आशिष सावंत-एक छोटीशी प्रेमकथा--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:17:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "आशिष सावंत"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री आशिष सावंत यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "एक छोटीशी प्रेमकथा"

                            एक छोटीशी प्रेमकथा--क्रमांक-१--
                           -----------------------------

     १५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.

     आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची "राणी". हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.

     तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ' का रे? एवढा उशीर का झाला?' राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ' काही नाही ग! असचं !". मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.

--आशिष सावंत
August 31, 2010
-------------------

                  (साभार आणि सौजन्य-आशिष सावंत.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.