मीऽच तो...-स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 14, 2022, 09:33:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "मीऽच तो..."
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमित यांच्या "मीऽच तो..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे  शीर्षक आहे- "स्वप्नी माझ्या येशील... का ?"

                          स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-4--
                         ----------------------------------

     याशिवाय अजून एक प्रकार म्हणजे आपल्या छातीवर कींवा पाठीवर कोणीतरी बसले आहे... आपले हातपाय जखडण्य़ात आलेत आणि इच्छा असूनही आपण मदती साठी हाका मारु शकत नाही, काही करु शकत नाही असे खूप भयानक स्वप्न पडणे. हे सुद्धा Lucid Dreaming आहे.  पण वर म्हटल्याप्रमाणेच इथेही भर स्वप्नात आपण जागे असतो,  आपल्याला शरीरावर नियंत्रण नाही हे समजते (Sleep Paralysis) आणि घाबरतो तेव्हा आपले जे काही विचार असतील ते स्वप्नात उमटतात आणि आपल्याला तसे भयानक पात्र छातीवर कींवा पाठीवर असल्याचे जाणवते.

     यावर उपाय म्हणजे स्वप्नात बदल करणे! होय,  आता जर तुम्ही असेही स्वप्नात आहात आणि तुम्हाला हे माहिती आहे तर मग थोडे अजून प्रयत्न करुन स्वप्नातच बदल करा!  काही प्रयत्नांनंतर हे ही थोड्या फ़ार प्रमाणात जमू लागते.  (भयानक स्वप्ने पडताना अचानक देवाचा धावा करता तेव्हा तुम्ही तो खरंच जागे होऊन तुमच्या तोंडाने करता की स्वप्नात करता? :) )  यासाठी फ़क्त आपण स्वप्नात आहोत आणि ते बदलणे शक्य आहे हे मान्य करता यायला हवं.

     एकदा का हे करता आलं तर मग तुम्ही आपल्या स्वप्नांच्या दिग्दर्शकाच्या हातातलं एक पात्र न रहाता त्याच्या बरोबरीने दिग्दर्शन करु लागता.  तुमचा रोल कमी महत्वाचा असेल तर वाढवू शकता,  एखादं पात्र बदलू शकता.  पण तुम्हाला पुर्ण स्वप्न मात्र बदलता येत नाही (स्वप्नांचा रोख ठरवता येऊ शकतो)  कारण तुमच्या मुख्य दिग्दर्शकाला असं काही केलेलं आवडत नाही. जास्त बदल केले की तो स्वप्नच बदलण्याची शक्यता वाढते. :)

     वर एकदा म्हटल्याप्रमाणे कधी कधी आपण नक्की स्वप्नात आहोत की सत्यात असा गोंधळ होऊ शकतो तेव्हा काय करावे?  यावरही उपाय आहे. तुम्ही जर आठवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुम्ही स्वप्नात स्वत:ला संपूर्ण कधीच पाहीलेले नाही.  म्हणूनच मग स्वप्नात आरसा आणण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला जर तुमची स्वच्छ प्रतिमा दिसली नाही तर तुम्ही नक्कीच स्वप्नात आहात.

     आजूबाजूला असलेली प्रकाशयोजना बदलण्याचा प्रयत्न करा (लाईटचे स्विच वर खाली करुन पहाणे वगैरे), ह्या गोष्टीत आपल्याला बदल करता आले नाहीत तर आपण स्वप्नात आहोत. घड्याळात कीती वाजलेत ते पहा, दुसरीकडे पहा आणि पुन्हा कीती वाजलेत ते पहा.  साधे घड्याळ असेल तर शक्यतो वेळ आजिबात बदलत नाही कींवा खूपच बदलते. तर डिजीटल घड्याळ चित्रविचित्र वेळा दाखवू शकते. दोन्ही हाताची बोटे एकावेळेस पाहून मोजण्याचा प्रयत्न करा. (हा अजून एक प्रकार... शास्त्रिय पद्धतीने पडताळलेला नाही पण मला वाटतं यानेही मदत होईल... लग्न झालेलं असल्यास बायकोचा चेहरा पहाण्याचा प्रयत्न करा. :D )

     स्वप्ने ही जागेपणी गमतीशीर वाटतात, मग भलेही ती पहाताना कीतीही आनंद, राग, भीती वाटलेली असो.  ती जगातली सर्वात जुनी मनोरंजन सेवा आहे हे विसरुन कसं चालेल?  त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांची मजा लुटणेच जास्त योग्य वाटते मला. मग... करताय तुमची स्वप्ने शेअर? ;)

--अमित
(शनिवार, ६ ऑगस्ट, २०११)
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-मीऽच तो.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2022-बुधवार.