फुल्ल २ दिलसे-फॉर्म्युला वनची बाराखडी--लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:13:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "फुल्ल २ दिलसे"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमेय गिरोला "फुल्ल २ दिलसे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'फॉर्म्युला वन'ची बाराखडी"

                    'फॉर्म्युला वन'ची बाराखडी--लेख क्रमांक-3--
                   --------------------------------------

     ड्रायव्हर्स आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.

     प्रत्येक संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२ संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल, जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्याला इंडियन ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.

     गुण – प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात. प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला ६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो. वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली जाते.

     मोसमातील ३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२ गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर दावा सांगितला आहे.

--अमेय गिरोला 
(Wednesday, October 26, 2011)
------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-फुल्ल २ दिलसे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.