फुल्ल २ दिलसे-फॉर्म्युला वनची बाराखडी--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:10:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "फुल्ल २ दिलसे"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमेय गिरोला "फुल्ल २ दिलसे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'फॉर्म्युला वन'ची बाराखडी"

                    'फॉर्म्युला वन'ची बाराखडी--लेख क्रमांक-१--
                   -------------------------------------

     बघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.

     गेल्या काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते. त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.

     त्यानंतर २००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसते.

     २००७ मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित करण्याचे ठरवले गेले.

     एफ वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.

--अमेय गिरोला 
(Wednesday, October 26, 2011)
------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-फुल्ल २ दिलसे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.