वाचू आनंदे-झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:51:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "वाचू आनंदे"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री राम जगताप यांच्या "वाचू आनंदे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो"

                         झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो--लेख क्रमांक-2--
                        ----------------------------------

     एक दिस काय झालं की, चिन्ना रानात गेल्ता. एका झाडाखाली झोपला हुता. त्याच्या अवतीभवतीच्या झाडावर लई माकडं हुती. त्यांची बारकी बारकी पिल्लं बी हुती. चिन्नाला वाटलं एक पिल्लू आपल्या घरी न्यावं. ते त्याला लई आवडलं हुतं. तो जवळ आलेलं एक पिल्लू घेऊन झोपडीकडं धावत सुटला. पिल्लू 'ची ची' करून ओरडायला लागलं. तशी माकडं त्याच्या मागं पळू लागली. चिन्ना पुढं पळतोय, माकडं त्याच्या मागं पळतायत. चिन्ना लई घाबरला बगा, इतक्या माकडांनी तेच्या मागं लागल्यावर. पण त्यानं काइ पिल्लू सोडलं नाय. तो झोपडीकडं धूम पळत हुता, पण माकडं बी काय कमी नवती. ती त्याच्याहुन चिंगाट पळत, त्याच्या मागं लागली हुती. काहींनी त्याला गाठून त्याच्या पायाला, अंगाला ओरखाडे काढले हुते. चिन्ना रक्तबंबाळ झाला. तसाच झोपडीजवळ आला. पण त्याची आय काठी घेऊन धावत आल्यावर बी माकडं मागं हटायला तयार नवती. मग चिन्नानं पिल्लाला सोडून दिलं. माकडं पळून गेली. पण चिन्ना आठदा दिस आजारी पडला. त्याच्या अंगावर- खांद्यावर माकडांनी लई ओरबाडे काढले हुते. त्याला उठता येत नवतं की बसता येत नवतं. या दिसापास्नं चिन्नानं शाण्या माणसांसारखं वागायचं ठरिवलं.

     चिन्ना एवढुसा पोर. पोर तसं लई मोठं नाय बघा. पण त्यानं मोठय़ा माणसांना जमायची नाय ती काम करून दावली? चोरटय़ा शिकाऱ्यांना पकडलं. चंदनाची झाडं तोडणा-या ठेकेदाराच्या माण्सांना अद्दल घडविली. चोरून बंदुका इकाणा-यास्नी पकडून दिलं. चिन्ना एकदा वागाला घाबरून पळाला. चिंगाट धावत आपल्या झोपडीकडं धावला. वाग बी त्याच्या मागं हुता. चिन्नानं आरडाओरडा केल्यानं शेजारपाजारचे लोक जमले. त्यास्नी पाहून वाग आल्यापावली पसार झाला. पण एरवी चिन्नाचं कवतुक करणा-या गावक-यांनी त्याला 'पळपुटा' म्हणून चिडवलं. चिन्नाला लई राग आला. त्यानं ठरिवलं या वागाला पकडून दावतो. चिन्ना लई जिगरबाज पोर. त्यानं शेवटी वागाला पकरलंच.

     ..आरारा, म्या एवढं समदं तुमास्नी सांगून टाकलं पर चिन्नानं शिकाऱ्यास्नी, चोरास्नी आन वागास्नी कसं पकरलं ते सांगलंच नाय. गडय़ानो, तुमी आसं करता का, हे पुस्ताकच वाचा ना दोस्तांनो. तुमास्नी समदं ठावं होईल. चिन्ना बी आन त्याचे पराक्रम बी. मग तुमी चिन्नासारखं मणाल, 'झुंबा ऽऽ हो झुंबा ऽऽ हो'.

(चिन्ना : मंजुश्री गोखले)
--------------------

--राम जगताप
(Thursday, 8 December 2011)
----------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-वाचू आनंदे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.