माझं आभाळ-दादोजी कोंडदेव आणि शिवसेना-क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:29:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "माझं आभाळ"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री सचिन परब यांच्या "माझं आभाळ" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दादोजी कोंडदेव आणि शिवसेना"

                     दादोजी कोंडदेव आणि शिवसेना--क्रमांक-१--
                    --------------------------------------

     जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेना आमच्याबरोबर येऊन हा मुद्दा जोरात उचलेल असं वाटलं होतं, मराठा संघटनांच्या राजकारणात आघाडीवर असलेले एक मोठे नेते एकदा सांगत होते. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत होते. राष्ट्रवादीपेक्षा सेनेला हा मुद्दा फायद्याचा होता. आता आम्ही त्यांना संपवणार. वगैरे बरंच काही बोलले.

     असं असलं तरी शिवसेनेने दादोजी कोंडदेव प्रकरणात पुतळा न पाडण्याची भूमिका घेतली. यावेळच्या दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. मीडियात कुणीच त्याची दखल घेतली नाही. दसरा मेळाव्यानंतर मी नवशक्तित लेख लिहिला होता, दसरा, दादोजी आणि शिवसेनाप्रमुख. शिवसेनेची याविषयीची भूमिका फायद्याची ठरेल की नुकसानीची हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा आता लवकर संपण्याची शक्यता नाही. तो धुमसत ठेवला जाणार. महाराष्ट्रात पुन्हा जात हा सगळ्यात मोठा अजेंडा बनणार.

     मी ब्राम्हणवादाचा विरोधकच आहे. पण पुतळा कापणा-यांनी हे कृत्य काही सामाजिक भल्याच्या भावनेतून केलेलं नाही. यामागे केवळ राजकारण आहे. सरंजामदारी मानसिकता असणारी राष्ट्रवादी यात आघाडीवर आहे. जेम्स लेन प्रकरणात आर. आर. पाटलांनी जे केलं होतं, तेच आता अजितदादा करत आहेत. मराठ्यांच्या संघटना दादा पोसतात पाळतात हे काही आता गुपित राहिलेलं नाही. मराठ्यांच्या मतासाठी महाराष्ट्रात असं विष पसरून कसं चालेल? मराठ्यांनी आपली दादागिरी अशीच चालू ठेवली, तर ते मराठ्यांच्याही भल्याचं नाही. यातून मराठ्यांचं नुकसान होतंय. होत राहणार आहे. पण इथे मराठा नेत्याना आणि संघटनांना मराठ्यांचं भलं करायचंय का? निवडणुकांच्या राजकारणातही हे उलटू शकतं.

     त्यातला माझा एक उतारा मी इथे अधोरेखित करतोय, 'मुख्य प्रवाहातल्या पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी कायमच या मुद्द्यापासून दोन हात लांबच राहायचं ठरवलेलं दिसतंय. आपल्यावर कोणतंतरी लेबल लागेल, याची भीती त्यांना असावी. पण लोकांच्या भावनेशी निगडीत असलेल्या या मुद्द्यांपासून शहाण्यांनी दूर राहणं, हे महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही. यावर राज्यातल्या माध्यमांमधे थेट चर्चा होऊन खरं खोटं करून टाकणं गरजेचं आहे. असं होत नाही, तेव्हा दोन्ही टोकाचे अतिरेकी विचारवंत आपापले एकांगी विचार मांडत राहतात. ते त्या त्या वर्तुळात वाचले जातात. त्यातून द्वेष पसरतो. वातावरण सडत जातं. असं ढगाळ वातावरण राजकारण, समाजकारण तसंच विचारकारण करणा-या अनेक भामट्यांच्या फायद्याचं असतं. त्यामुळे अशा विषयांचा सोक्षमोक्ष लावायला नेहमीच वेळ लावला जातो. मढ्यावरचं दही वर्षांनुवर्षं खाल्लं जातं. प्रश्न अयोध्या बाबरी मशिदीचा असो, सीमाप्रश्न असो. मूळ मुदद्यांवर चर्चा घडवून आणायला हव्यात, तिथे आपण कमी पडतोय.' मला वाटतं आपण या प्रश्नावर चर्चा करायला हवी. सगळे अभिनिवेष बाजूला ठेवून. पण हे शक्य आहे का?

--सचिन परब
(Tuesday, 28 December 2010)
----------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-परब सचिन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.