डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून..-कोसलाचे दिवस-क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:07:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून.."
                                  -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून.." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोसलाचे दिवस"

                                 कोसलाचे दिवस--क्रमांक-१--
                                ------------------------

     मी नेमाडेंची कोसला वाचली त्यावेळेस पंचवीशीत होतो. लातूरला शाहू कॉलेजला ग्रॅज्युएशन करत होतो. आमच्या वक्तृत्व मंडळाची जबाबदारी त्यावेळेस 'धुळपेरणी'चे लेखक शेषराव मोहितेंकडे होती. खरं तर अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख मला त्यांच्यामुळेच झाली. कोसलाही त्यापैकीच एक. कोसला देताना ते म्हणाले, 'एक तर कोसला वाचून तिला डोक्यावर घेऊन नाचणारे आहेत किंवा तिला कचऱ्यात फेकणारे. बघ तुझं काय होतं.' मी कोसला बद्दल ऐकलेलं होतं. आणि बहुतांश जण कोसला डोक्यावर घेऊन नाचणारेच भेटलेले होते. त्यामुळे आपण कचऱ्यात फेकणाऱ्यांच्या पंगतीत असू नये असं ओझंही जाणवलं. त्याकाळात मी झपाटल्यासारखा वाचायचो. म्हणजे एकदा पुस्तक हातात पडलं तर ते संपवल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. मग कॉलेजलाही दांडी. एक दिवस जावो की आठवडा. पुस्तक संपलं तरच दुसऱ्या कामांना सुरुवात. विश्वास पाटलांची हजार पानांची महानायक मी अशीच संपवलेली. त्या पाचही दिवसात मी हॉस्टेलची रूम सोडलेली नव्हती. कोसलाबद्दल तर मी अधिक उत्सुक होतो.

     पुस्तक असो की फिल्मस् किंवा एखादा टीव्ही प्रोग्राम. माझी दोनच मतं असतात. एक तर ती 'भारी' असतात किंवा टाकाऊ. एकदा वाचण्यासारखी किंवा एकदा पाहण्यासारखी असं मला कधी म्हणता येत नाही.. मी तसं म्हणत नाही. असं म्हणणाऱ्यांना नेमकी त्यांचीच चव कळलेली नसते किंवा ते संभ्रमित असतात असा माझा अनुभव. कोसला हातात आली त्यावेळेसही मी याच मताचा होतो. मला नक्की आठवतं,कोसला वाचायला घेतली त्यावेळेस लातूरमध्ये भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे हॉस्टेलच्या भोवती तळं साचलेलं होतं. रूमवर जाताना कोसला पाण्यात पडता पडता राहिलेली. हॉस्टेल म्हणजे पन्नास एक खोल्यांचं हॉस्टेल. सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दादा लोक राहायचे. जिथं एका खोलीत तीन जण राहू शकायचे तिथं दादा मंडळींनी स्वतंत्र खोली लाटलेली. त्यातल्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातली खोली माझी. रूम नंबर ३३.

     पुढचे दोन दिवस तरी रूम नंबर ३३ ला मी मुक्कामी होतो. मेसवाल्याला डब्बा रूमबाहेरच ठेवून जायला सांगितलं, कुठली वक्तृत्त्व स्पर्धा आली तरी जायचं नाही हे निश्चित केलं. आणि कोसला उघडली. त्यावेळेस ढगाळ वातावरणामुळे नेमके किती वाजलेत याचा अंदाज यायचा नाही. माझ्या रूमच्या खिडकीच्याबाहेर एक पिंपळाची फांदी फुटलेली होती. त्यावर पावसाच्या पाण्याचा रपरप आवाज यायचा. त्यामुळे पाऊस सुरु आहे की बंद हे बघण्यासाठी खिडकी उघडी ठेवायची गरज नव्हती. त्याच खिडकीला लागून कॉट होती. जिथं मी कोसलाची सुरुवात केली. पुस्तक आवडेल की नाही याचा अंदाज बांधायची माझी पहिली पट्टी म्हणजे तिचं पहिलं पान. म्हणजे पुस्तक आई वडिलांना अर्पण वगैरे केलं असेल तर ते नक्की दुय्यम दर्जाचं. कोसला शंभरातील नव्व्याण्णवास अर्पण केलीय. पुढच्या पानावर कुठल्या तरी तिबेटीयन ओळी छापलेल्या. त्या अजुनही समजलेल्या नाहीत. त्या समजून घेण्याच्या प्रयत्नात न पडता पुढे सुरु ठेवलं.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(SUNDAY, JUNE 27, 2010)
-----------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक शोभी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.