मेघराज पाटील-सलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:26:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "मेघराज पाटील"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री मेघराज पाटील यांच्या "मेघराज पाटील" या ब्लॉग मधील एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "सलाम... (मंगेश पाडगावकरांची कविता)"
                                                     
                        सलाम... (मंगेश पाडगावकरांची कविता)--
                       -----------------------------------
   
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद काढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों, सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणार्‍यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या,
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बाँम्ब फेकणार्‍यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
काळा बाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे सामान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लीडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखर कारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणूक फंडाला सलाम,
अदृष्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वाचणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.

सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील,
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

सलाम प्यारे भाइयों और भैनों, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

--मंगेश पाडगांवकर
------------------

--संकलन-मेघराज पाटील
(July 1, 2013)
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-मेघराज पाटील.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.