लहरीवर…विचारांच्या-मीडिया बाजार--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:30:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "लहरीवर...विचारांच्या"
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री संदीप रामदासी यांच्या "लहरीवर...विचारांच्या" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मीडिया बाजार"
                                                     
                                   मीडिया बाजार--क्रमांक-2--
                                  ------------------------

     जशी सगळीकडेच गळेकापू स्पर्धा आहे, तशी ती मीडियामधेही आहे. देशातलं न्यूज चॅनेल्सचं मार्केट अंदाजे अडीच हजार कोटीं रुपयाचं आहे. त्या जाहीरातींमधील जास्तीत जास्त वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न. त्याचाच साईड इफेक्ट म्हणजे या क्षेत्राचं झालेलं बाजारीकरण आणि चुकलेला प्राधान्य क्रम.

     मोठ्या शहरात दोन चार गाड्या जाळल्या आणि एक दीड लाखाचं नुकसान झालं तर  तर ती मोठी बातमी ठरते, दिवसभर कॅमेऱ्यासमोर तज्ञांच्या चर्चा झडतात, अधिकारी पुढारी चिंता व्यक्त करतात. नुकताच वाशिम जिल्ह्यातल्या 12 गावात सोयाबीनला आगी लावण्याच्या घटना वाढल्या. राजकीय हेवेदावे आणि अंधश्रद्धेतून फक्त 10 दिवसात थोडथोडकं नव्हे 45 लाखांचं सोयाबीन भस्मसात झालं. किती चॅनल्सवर तुम्हाला ही बातमी दिसली?  हे चुकलेल्या प्राधान्यक्रमाचं उदाहरण नाही का?

     सर्वसामान्य माणसाच्या मनातून मीडियाची विश्वासार्हता आणखी उतरली तर ते अनेकांना हवंच आहे. कोट्यामधून दोनदोन तीनतीन घरं पदरात पाडून घेणारांकडून किंवा पाकिटापासून ते जाहीरातींपर्यंत अनेक गोष्टींकडे वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांकडून तत्वनिष्ठ, परखड वगैरे पत्रकारितेची अपेक्षा करण्यात फार अर्थ नाही. पण जसे सगळे राजकारणी, सगळे पोलिस, सगळी न्याय व्यवस्था किंवा सगळी नोकरशाही भ्रष्ट नाही तसंच प्रसार माध्यमांचं. त्यामुळेच या क्षेत्रात जी काही चांगली लोक उरली आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढचा मार्ग खडतर आहे, अखंड सावधान राहून बातमीशी इमान राखावं लागणार आहे.  26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या कवरेजमधे इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गेलेली पत, आझाद मैदानावरील हिंसाचारावेळी दाखवलेल्या प्रगल्भतेनं काही प्रमाणात परत मिळवली असली तरी त्यात सातत्य आणणं गरजेचं आहे.

     अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाविरोधात झाडून सारे राजकीय पक्ष एकत्र आल्याचं चित्र देशाला पाहायला मिळालं. त्याचवेळी इ डिब्बा का कुछ किजीए असा सूर जोर धरु लागला. टीम अण्णाचा व्यवस्थित बंदोबस्त केल्यानंतर राजकारणी आता मीडियाकडे वळले आहेत असं दिसतंय.

     'चार काम वो हमारे करते है, चार काम हम उनके करते है' असं गडकरींचं वाक्य सांगत,  गडकरीं  आणि पवारांचे साटेलोटे असल्याचा आरोप दमानिया बाईंनी केला आणि क्विड प्रो को (Quid Pro Quo) हा खूप छान शब्द देशाला माहिती झाला. ज्याचा डिक्शनरीतला अर्थ आहे, A favor or advantage granted in return for something. राजकारणी आणि पत्रकारांमधल्या QPQ ची जाहीर चर्चा कधी व्हायचीच नाही. ती आता सुरु होईल. मीडियावरचा लोकांचा जो काही विश्वास आहे तो 2014 पर्यंत कमी कमी होत जाईल अशी स्ट्रॅटेजी असली तर नवल वाटायला नको.

     आत्ताचं न्यूज चॅनल्स कव्हरेज पाहिलं की मला साधारण 15 वर्षांपूर्वी आलेला मॅड सिटी सिनेमा आठवतो.One Man will Make a MISTAKE, The Other will Make it a SPECTACLE अशी टॅग लाईन.  त्यात न्यूज चॅनल्स बातमीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात हे दाखवलंय. डस्टीन हॉफमनमधला रिपोर्टर जॉन ट्रॅवोल्टाच्या अगतिकतेला मीडिया इव्हेंटचं स्वरुप देतो. त्यात तथ्य, भावनांचा बळी ठरलेला. शेवटी 'WE' KILLED HIM हे डस्टीनचं वाक्य सगळं काही सांगून जातं.

     आपल्या टीव्ही पत्रकारितेची वाट मॅड सिटीच्या दिशेनं जाऊ नये ही अपेक्षा.

--संदीप रामदासी
(05/11/2012)
----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदीप रामदासी.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.