथ लिहिता येईल. आणि ह्या प्रकारच्या दादागिरीला इतिहास सुद्धा आहे. जनतेची पिळवणूक करणारे राजे, गरिबांना लुटणारे सावकार ते भांडवलशाहीच्या मुलतत्वापर्यंत ह्याची पाळेमुळे खोल रुतली आहेत. त्यांचा परामर्श घ्यायला वेगळेच व्यासपीठ लागेल. रोजच्या जीवनातील उदाहरणे सुद्धा खूप आहेत.जागतिक स्तरावर सुद्धा आपण ह्याचे परिणाम पाहतो. इराण वर लादलेली आर्थिक नाकेबंदी असो किंवा भारतावर अमेरिकेने घातलेला आर्थिक बहिष्कार असो. पैशाच्या जोरावरची दादागिरी अगदी जागतिक पातळीवर सुद्धा चालू आहे आणि त्या मागे अमेरिका, ब्रिटन सारखे 'जागतिक गुंड' आहेत हे कोणीही सांगेल. मनाच्या जोरावर होणाऱ्या दादागिरी चे वेगवेगळे पैलू आहेत. ह्या प्रकाराला शास्त्रीय आणि वैचारिक तसेच पारमार्थिक बैठक सुद्धा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगतात त्याला 'माइंड गेम' असे म्हणतात. माझ्या मते 'चाणाक्यनिती' हे त्याचे आद्य प्रवर्तक म्हणावे लागेल. महाभारतात सुद्धा ह्या 'माइंड गेम' च्या जोरावर अनेक वेळा पांडवाचा विजय सुकर झाला. प्रभू रामाने सीतेचा केलेला त्याग (एका धोब्याने केलेल्या आरोपामुळे) हे सुद्धा माझ्या मते 'माइंड गेम' चेच उदाहरण आहे. शिवरायांचा 'गनिमी कावा' हे तर 'माइंड गेम' चे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. कुठूनही आपल्यावर शिवाजी राजांचे मावळे तुटून पडतील ह्या मानसिक भीतीने शत्रूची लढण्याची ताकद निम्मी झालेली असे. अशी दादागिरी मलाही आवडते. पण एखाद्याची जमीन लाटण्यासाठी रोज त्याचा घरी गुंड पाठवण्याचा जो खेळ चालू आहे तो मात्र ह्या 'माइंड गेम' ची काळी बाजू आहे. आणि ही प्रवृत्ती समाजात वाढीस लागली आहे. एकतर्फी प्रेमामधून मुलींवर होणारे हल्ले किंवा ह्या त्रासाला कंटाळून काही जणींनी आयुष्याचा घेतलेला निरोप ही ह्या दादागिरीची शोकांतिका आहे. अनेक भारतीय नेते ही मनाची दादागिरी कशी, कुठे आणि केंव्हा करावी हे उत्तम जाणतात. सरकार स्थापना असो व टीकेत वाटप असो, ही मंडळी आपला खेळ मांडतात आणि नेत्यांना भंडावून सोडतात. अहो हेच काय घरात लहानमुले सुद्धा कधी कधी (बहुतेक वेळा!) आपल्यावर 'ही' दादागिरी करतात. अशी ही मनाची दादागिरी आपलेच एक मन आपल्याच दुसरया मनावर करत असते आणि मग नकळत अनेक पावले दारूच्या गुत्त्या (किंवा बार!) कडे वळतात. 'माइंड गेम' मध्ये खेळ सुद्धा मागे नाहीये. क्रिकेट, फुटबॉल इ. खेळामधील कॉमेंट्स म्हणजे काय? आज काळ जो तणाव (स्ट्रेस) आपण सर्व जण अनुभवतो तो ह्या प्रकारच्या दादागिरीचेच 'अपत्य' आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये ह्या वर ही उपाय सांगितला आहे. 'मेडीटेशन' (सर्वाना समजेल अश्या मराठीत हा शब्द लिहिला आहे!) हा त्या वरील हमखास आणि रामबाण उपाय. पारमार्थिक प्रकारात भक्ती, उपासना चिंतन मनन असे मार्ग ही तणावमुक्ती साठी उपयोगी पडताना दिसतात.

     मी सुरवातीला लिहिल्याप्रमाणे दादागिरी बद्दल खूप काही लिहिता येईल. जाता जाता सौरभ गांगुलीच्या 'दादा' गिरीचा ही उल्लेख करावासा वाटतो. भारतीय संघाची घडण करताना आणि त्यांना मानसिक बळ देताना, 'दादा' ही दादागिरीच कामाला आली. आणि हो सध्या अजून एक 'दादा'गिरी गाजत आहे ॥ कोणाची काय विचारताय? अहो बारामतीकरांची..

--अभय टिपणीस
(सोमवार, २८ मार्च, २०११)
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-अभयदान.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.