माझं चर्‍हाट-शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-2-ब

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:08:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "माझं चर्‍हाट"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री गुरुदत्त सोहोनी यांच्या "माझं चर्‍हाट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "शॅकल्टनची अफाट साहस कथा"

                 शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-2--ब--
                ---------------------------------------------

     एक म्हणजे, परत बोटीत बसून बेटाला वळसा घालून तिकडे जायचं व दुसरा म्हणजे, पायी मधले डोंगर पार करून पलिकडे जायचं. त्यांच्यातल्या दोघांची खालावलेली प्रकृती व बोटीची एकूण दुर्दशा पाहून शॅकल्टनने चालत जायचा निर्णय घेतला. 19 मेला पहाटे 2 वाजता शॅकल्टनने वोर्सली व क्रीन या दोघांना बरोबर घेऊन प्रयाण केलं. बाकीचे तिघे तिथेच थांबले. प्रवासाला जाण्याआधी बर्फात पाय घसरू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या बुटाच्या तळव्यांना स्क्रू बसवले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळ पर्यंत ते 3000 फूट उंच डोंगरावर आले. रात्र जवळ येऊ लागल्यावर तापमान झपाझप खाली जायला लागलं व दाट धुक्यामुळे काहीही दिसेना झालं. त्यांना लवकरात लवकर त्या डोंगराच्या पायथ्याशी जाणं भाग होतं नाही तर ते नक्की गारठून मेले असते. प्रथम त्यांनी डोंगर उतारावर पायर्‍या खणत खाली उतरायचा प्रयत्न केला पण लवकरच त्यातला फोलपणा शॅकल्टनच्या लक्षात आला.

     यापुढे जे त्याने ठरवलं व केलं त्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं तसंच प्रचंड आदर पण! त्यांनी त्यांच्या जवळच्या दोरखंडाची गुंडाळी करून तीन छोट्या बैठकी बनवल्या. सगळ्यात पुढच्या बैठकीवर शॅकल्टन बसला, त्याच्या मागे वोर्सली व त्याच्या मागे क्रीन. वोर्सलीचे पाय शॅकल्टनच्या कमरेभोवती तसंच क्रीनचे वोर्सलीच्या कमरेभोवती होते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्या तिघांनी त्या दाट धुक्याने भरलेल्या अंधारी उतारावरून झोकून दिले. पुढे काय वाढुन ठेवलंय याची तमा न बाळगता! कदाचित ते एखाद्या कड्यावरून खोल दरीत कोसळून मेलेही असते. कदाचित मधल्या एखाद्या मोठ्या दगडावर आपटले असते व हातपाय मोडुन तिथेच खितपत पडले असते. प्रचंड वेगाने खाली घसरत जाऊन ते सुरक्षितपणे पायथ्याशी पोचल्यावर त्यांनी आनंदाने हस्तांदोलन केले. नंतर शॅकल्टन इतकंच म्हणाला 'अशी गोष्ट नेहमी करणं फारसं योग्य नाही'. सगळे प्रचंड दमले होते तरी त्यापुढे अथक प्रवास करत करत एकूण 36 तासात त्यांनी जवळपास 40 किमी अंतर कापून शिकार केंद्रात पाय ठेवला. तेव्हा त्यांना 18 महिन्यात प्रथमच इतर माणसांचं दर्शन झालं व आवाज ऐकायला मिळाले. पुढे फारसा वेळ न घालवता त्यांनी बेटाच्या दुसर्‍या टोकाला अडकलेल्या तीन माणसांची सुटका 21 मे च्या संध्याकाळ पर्यंत केली. एलेफंट बेटावर अडकलेल्यांची सुटका करायला मात्र वेळ लागला. खराब हवामान, खवळलेला समुद्र व समुद्रातला बर्फअशा कारणांनी त्यांचे पहिले 3 प्रयत्न फोल ठरले. शेवटी, 30 ऑगस्टला त्यांच्या चौथ्या प्रयत्नाला यश येऊन इतरांची सुटका झाली. या सफरीत 28 पैकी एकही माणूस दगावला नाही ही विशेष नमूद करण्याची गोष्ट आहे. शॅकल्टन, वोर्सली व क्रीन यांच्या 36 तासांच्या खडतर प्रवासाची पुनरावृत्ती 100 वर्षानंतर केली गेली.

--गुरुदत्त सोहोनी
(Thursday, March 17, 2022)
--------------------------------

                    (साभार आणि सौजन्य-चिमण्या .ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.