ऐसी अक्षरे मेळवीन !-निसर्गाचे संगीत…क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:56:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "ऐसी अक्षरे मेळवीन !"
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल विजय कुलकर्णी यांच्या  "ऐसी अक्षरे मेळवीन !" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "निसर्गाचे संगीत..."

                             निसर्गाचे संगीत...क्रमांक-१--
                            ------------------------

     कालच्या विकांताला (बऱ्याच काळानंतर) उंडगायला बाहेर पडलो होतो, सहकुटुंब! 'पाऊस' असा छान बरसत होता की जणु काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्‍यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरूवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा..

     पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते.

वेस लांघूनी क्षितीजाची
घन सावळे बरस बरसले
प्रिया बावरी धरा नटावी
नभांत ओले रंग पसरले

     एखाद्या नव्वदी ओलांडलेल्या आजीच्या चेहऱ्यावर पसरलेल्या सुरकुत्यांच्या जाळ्यात एखादी तिच्याच वयाची जुनी बालमैत्रीण भेटल्यावर अचानक एक गुलाबी रंगत यावी. दाताच्या बोळक्यातून निरागस, निष्पाप हांसू फुलावं तशी गेल्या ग्रीष्मात होरपळुन निघालेली धरा वर्षेच्या भेटीने नखशिखान्त बहरुन आली होती. हिरवाईचं हंसू लेवुन गवतफुलांच्या कुंदकळ्या चमकवीत वसुंधरा हर्षभरीत होवून गंधाळली होती.

गंधरांगोळ्या रंग रंगल्या...
काळी माती, धवल जलफुले
अलवार बहरली निळावंती
करीत कलरव खग निघाले

     तो सोहळा पाहुन आभाळालाही भरून आले नसते तरच नवल. त्यात पावसाच्या आगमनाने धुन्द झालेल्या पक्षीराज मयुराचा केका आसमंतात घुमायला लागला आणि भारावलेली सृष्टी आनंदोत्सव साजरा करु लागली. वातावरणात झालेला बदल पक्ष्यानाही सुखावून गेला होता. त्याची लगबग सुरु झाली. घरट्याची दरूस्ती करायची होती. मोसमासाठी पुरेसे अन्न जमा करून ठेवायचे होते. जो तो कामाला लागला होता. इतके दिवस मरगळुन गेलेल्या निसर्गाने नवी उभारी घेतली आणि आपले साम्राज्य हिरवाईच्या पार्श्वभूमीवर विविधारंगानी रंगवण्यासाठी आपला जादुई कुंचला हातात घेवून तो सिद्ध झाला.

धुंद नाचती मोर काननी
निळे-सावळे मेघही भिजले
सुखे आनंदी विहग बोलती
जलदांचे कुजन नभी रंगले

     झाड़े, पाने, वेली, झरे-कालवे सगळेच आपापल्या परीने पावसाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. वनदेवीने आनंदविणेवर मल्हार छेडला. आता त्यालाही राहवेना. तो सगळा संकोच बाजूला ठेवून अनंत धारांच्या रूपाने सखीकडे झेपावु लागला. आला, आला हो.... पाऊस आला.

--विशाल विजय कुलकर्णी
(जुलै 21, 2022)
----------------------

               (साभार आणि सौजन्य-मागे वळून पाहताना.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              -----------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.