माझं आभाळ-दादोजी कोंडदेव आणि शिवसेना-क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:30:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "माझं आभाळ"
                                   --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री सचिन परब यांच्या "माझं आभाळ" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दादोजी कोंडदेव आणि शिवसेना"

                     दादोजी कोंडदेव आणि शिवसेना--क्रमांक-2--
                    --------------------------------------

     दसरा म्हणजे सोनं वाटणं. दसरा म्हणजे सीमोल्लंघन. दसरा म्हणजे यंत्रांची पूजा. दसरा म्हणजे  सरस्वतीपूजन. दसरा म्हणजे रावण जाळणं. दसरा म्हणजे ठिकठिकाणच्या जत्रा. दसरा म्हणजे धम्मचक्रपरिवर्तनदिन. आणि दसरा म्हणजे शिवाजी पार्कवरचा शिवसेनेचा दसरा मेळावाही. दस-याच्या दुस-या दिवशी निदान मराठी पेपरांना तरी हेडलाइनची चिंता नसते. गेली चाळीस वर्षं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याची न चुकता चांगली सोय करत आहेत. पण दोन वर्षांपूर्वी थकलेले आजारी बाळासाहेब बघून त्यांच्या विरोधकांनाही वाईट वाटलं. पण परवाच्या दस-याने ती सगळी हळहळू पार धुवून टाकली. जवळपास पाऊण तास बाळासाहेब दणदणीत बोलले.

     टीवी आणि पेपरांत या भाषणाचं दणक्यात रिपोर्टिंग झालं. सविस्तर बातम्या छापून आल्या. अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. पण एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. तो म्हणजे दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवण्याला केलेला विरोध. शिवसेनेने घेतलेली ही जुनीच भूमिका आहे, हे खरंच. पण या संवेदनशील मुद्दयाविषयी बाळासाहेबांचं बोलणं हीच बातमी होती. पण एखादा अपवाद वगळता कोणत्या पेपरने त्याला हात लावला नाही. शिवसेनाप्रमुख म्हणाले, 'आता जात बघून तुम्ही पराक्रम ठरवणार का? नेताजी पालकर, खंडोजी खोपडा हे महाराजांशी गद्दारी करणारे कोणत्या जातीचे होते?', पण हे फारसं कुठेच लिहून आलं नाही.

     कदाचित याचं रिपोर्टिंग करणा-या बातमीदारांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटला नसेल. विषय संवेदनशील आहे, त्यामुळे उगाच आगीत तेल का टाकायचं, अशीही माध्यमांची भूमिका असू शकेल. माध्यमं या सगळ्यात हात घालायला घाबरतही असतील. मुख्य प्रवाहातल्या पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी कायमच या मुद्द्यापासून दोन हात लांबच राहायचं ठरवलेलं दिसतंय. आपल्यावर कोणतंतरी लेबल लागेल, याची भीती त्यांना असावी. पण लोकांच्या भावनेशी निगडीत असलेल्या या मुद्द्यांपासून शहाण्यांनी दूर राहणं, हे महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही. यावर राज्यातल्या माध्यमांमधे थेट चर्चा होऊन खरं खोटं करून टाकणं गरजेचं आहे. असं होत नाही, तेव्हा दोन्ही टोकाचे अतिरेकी विचारवंत आपापले एकांगी विचार मांडत राहतात. ते त्या त्या वर्तुळात वाचले जातात. त्यातून द्वेष पसरतो. वातावरण सडत जातं. असं ढगाळ वातावरण राजकारण, समाजकारण तसंच विचारकारण करणा-या अनेक भामट्यांच्या फायद्याचं असतं. त्यामुळे अशा विषयांचा सोक्षमोक्ष लावायला नेहमीच वेळ लावला जातो. मढ्यावरचं दही वर्षांनुवर्षं खाल्लं जातं. प्रश्न अयोध्या बाबरी मशिदीचा असो, सीमाप्रश्न असो. मूळ मुदद्यांवर चर्चा घडवून आणायला हव्यात, तिथे आपण कमी पडतोय.

     आनंद आहे, की बाळासाहेबांनी निदान स्पष्ट भूमिका मांडलीय. आज मनात जातीयवाद आणि तोंडाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव, असं थोतांड काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून रिपब्लिकनापर्यंत सातत्याने सुरू आहे. तीच गोष्ट धर्मवादाविषयीही दिसून येते. अगदी मनसेसारख्या नव्या आणि शहरी वळणाच्या पक्षाच्या नेत्यांमधेही हे ढोंग दिसून येतं. असं असताना बाळासाहेबांनी आपली जी काही योग्य अयोग्य भूमिका आहे, ती उघडपणे मांडलीय. यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. आता त्यावर चर्चा घडायला हवी.

--सचिन परब
(Tuesday, 28 December 2010)
----------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-परब सचिन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.