माझं आभाळ-दादोजी कोंडदेव आणि शिवसेना-क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:32:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "माझं आभाळ"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री सचिन परब यांच्या "माझं आभाळ" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दादोजी कोंडदेव आणि शिवसेना"

                     दादोजी कोंडदेव आणि शिवसेना--क्रमांक-3--
                    --------------------------------------

     शिवसेनेची गेल्या काही वर्षांची भूमिका ही याच लाईनवर जाणारी आहे. जेम्स लेन प्रकरणात लेनच्या नालायकीला विरोध सगळ्यांनीच केला. प्रश्न मराठा संघटना आणि ब्राम्हण इतिहासलेखक यांच्यापैकी एकाची बाजू घेण्याचा होता. शिवसेनेने यात इतिहासलेखकांची बाजू घेतली होती. तेव्हा सेनेत असणारे राज ठाकरे तर लेखक गजानन मेहेंदळेंचं सांत्वन करायलाही गेले होते. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंशी असलेला दोस्ताना शिवसेनेने कधीच लपवलाही नव्हता. तेव्हा म्हणजे २००४ च्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानही बाळासाहेबांनी याविरोधातली उघड भूमिका घेतली होती. पण त्याचा परिणाम शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक ठरला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात असंतोष असतानाही मराठा मतांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष बनला होता. आणि सत्तेचा घास शिवसेनेच्या तोंडात येता येता राहिला होता. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेने अशी भूमिका मांडणं, तीही बाळासाहेबांनी मांडणं, हे महत्त्वाचं आहे.
   
     'मला हवं ते मी करतो. मराठ्यांच्या महाराष्ट्रात मी 'बामण' मुख्यमंत्री करून दाखवला', असं बाळासाहेबांनी याच भाषणात सांगितलं. तशाच कुणाचीही पर्वा नसणा-या ठाकरी नादात ही भूमिका मांडली असेल असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवसेनेत कधीच जातपात पाहिली जात नाही, असं वारंवार सांगितलं जातं. बाळासाहेब असोत किंवा यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशा मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक जीवनात जातपात आणि धर्मवाद यांना कुठेच थारा नसतो, हे खरंच. त्यांनी कधी कोणाला एखाद्या जातीचा म्हणून जवळ केलं किंवा एका धर्माचा म्हणून दूर लोटलं असं झालेलं नाही. म्हणूनच ते एवढे मोठे बनू शकले. पण याचा अर्थ असा बिल्कूलच नाही की त्यांना राज्याच्या जातींची माहिती नाही. आणि राजकारण करताना त्यांनी जातीची समीकरणं केलेली नाहीत. पवारांना महाराष्ट्राच्या समाजरचनेचा अभ्यास कुणाही अभ्यासकापेक्षा अधिक आहे. पण बाळासाहेबांच्या बाबतीतही ते तितकंच खरं आहे. महाराष्ट्रीय समाजजीवनाविषयी सर्वाधिक सखोल लिखाण करणा-या प्रबोधनकार ठाकरेंचे ते पुत्र आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांचा पाया पक्का आहेच. पण एका जाणकार पत्रकाराच्या नजरेतून त्यांनी महाराष्ट्र अनेकदा पायाखाली घातला आहे. त्यांचा लोकसंग्रहही महाप्रचंड आहे. त्यामुळे त्यांना राज्यातल्या जातींची, त्यांच्या मानसिकतेची तपशीलात जाण आहे, हे केवळ तर्कानेही समजून घेता येऊ शकतं. त्यांचे अनेक भाषणांमधले बिटविन द लाईन्स पंच हेच वारंवार सिद्ध करत आलेले आहेत. या जातींच्या बारीक अभ्यासामुळेच जातीच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं राजकारण य़शस्वीपणे त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे ते जातीपातींच्या पलीकडे वाटत राहिले. पण जिथे प्रेमदेखील पोटजात पाहून केली जाते, तिथे निवडणुकांचं राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन करणं शक्यच नाही.

     'जय महाराष्ट्र' या प्रकाश अकोलकरांच्या शिवसेनेवरच्या पुस्तकात एक वाक्य आहे, सवर्णांनी मराठ्यांविरुद्ध आणि दलितांनी महारांविरुद्ध केलेलं बंड म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या जातीच्या गणिताचा एक अंदाज या वाक्यातून कळू शकतो, म्हणून हे महत्वाचं आहे. पण अर्थातच ते अंतिम सत्य नाही. कारण शिवसेनेत मराठाही मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या लोकप्रतिनिधींमधेही मराठ्यांचं प्रमाण कायमच मोठं आहे. विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांचा एक फार मोठा गट शिवसेनेच्या पाठिशी कायम उभा राहिलाय. शेकापच्या मराठा राजकारणावर घडलेल्या परभणीसारख्या मराठाबहुल जिल्ह्यावरची सेनेची पकड, हे त्याचं ढळढळीत उदाहरण. तरीही शिवसेनेने मराठा संघटनांच्या विरोधातली भूमिका घेण्याचं धाडस सहजपणे दाखवलंय. कायम मराठ्यांच्या प्रस्थापित नेतृत्वाला विरोध करताना त्यांनी छत्रपती शिवराय, भगवा झेंडा, जय भवानीचा गजर अशी मराठा संघटनेसाठी वापरलेली प्रतीकं यशस्वीपणे वापरलीत. ओबीसी हा शिवसेनेचा सर्वात मोठा आधार. पण तरीही बाळासाहेब मंडलच्या विरोधात उतरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रबोधनकारांच्या काळात घरोब्याचे संबंध असतानाही त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला होता. हिंदू देव देवतांच्या विरुद्ध प्रबोधनकारांची लेखणी जितक्या सडेतोडपणे चालली तितकी अन्य कुणाचीच चालली नाही. तरीही बाळासाहेबांनी रिडल्सला विरोध केला. एका ब्राह्मणाला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं. हे सगळं राजकीय समीकरणांमधे तोट्याचं वाटत असतानाही केलं.

     त्या त्या वेळेस त्यांना मूर्ख ठरवण्यात आलं. पण लांबवरच्या राजकारणात त्याचा फायदाच झाला. मला वाटतं ते मी करतो, असा बेफिकीरीचा आव यात असला तरी त्यात राजकारणाचं एक सूत्रं आता शोधता येतं. त्यामुळे आताही मराठा संघटनांच्या विरोधातली भूमिका वा-यावर सोडून देता येणार नाही. कारण याच मराठा संघटनांमधील बहुतांश नेते आणि कार्यकर्ते काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. काही तर आजही आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवरही शिवसेनेचाच प्रभाव आहे.

--सचिन परब
(Tuesday, 28 December 2010)
----------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-परब सचिन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.