संस्मरणीय-लिहिते व्हा !--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 11, 2022, 10:05:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "संस्मरणीय"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री सौरभ यांच्या "संस्मरणीय" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिहिते व्हा !"

                                 लिहिते व्हा !--क्रमांक-2--
                                ----------------------

     मी काय सांगत होतो ते आता तुमच्या थोडेफार लक्षात आले असेल. शिवाय आता लेखन करायचे झाले तर असेही नाही की लेखनाला लागणारी सामग्री तुमच्याजवळ नाही. म्हणजे लेखक होण्यासाठी अगदी आवश्यक असते, ( म्हणजे लोकांचा असा पक्का ग्रह झाला आहे) त्या अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी बोलत नाहीये. लेखनसामग्री म्हणजे कागदाचे भेंडोळे आणि लिहायला पेन. व्यंकटेश माडगूळकर लहानपणी उत्तम चित्रे काढत असत. त्यांचा चित्रकलेचा हात चांगला होता. त्यांचे चित्रकलेचे कलाल मास्तर त्यांना म्हणाले,"तुझा हात चांगला आहे. शिकलास, कष्ट केलेस तर चांगला चित्रकार होशील." पण माडगूळकरांची परिस्थिती होती गरीब. रंगांशी खेळायचे म्हटले तर रंग आणि इतर साधनांना पैसे पडत होते. लेखनाला मात्र असले काही लागत नव्हते. कागद आणि साधेसे शाईचे पेन असले तरी पुरत असे. मग चित्रकार व्हायचे न जमल्यामुळे त्यांनी हातात लेखणी घेतली. पुढे त्यांनी कागदावरचीच पण चित्रापेक्षा वेगळी अशी शब्दचित्रे काढली कशी, माणदेश अजरामर झाला कसा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

     हे झाले तेव्हाचे. सध्या मात्र ही साधनेही आवश्यक आहेत असे नाही. (याबाबत मात्र काळ मोठा कठीण आलेला नाही हे आपले सुदैवच म्हणायचे.) समोर संगणकाचा कीबोर्ड टंकायला असला तरी पुरते. सगळ्यांकडे असतोच तो. फक्त त्यावर काय बडवायचे तेवढे कळले पाहिजे.

     लेखनसामग्रीची सोय झाल्यावर आता काय उरले? लिहावे कसे हा प्रश्न अजून राहिलाच आहे. त्याबद्दलही सांगून टाकतो. मध्यंतरी रविंद्र पिंग्यांचे एक पुस्तक वाचले. अप्रतिम होते. त्यात त्यांचा अर्नेस्ट हेमिंग्वेवर एक लेख होता. अर्नेस्ट हेमिंग्वेने नवोदित लेखकांना एक संदेश देऊन ठेवला आहे. पिंग्यांच्याच शब्दात तो बघू. हेमिंग्वे म्हणतो,"सतत चांगलं, अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा ध्यास घ्या. आजच्यापेक्षा उद्याचं अधिक कलात्मक लिहून झालं पाहिजे. परवाचं त्यापेक्षा अधिक दर्जेदार हवं. असं हे अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." आहे की नाही कमाल? "अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." मझा आ गया. वाचलं आणि दिल एकदम खुष होऊन गेला.

     तर आहे हे असे आहे. लेखनसामग्रीची सोय लावून दिली, लिहावे कसे हे सांगून झाले आणि आता एवढे सांगितल्यावर तरी आता तुम्हाला लिहिण्यात काही अडचण येऊ अशी आशा करतो. त्यामुळे आता उठून, कमरा बांधून तुमच्या लेखणीचा उदयोस्तू करायला लागा. अर्थात लगेच तुम्हाला या प्राप्तकालात सुंदर लेणी खोदता यायची नाहीत. त्याला जरा वेळ लागेलच. हरकत नाही. शेवटी सब्रका फलच गोड होता है. पण शेवटी लिहाल ते अधिकाधिक चांगलं लिहिण्याचं मात्र विसरु नका. नाहीतर मी 'लिहिते व्हा!' चा संदेश देतोय आणि वाचकांनी किंवा लेखन छापायला जाल तर संपादकांनी तुम्हाला 'चालते व्हा!' चा संदेश देऊ नये म्हणजे मिळवली. काय समजलात ?

--लेखक-सौरभ
(मंगळवार, ६ जुलै, २०१०)
-----------------------

                 (साभार आणि सौजन्य-संस्मरणीय.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2022-रविवार.