माझं चर्‍हाट-शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:05:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "माझं चर्‍हाट"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री गुरुदत्त सोहोनी यांच्या "माझं चर्‍हाट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "शॅकल्टनची अफाट साहस कथा"

                 शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-2--अ--
                ----------------------------------------------

     एंड्युरंसच्या अंतानंतर मात्र शॅकल्टनने रॉस समुद्राकडे जाणं रद्द करून माणसं मृत्युपासून वाचविण्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरविलं. त्याच्या माहितीप्रमाणे उत्तरेला काही बेटांवर त्यांना खाद्यपदार्थाचे साठे मिळण्याची शक्यता होती. पॉलेट बेट, स्नो हिल बेट व रॉबर्टसन बेट ही ती बेटं होती जिथे पूर्वी झालेल्या मोहिमांच्या आणीबाणी साठी केलेले साठे ठेवले गेले होते. यातल्या एका बेटावर पोचल्यानंतर ग्रॅहॅम लॅंड ओलांडून पुढे विल्हेमिना बे ठिकाणच्या देवमाशांच्या शिकार केंद्रात जायचं असं ठरवलं. तिथून त्यांना पुढील प्रवासासाठी मदत मिळाली असती. त्यांच्या आकडेमोडीप्रमाणे एंड्युरंस सोडलेल्या जागेपासून पॉलेट बेट 557 किमी अंतरावर तर स्नो हिल बेट 500 किमी वर होते. तिथून विल्हेमिना बे पुढे अजून 190 किमी लांब होता. दोन लाईफबोटी स्लेजवर टाकून 30 ऑक्टोबरला त्यांनी कूच केलं. पण थोडा देखील बर्फाचा पृष्ठभाग सपाट नसल्याकारणाने प्रवास अत्यंत कष्टाचा व मंदगतीने झाला. तीन दिवसात जेमतेम 3 किमीच अंतर कापले गेल्यामुळे चालत जाण्याची कल्पना रद्द केली गेली. त्या ऐवजी त्यांनी त्या हिमनगावर तळ ठोकला आणि हिमनगाच्या गतीने हळूहळू सरकत राहीले. 17 मार्च 1916 ला ते पॉलेट बेटाच्या अक्षांशावर पण 97 किमी पूर्वेला होते. पण लाईफबोटीतून मधले हिमनग चुकवत चुकवत तिथे पोचायला फारच वेळ लागला असता म्हणून ते हिमनगाबरोबर जात राहीले. पॉलेट बेट मागे पडल्यामुळे त्यांचं पुढचं लक्ष्य होतं एलेफंट बेट किंवा क्लॅरेंस बेट! पण या दोन्ही बेटांकडे देवमाश्यांच्या शिकारी बोटी जात नसल्यामुळे शॅकल्टनला तिकडे जाण्यात रस नव्हता. त्या ऐवजी त्याला साउथ शेटलंड बेटांकडे जायचं होतं. पण त्याच्या हातात फारसं काही नव्हतं. 8 एप्रिलला त्या हिमनगाचे दोन तुकडे झाल्यावर पुढील प्रवास लाईफबोटीतून करण्याचा निर्णय घेतला. 9 एप्रिलला बोटी पाण्यात घातल्या पण त्या बर्फाच्या छोट्या मोठ्या तुकड्यांनी सतत घेरलेल्या राहिल्या. शेवटी 15 एप्रिलला अथक प्रयत्नानंतर ते कसेबसे एलेफंट बेटावर पोचले. जिथे ते पोचले तो किनारा फारसा सुरक्षित न वाटल्यामुळे त्यांनी त्यांचा तळ 11 किमी पश्चिमेला हलवला.

     गटातल्या बर्‍याच जणांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे शॅकल्टनने त्या सगळ्यांना घेऊन मदत मिळू शकेल अशा दुसर्‍या जवळच्या बेटावर जायचा बेत रद्द केला. त्या ऐवजी फक्त काही लोकांना घेऊन पूर्वेकडे 1100 किमी असलेल्या दक्षिण जॉर्जिया, जिथे ते येताना थांबले होते तिथे, जाऊन मदत मिळवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एका लाईफबोटीची डागडुजी करून ती त्या लांबच्या प्रवासाला शक्य तितकी टिकेल अशी सुधारली. शॅकल्टन धरून 6 जणांनी 24 एप्रिलला कूच केलं. बरोबर फक्त महिनाभर पुरेल इतकीच सामग्री होती. कधी वल्ही मारत तर कधी वार्‍याची मदत घेत बर्फाइतकं थंडगार पाणी सतत अंगावर घेत घेत एकदाचे ते दक्षिण जॉर्जियाच्या किंग हाकोन बे इथे 10 मे रोजी टेकले. दुर्देवाने हे ठिकाण त्यांना जिथं जायचं होतं, ग्रिटविकन, त्याच्या बरोबर विरुद्ध टोकाला स्ट्रॉमनेस बे मधे होतं. आता त्यांच्या पुढे दोनच पर्याय होते.

--गुरुदत्त सोहोनी
(Thursday, March 17, 2022)
-------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-चिमण्या .ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.