श्रीरंग गायकवाड-अमृताचा घनू--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:49:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीरंग गायकवाड"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "श्रीरंग गायकवाड" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अमृताचा घनू"

                                  अमृताचा घनू--क्रमांक-2--
                                  ----------------------

--पं. हृदयनाथ मंगेशकर- तुला तांत्रिक प्रश्न विचारतो. बाबांचा सूर सफेद चार, काळी तीन, सफेद पाच असा होता. त्या सुरात तू गायचीस. जन्मत: तुझा सूर उंच होता?
--लता मंगेशकर- हो पहिल्यापासूनच माझा सूर उंच होता. मी सुरुवातीला प्ले बॅक सिगिग सुरू केले, तेव्हा एस. मुखर्जींनी सांगितलं की, हिचा आवाज अगदी पातळ, लहान मुलीसारखा आहे. तो हिरॉईनला मॅच होणार नाही. त्यांनी शहीद सिनेमाला माझा आवाज नाकारला. पण मास्टर गुलाम हैदर मला घेऊन गेले. कामिनी कौशल त्यांची हिरॉईन होती. तिचा आवाज पातळ होता. तिच्याही पेक्षा जाड आवाजाची सुलताना नावाची बाई होती. त्यांनी तिच्यासाठी माझा प्लेबॅक घेतला. माझी गाणी चांगली चालली. नंतर मी नर्गीस, मधुबाला यांच्यासाठी गायले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर- बाबांसोबत तुला रंगमंचाची सवय झाली. बाबांच्या कंपनीत कामाची काय पद्धत होती?
--लता मंगेशकर- बळवंत संगीत कंपनी बाबांनी सुरू केली. बाबा रेडिओसाठी मुंबईला गेले होते. पंढरपुरात गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश होता. ते लहानपणापासून आमच्यासोबत होते. ते 'पुण्यप्रभाव' बाबांशिवाय करणार होते. त्यात बाबांची भूमिका गणूमामा करणार होते. मी त्याला 'पुण्यप्रभाव'मध्ये काम करण्याचा हट्ट धरला. मी गाणी पाठ केली आणि पहिल्यांदा स्टेजवर पाय ठेवला. बाबांसोबत नारद झाले, त्याच्याही ही आधीची गोष्ट. स्टेजवर मी थरथर कापत होते. इतकी घाबरले होते की, मला बोलता येईना. त्या प्रयोगानंतर मात्र मला सराव झाला. मुंबईहून आल्यावर बाबांना हे कळलं. त्यांना नाटकात काम करणे आवडायचे नाही. एवढंच काय पण नाटक बघितलेले, नाटकात काम केलेले, अगदी सिनेमा बघितलेलेही त्यांना आवडायचे नाही. कपडे ते सांगतील तसेच आम्हाला घालायला लागायचे. माईनेही नऊवारी साडीच घालण्याचा त्यांचा आग्रह असे. ते अत्यंत आर्थोडॉक्स होते. तोंडाला पावडर लावायची नाही, मेकअप करायचा नाही, असा त्यांचा दंडक होता. आम्ही बाबांसमोर काहीच बोलायचो नाही. मला म्हणाले, नाटकात काम केलेस, 'फुट्टल मागे ले' असे गोव्याच्या भाषेत बोलले. तिथे दिनकरराव ढेरे होते. काबंडा नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांना सांगितले, दिनू, तू याचे म्युझिक कर. ते फार छान गायक होते. यांना कामं करायचीत ना, मी बाल बलवंत संगीत कंपनी काढतो, कोठीवाल्यांना सांगितलं, तुम्ही 'गुरुकुल' लिहा. मी, मीना आणि दोन छोटी मुलं, चंद्रकांत गोखले आणि दोघे जण होते. ते नाटक बसवलं. पहिल्यांदा ते पंढरपूरलाच केलं. दोन-तीन शो करून ते नाटक थांबलं. त्यानंतर मी ते प्रसिद्ध नारदाचं काम केलं.

--पं. हृदयनाथ मंगेशकर- गुलजारांनी परिचय नावाचा सिनेमा काढला होता. गाताना नायकाला खोकला येतो. त्याची मुलगी ते गाणं पूर्ण करते, असं गुलजारांनी मला सांगितलं होतं.
--लता मंगेशकर- खोटं आहे ते. माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधीही घडला नाही. मी भैरवी नावाचा सिनेमा काढणार होते. रोशनलाल म्युझिक डायरेक्टर होते. त्याचा मुहूर्त नौशादनी केला. त्या सिनेमात दिनकरराव पाटलांनी असा प्रसंग घातला होता. पण तो पिक्चर झाला नाही. तो प्रसंग राजकपूरने 'सत्यम् शिवम् सुंदरम्'मध्ये घातला.

--पं. हृदयनाथ मंगेशकर- संगीत दिग्दर्शकाची चाल आणि नायिकेचं वय यांच्याशी तू नेहमी एकरूप होतेस. त्यासाठी तू काही खास प्रयत्न केलेस का?
--लता मंगेशकर- मी अनेक लहान मुलांसाठी गायले. लक्ष्मीकांत प्यारेलालसाठी 'ज्ञानेश्वर'मध्ये मी एक गाणं गायलं. 'एक दोन तीन चार, भैया बनो होशियार' हे मुक्ताबाईच्या तोंडी गाणं होतं. मी पंधरा-वीस मिनिटे गप्प बसून विचार केला की, लहान मुलगी कशी गाईल... लहान मुले काही ताना मारून गात नाहीत. माझ्या मते मी ते गाणं अत्यंत चांगलं गायलं आहे.

--श्रीरंग गायकवाड
(MONDAY, 20 DECEMBER 2010)
------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-श्रीरंग गायकवाड.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.