तरंग-साक्षर-अ

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:31:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "तरंग"
                                      -------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती श्रेया यांच्या "तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "साक्षर"

                                        साक्षर--
                                       ------

     मध्यंतरी 'निशाणी डावा अंगठा' हा चित्रपट बघितला. सरकारने चालू करण्यास सांगितलेले 'प्रौढ साक्षरता' अभियान धाब्यावर बसवून; साक्षरांनाच 'नवसाक्षर' म्हणून परीक्षेस बसवून; हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दाखवून, एक गाव प्रथम पारितोषिक कसे पटकावते त्याची ही कथा. हा चित्रपट पाहून झाल्यावर मनात एक प्रश्न रुंजी घालू लागला: साक्षर कोणाला म्हणावे?

     ज्याला सही करता येते तो साक्षर, ज्याला लिहिता-वाचता येते तो साक्षर, जो दहावी-बारावी झालाय तो साक्षर की ज्याच्याकडे बी.ए., बी. कॉम, एम.बी.ए अशी एखादी डिग्री (किंवा डिग्र्या ) आहेत तो साक्षर? लौकिक अर्थाने बघायला गेलं तर ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर. पण मग मनात आलं या एकविसाव्या शतकात, स्पर्धेच्या युगात फक्त लिहिता वाचता येणं हा एकच निकष साक्षर/निरक्षर भेद करण्यास पुरेसा ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जाणवलं आजच्या काळात साक्षरतेसाठी एवढा एकच निकष पुरेसा नाही. साक्षरता बहुआयामी आहे. तिला विविध अंग आहेत, बाजू आहेत.
लिहिता-वाचता येणं अथवा आपल्या आवडत्या किंवा चरितार्थाला उपयोगी पडेल अशा विषयात प्राविण्य मिळवणं, हे त्यातील एक. हे सोडून आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आल्या नाहीत तर कितीही पदव्या/पदविका आपल्या नावापुढे असल्या तरी बाहेरच्या जगात आपण 'बावळट' ठरतो किंवा बाहेरच्या जगात वावरण्यास कुठेतरी कमी पडतो. थोडक्यात काय तर अगदी अडाणी/निरक्षर ठरतो!

     माझ्या दॄष्टीने आर्थिक साक्षरता ही त्यातली एक. रोजच्या जीवनातले पैशांचे व्यवहार करता येणं: बँकेतली छोटी-मोठी कामं करणं (चेक किंवा कॅश भरणे अथवा काढणे ई.); ए.टी.एम्/क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा सफाईदारपणे वापरता येणं; आपण मिळवलेल्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करता येणं; त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे माहीत असणं किंवा ते माहीत करून घेण्याची क्षमता आणि इच्छा असणं, या सगळ्या गोष्टींचा मी आर्थिक साक्षरतेत समावेश करेन. या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचं आहे. मग ती नोकरदार व्यक्ती असो, गॄहिणी असो किंवा एखादा विद्यार्थी असो. आज अशी अनेक माणसं आजूबाजूला दिसतात ज्यांना या गोष्टी करता येत नाहीत. ज्यांच्यावर या गोष्टी करण्याची कधी वेळच आलेली नाही किंवा घरातला कर्ता पुरुष या गोष्टींची काळजी घेतोय तर मी कशाला त्यात लक्षं घालू? अशी काहीशी त्यांची भूमिका आहे. पण शेवटी एक विचार सारखा मनात येतो कि या काही फार अवघड गोष्टी नाहीत आणि त्यांचा संबंध आपल्याशी कधीही येवू शकतो. तर मग त्यांची माहीती करून घेण्यात का टाळाटाळ?

--श्रेया
(रविवार, डिसेंबर २०, २००९)
--------------------------

                   (साभार आणि सौजन्य-श्रेया-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.