श्रीरंग गायकवाड-अमृताचा घनू--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:52:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीरंग गायकवाड"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "श्रीरंग गायकवाड" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अमृताचा घनू"

                                  अमृताचा घनू--क्रमांक-4--
                                  ----------------------

--पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत आणि विनायकरावांच्या मृत्यूमुळं तू पार्श्वगायनात आलीस...
--लता मंगेशकर - बाबांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी विनायकरावांचा मृत्यू झाला. १९ ऑगस्ट १९४७ला विनायकराव वारले. त्यानंतर बरोब्बर १०व्या दिवशी मला प्लेबॅक सिगिगचं काम मिळालं. पापा बुलबुले वरती राहायचे. त्यांच्याकडे मोटारसायकल होती. त्यांनी म्युझिक डायरेक्टर हरिश्चंद्र बाली यांच्याकडे मला मोटारसायकलवर बसवून ताडदेवला नेले. त्यांना नवीन सिगर हवा होता. माझं गाणं ऐकून बालींनी मला ३०० रुपये अॅडव्हान्स दिला. या सिनेमातलं एक ड्युएट आणि एक सोलो गाणं एका पठाणानं ऐकून माझ्याविषयी मास्टर गुलाम हैदर यांना जाऊन सांगितलं. त्या वेळी ते 'शहीद' करीत होते. मास्टर गुलाम हैदर पियानो छान वाजवायचे. मला त्यांनी गाऊन दाखवायला सांगितले. मी 'मैं तो ओढू गुलाबी चुनरिया' हे त्यांचेच गाणे गायले. पण मी खूप घाबरले होते. कारण ते खूप मोठे होते. मी 'बुलबुल मत रो यहाँ' हे गाणेही ऐकवले. त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलावले. ते सकाळी १० पासून संध्याकाळी ५ पर्यंत रेकॉर्डिंग करत होते. आम्ही जेवणा-पाण्यावाचून बाहेर बसलो होतो. त्यानंतर त्यांनी माझं 'बुलबुल मत रो' हे गाणं रेकॉर्ड केले आणि निर्माते एस. मुखर्जींना हे गाणे ऐकवलं. पण मुखर्जींनी ते गाणं नाकारलं. हे गाणं हिरॉईनला मॅच होणार नाही म्हणाले. त्यावर 'तुम चलो मेरे साथ, ये लोग मुझे याद करेंगे की मैने एक आर्टिस्ट को लाया था,' असं म्हणाले. मग प्लॅटफॉर्मवरच आम्ही गाण्याची प्रॅक्टीस केली. त्यांनी मला मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये नेले. अक्का आणि मी तिथे गेलो. तिथे 'अब डरने की कोई बात नहीं, अंग्रेजी छोरा चला गया' हे गाणे मी आणि मुकेशकडून गाऊन घेतले. ते खेमचंद प्रकाश यांनी ऐकले आणि मला बोलावले. त्यांनी 'चंदा रे जा रे जा रे' हे 'जिद्दी'मधील गाणे माझ्याकडून गाऊन घेतले. अनिल विश्वासने ते गाणे ऐकले आणि गर्ल्स स्कूल सिनेमाची दोन गाणी माझ्याकडून रेकॉर्ड करून घेतली. एक दिवस मुकेश माझ्याकडे नौशादचा निरोप घेऊन आले. तोपर्यंत श्यामसुंदर यांचे 'बाजार'मधील 'साजन की गलियाँ छोड के...' हे गाणे मी गायले होते. नौशादने ते गाणे ऐकून 'कुछ भी करके लता को लाओ'चा आदेश दिला. मी म्हणाले, मी येणार नाही. सगळेजण नुसतीच ट्रायल घेतात. पण आग्रहामुळे गेले. त्यांनी माझी खूप तारीफ करीत 'साजन की गलियाँ छोड के' गायला लावले. गझल गायला लावली आणि पिक्चर पूर्ण झाला आहे, पण तुझे एक गाणे टाकायचे आहे, असे सांगितले. ते गाणे गुलाम मोहम्मद यांनी रेकॉर्ड केले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - 'आयेगा आनेवाला' या गाण्याने तुला सगळा हिदुस्थान ओळखू लागला...
--लता मंगेशकर - त्याचे निर्माते बॉम्बे टॉकीज होते. गुलाम हैदर पाकिस्तानला जाणार होते. घाईघाईत आम्ही 'आयेगा आनेवाला' केले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - मास्टरजी कसे शिकवायचे? त्या गाण्यात अडीच मिनिटे शेअर चालतो, नंतर गाणे सुरू होते, ते कसे शिकवले?
--लता मंगेशकर - खेमचंद प्रकाश स्वत: गायचे. ते राजस्थानी होते. ते मला गाण्यातील प्रत्येक गोष्ट शिकवायचे. स्वत: म्हणून दाखवायचे. सोबत त्यांचे असिस्टंट भोला श्रेष्ठ होते.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - या गाजलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेवर गायकांची नावं नसायची...
--लता मंगेशकर - गायकांची नावे ध्वनिमुद्रिकेवर किवा चित्रपटातही नसायची. त्यासाठी मी संघर्ष केला. मी निर्मात्यांकडे याविषयी तक्रार केली. मी बऱ्याच गोष्टींसाठी भांडणे केली. त्यातील एक म्हणजे, प्लेबॅक सिगरचे नाव पडद्यावर यावे. हे नाव पहिल्यांदा आले, ते राजकुमारच्या 'बरसात'मधून... सगळेच लोक मग ही नावे घालू लागले. प्लेबॅक सिगरला रॉयल्टी मिळावी म्हणून भांडणे केली. त्याचा त्रासही झाला. शेवटी असोसिएशन बंद झाली.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी, दोन-तीन पिढ्या गाऊन निघून गेल्या. तुझ्या आवाजाची जादू मात्र अजूनही कायम आहे. त्यामागे काय तपश्चर्या आहे?
--लता मंगेशकर - मला गुलाम हैदर यांची सोबत फार थोडी मिळाली. पाकिस्तानला जाताना त्यांनी एक गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर एचएमव्हीमध्ये त्यांनी मला अर्धा तास लेक्चर दिले. त्याचा माझ्या गाण्यावर खूप परिणाम झाला. ते मला मेमसाब म्हणत. गाण्याचे बोल काय आहेत, कोणत्या कॅरेक्टरसाठी गायचे आहे, हे समजून घे. विचार करून गा. गाण्यातील प्रसंग दु:खी असेल तर तूही दु:खी होऊन गा, असे ते म्हणाले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझे बाराही सूर बरोबर जातातच. पण तुझ्या सर्व श्रुत्या फार बरोबर लागतात. त्याचा परिणाम खूप चांगला असतो. वयोमानानुसार आवाजाची जात बदलली तरी ते चांगले वाटते. त्या श्रुत्यांचा अभ्यास तुझ्याकडून कोणी करून घेतला?
--लता मंगेशकर - बाबा आणि देवानं... खूपशा गोष्टी मला नॅचरली मिळाल्या. सूर लागणे ही दैवी देणगी. त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. मी कधीही गाण्यात चूक करत नाही.

--श्रीरंग गायकवाड
(MONDAY, 20 DECEMBER 2010)
------------------------------------

               (साभार आणि सौजन्य-श्रीरंग गायकवाड.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.