ऐसी अक्षरे मेळवीन !-निसर्गाचे संगीत…क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:58:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "ऐसी अक्षरे मेळवीन !"
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल विजय कुलकर्णी यांच्या  "ऐसी अक्षरे मेळवीन !" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "निसर्गाचे संगीत..."

                             निसर्गाचे संगीत...क्रमांक-2--
                            ------------------------

त्या जलधारा, मुग्ध तरुवर
अंग-अंग तव मृदगंधे सजले
स्तब्ध वारा सांगतो निर्झरा
आनंदी जगणे बघ गाणे झाले

     निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते ! आमच्या शांताबाई (शेळके) म्हणतात...

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

     खरेतर समस्त निसर्गातच इतके संगीत ओतप्रोत भरलेले आहे की इतर कुठल्या मानवनिर्मित संगीतसाधनांची, वाद्यांची गरजच पडू नये. सतत कानावर येणारा भुंग्याचा गुंजारव, या फुलावरुन त्या फुलाकडे जाताना त्यांच्या पंखांची हळुवार आवाजातली गुणगुण किती श्रवणीय असते. कधी शांत, कोमलपणे तर कधी बेभान होत वाहणाऱ्या समीराची कानात साठवून ठेवावीशी वाटणारी सळसळ नेहमीच मनाला मोहवून टाकते.

कोयल की कुहू कुहू
पपिहे की पिहू पिहू
जंगल में झिंगुर की झाये झाये

     कोकिळेची 'कुहू कुहू साद, राव्याचा 'पीहू पीहू ' नाद आणि पाऊसकिडय़ांचा अनवरतपणे कानावर येणारा ध्वनी, यांनी सगळ्या निसर्गाचेच संगीत बनवले आहे. लचकत, मुरडत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांचे गाणे ऐकलेय कधी?

     त्या गायला लागल्या की तो किनाराही त्यांना आवेगाने साथ देतो . त्या प्रवाही लाटा व स्तब्ध किनारा यांच्या सोबतीने मग कविमनही मुक्त कंठाने गाऊ लागते. ती सरगम हळूहळू सगळ्या आसमंतात झिरपायला लागते.

     आणि हे सगळे कमी असते की काय म्हणून रात्रीच्या नीरव शांततेच्या संगीतात कित्येक मानवनिर्मित गोष्टीदेखील भर घालत असतात बरं. रात्रीच्या नीरव शांततेत घड्याळाची अविरत टिकटिक, कुठेतरी दूर एखाद्या पुलावरुन जाणाऱ्या आगगाडीची धडधड. रातकिड्यांची किरकिर, कुठेतरी दूरवर निनादणारी एखाद्या मंदिराची घंटी.., या सगळ्यात एक प्रकारचे दैवी संगीत भरलेले आहे. हे मानवी मनाचे संगीत आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची, त्याचे गाणे करण्याची ही ओढ, ही हूरहूर मानवी मनात जागली की मग ते निव्वळ निसर्गाचे न राहता आयुष्याचे संगीत होवून जाते.

--विशाल विजय कुलकर्णी
(जुलै 21, 2022)
----------------------

              (साभार आणि सौजन्य-मागे वळून पाहताना.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
             -----------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.