श्रीरंग गायकवाड-अमृताचा घनू--क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:54:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीरंग गायकवाड"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "श्रीरंग गायकवाड" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अमृताचा घनू"

                                  अमृताचा घनू--क्रमांक-5--
                                  ----------------------

--पं. हृदयनाथ मंगेशकर - खेमचंद प्रकाश किवा अलीकडे ए. आर. रेहमानपर्यंत तू गायलीस. आज काळ बदलला आहे. तू ६२ ला 'ऐ मेरे वतन के लोगो' गायलीस आणि पंडित नेहरूंच्या डोळ्यांत पाणी आले. आपण चीनसोबतच्या युद्धात हरलो होतो, त्याबद्दल सांग...
--लता मंगेशकर - पंडितजी त्या वेळी अतिशय दु:खी होते. मी थोडी आजारी होते. त्यामुळे हे गाणे मी आणि आशा करते, असे प्रदीपजींनी सांगितले. त्याप्रमाणे आशा गेली. तिने एक रिहर्सल केली. पण नंतर काय झाले ते माहीत नाही. पण तिने येऊन सांगितले की, मी दिल्लीला येणार नाही. तिला हेमंतकुमारांनी सांगितले, 'तुम नहीं जाओगी तो अच्छा नहीं लगेगा. पुरी इंडस्ट्री जा रही हैं. देश की हालत अच्छी नहीं.' पण ती म्हणाली, 'मैं बाद में जाऊंगी, अभी नहीं.' ते गाणे अर्धवट झाले. सी. रामचंद्रांनी ते गाणं माझ्याकडे एका टेपवर पाठवून दिलं. मी दिल्लीला चार दिवस आधी जातोय. तू हे गाणं पाठ करून गा, असा निरोप पाठवला. मी घाबरले. यात जर चूक झाली तर काय करणार? मी आजारी असताना निघाले. माझी मैत्रीण नलू आणि मी ती टेप प्रवासात ऐकली. हॉटेलवर उतरल्यावर टेप लावली आणि सगळं गाणं पाठ केलं. दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीला शो होतो. मी कुठल्याही म्युझिक डायरेक्टरसोबत गाणार नाही. माझ्या म्युझिक डायरेक्टरसोबत 'अल्ला तेरो नाम' आणि 'ए मेरे वतन के लोगो' गाते म्हणाले. 'ए मेरे वतन'साठी सी. रामचंद्र होते. पण 'अल्ला तेरो नाम' मीच गायले. ए मेरे वतन के लोगो लोकांना खूप आवडले. गाणं एकून पंडितजी रडतील, इंदिराजींच्या डोळ्यांत पाणी येईल, असे मला वाटले नव्हते. मी गायले आणि आत आले. एक कप कॉफी मागितली. स्टेजवर सुमन कल्याणपूरकर गात होती. तसेच मेहबूबसाहेब मला विचारत आले. त्यांचे आणि पंडित नेहरूंचे संबंध चांगले होते. पंडितजींनी मला बोलवल्याचा निरोप त्यांनी आणला आणि मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मी गेल्यावर पंडितजी, इंदिराजी आणि राधाकृष्ण उभे राहिले. पंडितजी म्हणाले, 'आज तुमने मुझे रुला दिया...'

--पं. हृदयनाथ मंगेशकर - हे गाणे गाताना तुझ्या मनावर काही परिणाम होत होता का? कारण त्या वेळी वातावरण तसे होते...
--लता मंगेशकर - नाही. पण ते गाणे इफेक्टिव्ह होते, हे मला माहिती होते. मला ते गाणे आवडले आणि ते मी मन:पूर्वक गायले एवढेच. कुठलेही गाणे मी मनापासूनच गाते. उडवाउडवी करत नाही. नंतर ते किती चांगले होते, ते ऐकणाऱ्यांनाच माहिती.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तू सध्याचे संगीतकार, गायक यांना काय सांगू इच्छिते?
--लता मंगेशकर - आता काळासोबत सगळेच बदलले आहे. आजच्या १० पिक्चरमधला मुश्कीलीने एखादा बरा वाटतो. इंडस्ट्रीत पूर्वी म्युझिकला प्राधान्य होते. 'मुगले आजम'मध्ये १२ गाणी होती. पिक्चर चालला नाही, तरी गाणी चालायची. आता पिक्चरमध्ये आयटम साँग आली. त्यात नुसता डान्स असतो. ड्युएट गाणी असतात. सोलो गाणी जास्त करून मुलांची असतात. आता म्युझिकला महत्त्वच देत नाहीत. दोन-तीन गाण्यांतच पिक्चर संपतो. संगीत करणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे संधी राहिलेली नाही. काही प्रोड्युसर तर एका पिक्चरसाठी पाच-पाच संगीतकार ट्राय करतात. सिगर आणि संगीतकारांना आता मान राहिलेला नाही. कवी तर नाहीतच. तू नाव घे, तीनच नावे येतात. गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी. त्या वेळी जेवढे संगीतकार तेवढे कवी होते आणि ते अतिशय चांगले होते.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - अभिरुची अशी खाली आणण्याचा दोष प्रेक्षकांचा की निर्मात्यांचा?
--लता मंगेशकर - अभिरुची खाली करण्याचे काम तुमचेच. तुम्ही जे पिक्चर देता, ते बघून प्रेक्षकांना आयटम साँग, डान्स, छोटे कपडे घालून आलेल्या मुली आवडतात. सध्या तर टीव्हीवर घाणेरड्या, न बघवणाऱ्या जाहिराती लागतात. त्या लहान मुले बघतात. त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तू वाढदिवसाच्या निमित्ताने या संगीतकारांना काय सांगू इच्छिते?
--लता मंगेशकर - मी सर्व गायक आणि गायिकांना सांगू इच्छिते की, गाण्यातील प्रत्येक गोष्ट, म्हणजे काव्य, चाल, कोणासाठी गाताय, गाणे काय आहे हे सगळे विचारात घेऊन गावे. लता, आशा, रफिक, किशोरकुमार यांना गाणी मिळत गेली. आज नवीन लोकांना गाणीच मिळत नाहीत. त्यांना सलील चौधरी, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, आर.डी. बर्मन असे संगीतकार मिळत नाहीत. आणखीही एक गोष्ट आहे. जतीन-ललित हे बंधू चांगले संगीतकार होते, पण ते विलग झाले. हल्ली प्रत्येक गोष्टीत असे होत आहे.
शेवटी प्रेक्षकांना एवढेच सांगेन की, त्यांना गेली ६० वर्षे माझं गाणं आवडलं. त्यांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात. शेवटपर्यंत हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्यावेत...

--श्रीरंग गायकवाड
(MONDAY, 20 DECEMBER 2010)
------------------------------------

              (साभार आणि सौजन्य-श्रीरंग गायकवाड.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
             --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.