अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:33:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "अनुभव... क्षण वेचलेले..."
                                 -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-6--
                                       --------------

     तेवढ्यात इंदलकर पायतल्या वहाणा न काढताच गाभा-यापर्यंत हातातली किल्ली फिरवत गेला. आतमधे डोकावले आणि म्हणाला, "आप्पा देतोय का नाय भैरोबा कौल बघा जरा" असं म्हणून इंदलकर आणि त्याच्या मागोमाग त्याचा मुकादम निघाला. मुकादमाने जाता-जाता दहाच्या नोटांचे बंडल नानाकडे दिले. सगळेजण मालकाच्या मागे चालायला लागले. नाना सोडून बाकीचे सगळे सालदार मनातून खुष झाले होते. मयतीचा-सुतकाचा पैका मालकाने दिला होता. सगळ्यांच्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या पदराची गाठ ज्यामधे परश्याच्या बायकोचे गंठण बांधले होते. गंठण विकून वाटून घेऊ असा विचार सगळ्यांच्याच मनात होता.

     इंदलकर गाडी जवळ थांबला. बॅगमधुन कागदात बांधलेला पानाचा विडा काढला. विड्याची अजुन एक घडी करुन पान तोंडात घातले. त्याच कागदावर दोन बोट फिरवून त्याने कागदावरचा जास्तीचा आणलेला चुना उचलला. स्वत:ची जीभ बाहेर काढून तो चुना जीभेच्या दोन्ही कडेला लावला आणि त्या चुन्याचअ आणि विड्याचा तोंडात एक प्रकारचा जाळ करुन इंदलकर सगळ्यांना उद्देशुन बोलायला लागला, "सुताक दोन दिस असलं तरी उद्या रातच्याला चौघं-पाच जण रानात पाण्यावर जा. म्या आता तालुक्याला चाललोय. पोरग हाय माझ तिकड".

     बोलत असताना त्याच लक्ष मंदीरातल्या गाभा-याकड गेलं आणि म्हणाला, "आरं कुत्र चाललय बघा आत. हाकला त्याला".
मागच्या मागेच भिका गाभा-याच्या दारात गेला आणि कुत्र्याला हाकलून परत मालकाच्या समोरच्या घोळक्यात परतला. मालक निघाला तेंव्हा भिका नानाला म्हणाला,
"नाना दिवा इझलाय वो आतला. दिसत नाय आतमधी काय बी".

     हे ऐकताच नानाच चेहरा जागेवर थिजला. त्याने आप्पाकडे बघितले. आप्पाने स्वत:च्या खिशातली काडेपॆटी नानाला दिली. नानाने हातातले पैसे भिकाकडे दिले. नाना घाई-घाईने गाभा-याकडे गेला. सगळेजण नानाच्या मागेमागे जाऊन गाभा-याच्या बाहेर उभे राहिले. नानाने अंधा-या गाभा-यात प्रवेश केला. काडी पेटवली. दिवा लावला तसा त्या अंधारामधे गंभीर मंद प्रकाश पसरला. काळ्या पाषाणातल्या भैरोबासमोर अर्जुन जसा ठेवला होता तसाच पडला होता. नानाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. अर्जुन थंड पडला होता. नानाने आशेने त्याचा पाय चोळण्यासाठी ऊचलला आणि त्याच वेळेस नानाच्या हातून अर्जुनाचा पाय गळाला. नानाने पटकन अर्जुनाल दोन्ही हातामधे ऊचलला आणि अचानक एखादा बांध फुटावा तसा नाना देवासमोर मोठ्मोठ्याने रडून अर्जुनाचा काय चुकल विचारत होता. आप्पा नानाकडे काडीपेटी देऊन तसाच मागे फिरला होता. लोक त्याला पाठमोरा  खाली मान घालुन चालताना पहात होते. अर्जुन सुध्दा गेला होता. नाना दोन्ही हातावर अर्जुनाला घेऊन गाभा-याच्या बाहेर आला आणि सगळ्यांकड बघुन म्हणायला लागला,
"अर्जुन गेला रऽऽऽऽ.... कुणी नका संभाळु ह्याला... त्यानी त्याची सोय केलीया... मलाबी नाय संभाळणार त्यो आता..."

     सगळेजण मान खाली घालुन बसले होते; पण ह्या वेळेस सगळ्यांच्याच डोळ्यातुन पाणी येत होतं. गाभा-याच्या दारात शेवटी झाला तो अश्रुंचा अभिषेक आणि गेला तो अर्जुनचा बळी. सापाचा दंश परश्याच्या घरालाच नाही पण सा-या वस्तीच्या गरिबीला झाला.
हा प्रसंग म्हणजे त्या वस्तीतल्या प्रत्येक सालदार गड्याच्या आयुष्याला झालेला सर्प्'दंश' होता.

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.