सहजच-काही आठवणी…काही अनुभव…काही मतं…-मावशी ते मेड…(‘मेड’ ईन ईंडिया)लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:38:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  "सहजच-काही आठवणी...काही अनुभव...काही मतं..."
                  -----------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "सहजच-काही आठवणी...काही अनुभव...काही मतं..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मावशी ते मेड...('मेड' ईन ईंडिया)..."

                 मावशी ते मेड...('मेड' ईन ईंडिया)...--लेख क्रमांक-१--
                ------------------------------------------------

     'बस हो गया मॅडम अभी हमको मुलूक जानेका....' नुकतीच माझ्याकडे येउ लागलेली बांग्लादेशी 'मेड' म्हणत होती. म्हटलं 'का गं काय झालं???' तर म्हणाली की अनेक वर्ष झाली बाहेर, आता घरही सावरलयं.....मुलूकची याद येते म्हणाली.

     संध्याकाळी नवऱ्याला सांगितल तर हसायला लागला, म्हणाला मस्कतला काही तुमच्या नशीबात कामवाली बाई दिसत नाही. आजवर मारे सांगायचीस ना सगळ्यांना की माझ्याकडे बाई टिकतेही आणि चांगले काम करते. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा तुला तक्रार नाही आणि आता ही पळायच्या गप्पा करतीये.......

     'मेड' आपल्याकडची मोलकरीण, कामवाली बाई( सध्या ची Domestic Helper) ......आयूष्याचा एक अविभाज्य घटक. जिच्याशी बरेचदा 'तूझं माझं जमेना नी तूझ्याविना करमेना'चे नाते असते. ईथे आल्यावर कळले या 'बाई' ची 'मेड' झाल्यावर ती आमूलाग्र बदलते. ईथल्या मेड असतात श्रीलंकन, बांग्लादेशी किंवा दक्षिण भारतीय....पैसे द्यायचे तासावर. माझ्याकडची पहिली मेड हैद्राबादी होती. एका तासात वेजल्स, स्वीपिंग, मॉपिंग करणार म्हणे. म्हटलं कर बाई, मी तशीही अडलेला हरी आहे. मुळात धूणंभांडी, झाडूफरशी किंवा लादी ला या साहेबाच्या भाषेत ऐकताना मजा येत होती. ही  'मेड' मला ताई न म्हणता मॅडम म्हणत होती. विनाकारणच मला ती परकी वाटत होती...दुसऱ्या दिवशी तर हद्द झाली, खिडकीतून बाहेर पाहिले तर ही कारमधून उतरली. म्हणे लेट हो गया तो हजबंड ड्रॉप किया. कर्म माझं इथे माझ्या हजबंडला अजून लायसन मिळालेले नव्हते.....म्हणजे मी 'बे'कार आणि ही कारवाली बाई. त्यातही माझ्या रोह्याच्या पुष्पाला मी सगळ्या कामाचे ३०० रुपये देत होते आणि हिला अर्ध्याच कामाचे ३०००रुपये......चार महिने बाई नाही लावली तर एक तोळा सोनं येतं या माझ्या युक्तिवादाला नवऱ्याने अजिबात दाद दिली नसल्यामूळे मला हे आता सहन करायचे होते. पंधरा दिवसातच कढईवर काळी पुटं चढणे, घर पुसून न पुसल्यासारखे वाटणे, डिटर्जंट संपणे सु्रू झाले. त्यातच माझे बाबा आमच्याकडे रहायला आहे.....ते तर एक दिवस वैतागून म्हणाले की मी करतो ही कामं पण ही ब्याद हाकल!!!!!

     ती गेली, मग हे सगळे काम घरात घेतले. काही दिवस तो फार्स झाला आणि माहिती कळली की शेजारच्या बिल्डिंगमधे मराठी मेड आहे. मग पुन्हा तिला बोलावून दोन महिने सुख अनूभवले.....पुनश्च पहिले पाढे पंचावन्न झाल्यावर मात्र कानाला खडा लावला की पुरे आता पैश्याची नासाडी. अर्धी भांडी जर आपणच घासायची असतील तर पुर्णच घासू.....घरात व्हॅक्य़ूम केलं की झालं. शुक्रवारी नवऱ्याने मदत करायची...सगळ्ं कसं आखिव रेखीव. कागदोपत्री मस्त झाला प्लॅन.  २-३ महिने पुन्हा मस्त मजेत....नवराही उत्साहाने मदत करत होता.मग भारत भेट झाली, पुन्हा महिना सुखात.....हळूहळू नवऱ्याने त्याच्या शुक्रवारच्या झोपेचे खोबरे होते या कारणाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली....आणि मेलं दिवसभर आपण राब राब राबलो तरी काम ईथले संपत नाही याची मलाही प्रचिती येउ लागली.

--सहजच
(3,नोव्हेंबर 2009)
------------------

                      (साभार आणि सौजन्य-सहजच.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.