तरंग-साक्षर-ब

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:33:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "तरंग"
                                       -------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती श्रेया यांच्या "तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "साक्षर"

                                      साक्षर--
                                     ------

     आम्ही लहान असताना, म्हणजे साधारण सहावी-सातवीत, आमची आई आम्हाला एखादा चेक भरायला बँकेत पाठवत असे. स्लिप वगैरे ती भरून देत असे. नुसता चेक काऊंटर वर जाऊन भरायचा. एवढंच काय, आम्ही आई बरोबर बरेचदा ए.टी.एम मधेही जायचो. तेव्हा ते कार्ड मशिनमधे सरकवून पैसे काढण्याची मजा वाटत असे. कदाचित पुढल्या खेपेस आई तिचा पिन नंबर बदलतही असेल! पण अशा पद्धतीने आम्ही हळूहळू ही साधनं कधी वापरायला शिकलो आम्हाला कळलही नाही! आम्हा भावंडांच्या १८ व्या वाढदिवसाचं बक्षिस होतं आमच्या नावावर बँक अकांऊंट. केवढं अप्रूप वाटलं होतं तेव्हा. पैसे काही फार नसायचे त्यात पण तो आपण स्वतः ऑपरेट करायचा हेच खूप काही शिकवून जाणार होतं. मला आठवतंय माझ्यासाठी जेव्हा स्थळं बघत होते तेव्हा मर्चंट नेव्ही मधल्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्या मुलाच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या मुलीचं शिक्षण वगैरे ठीक आहे. पण आमचा मुलगा वर्षातील सहा महीने बोटीवर असतो. तो इथे नसताना तुमच्या मुलीला सर्व आर्थिक व्यवहार करता आले पाहीजेत! थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय तर आज औपचारिक शिक्षणाबरोबरच आर्थिक शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आई-वडिलांनी मुलांवर विश्वास दाखवल्याशिवाय, त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय ते मिळणं शक्यं नाही. अर्थात कुठल्याही व्यक्तीने या गोष्टींच महत्त्व ओळखणं आणि शिकण्याची इच्छा दाखवणं हे ही तितकंच महत्त्वाचं!

     माझ्या दॄष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्टं म्हणजे 'संगणक साक्षरता' किंवा 'computer literacy'. आजच्या युगात, या 'paperless office' च्या जमान्यात, संगणक तुमचा दोस्त नसेल तर तुमचं कठीण आहे! म्हणजे अगदी संगणकाच्या लँग्वेजेस किंवा ओरॅकल सारख्या गोष्टी म्हणत नाही मी पण कमीत कमी 'word', 'excel' ,'power point', 'internet' या गोष्टी तरी वापरता यायला हव्यात. ती आजच्या काळाची गरज आहे. या बाबतीत मात्र लहान मुलं आपल्या आई-वडिलांपेक्षा अधिक स्मार्ट असलेली बघायला मिळतात! ऑफिसमधेही मी बरेच वेळा अनुभव घेतलाय. अगदी मॅनेजर लेव्हलचा माणूस, पण excel मधला एखादा फॉर्म्युला किंवा power point वापरायची वेळ आली कि हैराण होतो. मग एखाद्या सेक्रेटरीने power point मधे एखादं प्रेझेंटेशन करून दिलं कि त्याला ती सेक्रेटरी काही क्षणांपुरती का होईना पण ग्रेट वाटून जाते!!

     तर अशा तर्‍हेने औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त मला महत्त्वाच्या वाटणार्‍या या गोष्टी. मला माहीत आहे की साक्षरता हा काही एका पानात मांडून होणारा विषय नाही. पण तरीही मला याबद्दल विचार करताना प्रामुख्याने जाणवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्याश्या वाटल्या. तुम्हाला काय वाटतं?

--श्रेया
(रविवार, डिसेंबर २०, २००९)
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-श्रेया-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.