माझं चर्‍हाट-शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-१-ब

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:02:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "माझं चर्‍हाट"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री गुरुदत्त सोहोनी यांच्या "माझं चर्‍हाट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "शॅकल्टनची अफाट साहस कथा"

                शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-१--ब--
               ---------------------------------------------

     सर अर्नेस्ट शॅकल्टन" अशा आत्मघातकी मोहिमेत भाग घेण्याचा वेडेपणा कोण करेल? पण हाही प्रश्न इकडे पडत नाही कुणाला! शॅकल्टनकडे या मोहिमेसाठी 5000 लोकांनी अर्ज केला, त्यातला एका अर्ज तीन मुलींनी मिळून केला होता. शॅकल्टनला कामातल्या कौशल्याइतकंच स्वभाव, चारित्र्य व प्रवृत्ती महत्वाची होती म्हणून तो मुलाखतीत तर्‍हेवाईक प्रश्न विचारायचा.. रेगिनाल्ड जेम्स या पदार्थवैज्ञानिकाला तुला गाता येतं का असं त्यानं विचारलं. विल्यम बेकवेल व त्याचा मित्र पर्सी ब्लॅकबरो या दोघांनी पण अर्ज केले होते. पण त्यातल्या फक्त विल्यमला घेतल्यामुळे पर्सी कुणाच्याही नकळत एंड्युरंस जहाजावर घुसला. केवढी ती हौस! प्रत्येक गटासाठी 28 अशी एकूण 56 माणसं झाली, पर्सी धरून! मोहिमेची सुरुवात व्हायच्या काही दिवस आधी पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. तेव्हा शॅकल्टनने बरेच महिने खपून उभारलेली मोहीम गुंडाळून जमवलेली माणसं जहाजांसकट सरकारला युद्धासाठी देऊ केली. पण त्यावेळचा फर्स्ट लॉर्ड ऑफ अ‍ॅडमिराल्टी, विन्स्टन चर्चिलने उदार मनाने त्याला मोहिम पुढे नेण्याची परवानगी दिली. अशारितीने शेवटी एंड्युरंस जहाज प्लिमथ बंदरातून 8 ऑगस्ट 1914 रोजी निघाले. 5 नोव्हेंबरला दक्षिण जॉर्जिया येथील ग्रिटविकन या देवमाशांच्या शिकार केंद्रात पोचल्यावर, बर्फ कमी होण्यासाठी, तिथे एक महिनाभर मुक्काम केला. तरीही त्याला भरपूर बर्फ लागल्यामुळे प्रवास अगदी संथ व जिकीरीचा होऊ लागला. जितके ते दक्षिणेला सरकत होते तितकी बर्फाची स्थिती गंभीर होत होती. शेवटी, 18 जानेवारी 1915 ला एंड्युरंस जहाज बर्फात चहूबाजुंनी अडकले. बर्फ फोडून जहाज सोडविण्याचा प्रयत्न फोल झाला. काहीच करता येत नसल्यामुळे अगतिकपणे सगळे जहाजावर उन्हाळ्याची वाट पहात राहीले व जहाज बर्फाबरोबर हळूहळू उत्तरेला सरकत राहीले. बर्फाच्या असह्य दाबामुळे शेवटी जहाजाची स्थिती नाजुक झाली. एंड्युरंसची स्थिती काय झाली होती ते चित्र-2 मधे दिसेल. 27 ऑक्टोबरला पाणी आत झिरपायला लागल्यावर मात्र शॅकल्टनने जहाज सोडायचा निर्णय घेतला. सर्व सामान बर्फावर हलवले गेले तेव्हा तापमान -26 °C होते. 21 नोव्हेंबरला एंड्युरंस बुडाले.

--गुरुदत्त सोहोनी
(Thursday, March 17, 2022)
-------------------------------

                    (साभार आणि सौजन्य-चिमण्या .ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.