अनुक्षरे…माझे विश्व…-विसरलेली तारीख…

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:39:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "अनुक्षरे...माझे विश्व..."
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "अनुक्षरे...माझे विश्व..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विसरलेली तारीख..."

                                     विसरलेली तारीख...
                                    ----------------

     तिच्या नवीन नोकरीचा पहिला दिवस म्हणून वडिलांनी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जाण्याचे ठरविले. ह्रदयाच्या आजाराने निवृत झाल्याबरोबर डोके वर काढले. कन्येची नोकरी हे त्यांचे स्वप्न पूर्ण होत होते.समजूतदार,मनमिळाऊ,कर्तबगार जावई मिळाला, नातू बागडायला लागला, लहानीची छकुली, ह्यांचात रमण्याची वेळ. मुलाचे करियर बहरताना पहायचे होते. आई शी निवांत गप्पा करायच्या होत्या. असे मनसुबे वडिलांनी निवृत्त होईन तेंव्हा रचले होते. फार मोठ्या हुद्द्यावर काम केले. निवांत आयुष्य रेखाटले होते. एक हि दिवस विष्णू सहस्त्र नाम शिवाय गेला नाही.

     संसार व परमार्थ ह्यांची सांगड उत्तम घालून प्रपंच नेटका केला. पण नियतीचा डाव वेगळा होता. हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या दिवशी आय. सी. यु. त्यांना ठेवले गेले. लेकीचे जाणे सुरु झाले. तिच्या नवीन नोकरी बद्धल हितगुज करीत होते. वडिलांचा वाढ दिवस आला. तिने त्यांना शुभेश्च्या पत्र दिले. आवर्जून नातवंड आली म्हणून केक आणवून घेतला.आबा, आबा करीत तीही रमली. उपचार करता करता दोन महिने झाले.

     एक दिवस त्यांची तब्येत खालावली. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. घरची व्यवस्था हादरली कोण कोणाची समजूत काढणार? धीर गोळा करून सगळे जमले. नातवंडाचा पापा घेतला. पण त्यांची कन्या मात्र शून्यात नजर लावून बसलेली पहिली. आय. सी. यु. त थांबता येत नाही. म्हणून सर्व खाली त्यांच्या खोलीत बसली. थोडा थोड्या वेळ आई,ती,भाऊ,बहिण, जाऊन येत होते. तपासण्या सुरु होत्या. लेक बाबां पाशी गेली. वडीलांनी तिचा हात घट्ट हातात धरला व म्हणाले," माझी जाण्याची वेळ आली" लेक भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. हे अश्रू पण नको त्या वेळी डोळ्यात येतात व ते पुसण्यासाठी डोळे बंद होतात व आपले माणूस क्षणभर दिसत नाही.

     मला जाऊदे बाळा. विष्णू नेण्यासाठी आले आहेत. वर बघ किती सुरेख रथ आणला आहे. तुझी कार कशी मी खिडकीतून पहिली होती तसाच सुंदर रथ आहे.नमस्कार कर. लेकीने वर पाहून नमस्कार केला तिला बाबांचे विष्णू वरचे अगाध प्रेम माहिती होतेच पण बाबांच्या वाक्यांवर प्राणापेक्षा जास्त विश्वास होता . बाबा ते नंतर येणार नाहीत का? वेडाबाई, ज्याचे मी आयुष्यभर नाम घेतले त्यांना माझ्या स्वार्था करता परत पाठवले तर यम येईल. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा अडकेन. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यालाही मी हवा आहे. नारायण परत जातील हि, पण मला पुन्हा दिसणार नाहीत. बाबांचे ऐकतेस न बेटा.मला जाऊ दे. ती नाही नाही म्हणत होती, मी आईला बोलावते. नको जगत नियंत्र्याला आपण थांबवणे योग्य नाही. बाबा पुन्हा भेटाल का? हाक. मारली तर दिसाल का? स्वप्नात येऊन गप्पा कराल का? लेक प्रश्न विचारून भंडावत होती. मी विष्णू च्या चरणा पाशीच आहे. माझे देवाचे काम झाले कि तुझा हा हट्ट पूर्ण करीन.

     कन्येला देवाची गोष्ट सांगत होते. तिला समाधान कसे मानावे ते शिकवत होते. वडिलांचा मृत्यू सकारात्मक घेण्यासाठी तिला तयार करीत होते. तिच्या जीवना करिता, संसारा करिता, माहेर करिता तिचाच आधार तिला देवून भक्कम करीत होते. निरोप घेत नव्हते तर जीवन शिकवत होते. हृदयाच्या वेदना काळजाच्या तुकड्याकरिता पण ठेऊन जात नव्हते. वडिलांना यमाच्या ताब्यात कसे द्यावे लेकीला प्रश्न पडला. विष्णू ला स्वीकारत 'ह्नं' असा उच्चार निघाला. लेकीच्या डोक्यावर हात ठेवून बाबांनी डोळे बंद केले. ती शांत पणे बाहेर पडली. आईचा आकांत तिला पाहवत नव्हता पण कितीही संकट आले तरी ती आता एकटी नव्हती. विष्णू स्थाना वरून तिचे बाबा तिला पाहत होते. तिला कधीही स्वप्न पडले नाही, कि तिला कधी बाबा दिसले नाहीत. एकच समाधान होते कि तिच्या मूळे बाबा देवापाशी पोहचले, यमा पासून तिने त्यांना वाचवले. बाबांची कन्या, त्यांची मृत्यू ची तारीख पण विसरली. दर वर्षी आईला विचारते आई बाबा २३ ऑगस्ट ला गेले का २४ तारखेला. कारण ह्या गोष्टीला १० वर्ष झाली. एक हि दिवस ती वडील नाहीत हे लक्षात ठेवत नाही. फक्त त्यांचा वाढदिवस ११ ऑगस्ट चा साजरा करते. योगायोगाने तिच्या सासऱ्यांचा म्हणजे तिच्या बाबां चा पण वाढदिवस त्याच तारखेला आहे.लेक आता सासरी बाबां करिता जाते.

     देव आहेत का? यम आहे का? ह्या गोष्टीना महत्व नाही. लेकी साठी मात्र बाबा सकारत्मक दृष्टीकोन देवून गेले. अशी विसरलेली तारीख, असा निरोप, नव्हे तर अशी जीवनाची नव्याने करून दिलेली ओळख.

--अनुक्षरे
(31 ऑक्टोबर, 2009)
---------------------

                       (साभार आणि सौजन्य-अनुक्षरे.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.