फुल्ल २ दिलसे-फॉर्म्युला वनची बाराखडी--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:12:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "फुल्ल २ दिलसे"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमेय गिरोला "फुल्ल २ दिलसे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'फॉर्म्युला वन'ची बाराखडी"

                    'फॉर्म्युला वन'ची बाराखडी--लेख क्रमांक-2--
                   --------------------------------------

     ग्रॅड प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात. दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.

     सर्किट – सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसाठी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.

     लॅप - एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.

--अमेय गिरोला 
(Wednesday, October 26, 2011)
------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-फुल्ल २ दिलसे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.