अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:25:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "अनुभव... क्षण वेचलेले..."
                                 -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-१--
                                       --------------

     उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.झोपेच्या अंधा-या कुशीमधे तर स्वप्नांना सुध्दा बंदी होती. निर्जीव यंत्राप्रमाणे दिवसभर हात-पाय चालत होते, रक्ताचा रंग बदलत होता आणि पाण्याप्रमाणे शरीरातून निघत होता. शरीरातील एकएक तंतु गुप्त होउन काही घटकांच्या मरणयात्रेवर गेला होता. जो जीवन जगतो त्याला स्वप्न, इथे तर धड जगणं सुध्दा नव्हते. आयुष्य नावाच्या एका भेसुर आणि दुर्दैवी जन्माच्या यात्रेचा गाडा ओढायाचं काम सगळेच करत होते. दिवस येतो तो फक्त कष्टासाठी आणि मावळतो तो फक्त मरण्यासाठी. त्या अस्वस्थेतच एक जीव किनकिनत होता. निद्रा नामक तात्पुरत्या मृत्यूशय्येवर सगळे जीव निर्जीव झाले होते. मात्र त्या जीवावर लक्ष होते ते फक्त अंधाराचं. तो चाचपडत उठला आणि जोराने टाहो केला, "आयेऽऽऽऽऽ... लै पोटात दुखतयं.."

     त्या सपराच्या घरातून बराच वेळ ओरडण्याचा आवाज येत होता. तो आवाज सुध्दा त्या दिर्घ रात्रीच्या अंधाराने  गिळून टाकला. असं झालं तरी काय. कुणाला काहीच माहीत नव्हतं. अंधाराचा गडदपणा हळूहळू कमी होत गेला, तसं चित्र स्प्ष्ट दिसू लागलं. सपरांच्या घराची मोठी चाळच होती. रानात काम करणा-या गड्यांच्या संसाराची वस्ती.

     ज्वारीच्या वाळक्या कडब्याच्या आणि ऊसाच्या पाचोळ्याचे झाप बनवून भिंती तयार केलेल्या. अश्या झोपड्यांची मोठी चाळच इंदलकरानी बांधली होती. "खोपाट " म्हणायचे सगळे ह्या झोपडी सारख्या घराला. इंदलकराच्या मळ्यात हे सगळे सालाने काम करणारे आणि त्यांच्या बायका त्याच मळ्यात रोजंदारी करणा-या. सा-या वस्तीला जाग आली होती पण परश्याच खोपाट ऊघडलं नव्हतं. गंजलेल्या पत्र्याचा टेकु लावला होता. तो पत्रा म्हणजेच त्या खोपटाचा दरवाजा. बायका विहीरीवरुन हंड्याने पाणी भरत होत्या. कोणीतरी परश्याच्या दारात ठेचकळली तेंव्हा तिच्या नजरेत खोपटाच बंद दरवाजा आला. तिथेच लागलेल्या ठेसेचा राग त्या बंद घरावर काढला आणि बरोबरच्या बाईला म्हणाली, "यस्वा मेली. इंदलकराच्या मुकादमाबरोबर पाठ लावती आणि नवरा खातुया भाड."
दण्-दण पाय आपटत त्या दोघी दारातून निघून गेल्या.

     त्या वस्तीतल्या नानाच्या ही गोष्ट लक्षात आली. नाना वस्तीवरचा वयस्कर माणूस. एकटाच रहायचा. त्याने खोपटाच्या दारातून परश्याला आवाज द्यायला सुरवात केली,
  " परश्या.. ओ राज.. तुम्ही तर लका आक्रितच करतया गड्या हो. समदी निघाली तरी तुमचा उठायचा पत्ता नाय. दोघं नवरा-बायकु काय खोपडी पिऊन झोपली का काय". नानाने दारात वाट बघितली. तंबाखू  काढली आणि तिथचं मळत उभा राहिला. आतून काहीच हालचाल नाय म्हणल्यावर चुण्याच्या डबीने दार वाजवायला सुरवात केली. आतमधुन कसलाच आवाज येत नव्हता. नाना थोडा तणतणला. दोन-चार गडी त्या खोपटाच्या दारात बोलावले. त्यातला एकजण बोलायला  लागला,
"आरं काय वो हे? परश्या दारुसाठी मुकादमाची पाठ सोडत नाय अन त्याच्या बायकुची मुकादम पाठ सोडत नाय. आजुन ह्यांच्या आयला ऊठायचा तपास नाय. ऊस काढायचाय आज अन हा भाड्या झोपुन राह्यलाय".
त्यांच्यातलाच उत्तम नावाचा सालदार,"आवं ती बाई मुकादमाला करल मुका आणि परश्याला करल मुकादम आपल्या ऊरावर बसवायला. ह्याच्या आयला काढा बाहीर त्याला. गडी यायचा उशीरा तवर आपुण उरकायच्या काय त्याच्या सरी".

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.