नंदिनी-विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:35:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नंदिनी"
                                      ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती नंदिनी देसाई यांच्या "नंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विठ्ठल तो आला आला !!"

                        विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-2--
                       --------------------------------

     कोकणातल्या स्वच्छ वाड्यातुन गाडी चालवायची सवय असलेला आमचा ड्रायव्हर पंढरपूरच्या पहिल्या दर्शाने जरा गांगरलाच. समोर उक्किरडेच उकीरडे. त्यातून धावणारी डुकरे आणि कुत्री, तिथेच खेळणारी लहान मुलं, पंढरीच्या या रूपाने मी पण जरा गडबडलेच.
"अगं, इथे जरा घाण आहे. पण देवळाकदे एकदम स्वच्छ आहे." बरोबर, आईच्या माहेरकडचं गाव न!
पण आईच्या वाक्यातला अर्थ लक्षात घेऊन (लग्नाच्या यशस्वी २० वर्षाचा पुरावा) पप्पा लगेच "मी गाडी देवळात घालणार नाही. इथेच प्रसाद घेऊन ये."

     तीर्थक्षेत्रे म्हटलं की गल्लीबोळात प्रसादाची ती टीपिकल दुकानं असतातच. कुठल्याशा दुकानासमोर ड्रायव्हरने गाडी उभी केली. पप्पानी माझ्या हातात पाचशेची नोट दिली. "खूप सारा प्रसाद घेऊन ये, मी ऑफ़िसमधे वाटेन" माझ्या प्रॉमिसवर हे प्रसाद वाटणार.

     साधारणपणे पन्नास साठ रुपयाचा चुरमुरे बत्तासे असलं बरंच काही मी घेतलं आणि मागच्या ज्न्मी सरकारी अधिकारी असल्यामुळे उरलेले सुट्टे पैसे माझ्या खिशात घातले.

     आता गाडी गावाबाहेर काढून हायवेला न्यायची होती. पप्पाना रस्ता माहीत आहे असं त्याना वाटत होतं. जवळ जवळ पाच मिनिटं त्यानी ड्रायव्हरला इकदे घाल तिकडे वळव वगैरे सांगून फ़िरवलं. बरं कुणाला रस्ता विचारायला देखिल तयार नाहीत.
पुढे एक सर्कल होतं. "आता या सर्कलच्या इथून बाहेर पडलं ना की सरळ गावाबाहेर.."
"पण नक्की कुठून बाहेर पडायचं." माझा भाऊ..
"थांब जरा. गाडी हळू कर. मला आठवू दे. हा.. एक काम कर तो नघ समोर तो मोटरसायकलवाला जातोय ना.. तो जिकडे वळला तिथे घाल.. तो रस्ता गावाबाहेर जातो."

     आमच्या ड्रायव्हरला गावाबाहेर पडायची इतकी ओढ लागली होती. की त्याने जोरात गाडी मोटरसायकलवाल्याच्या पाठून घातली. अजून दोन मिनिटं पण झाली नसतील. त्याने करकचून ब्रेक मारला. समोरचा रस्ता संपला होता आणि एक हसरी कमान तिथे उभी होती. "श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपले सहर्ष स्वागत आहे" एक क्षण दोन क्षण आम्ही तसेच बघत उभे होतो. अख्खं पंढरपूर पायी फ़िरून माहीत असणार्‍या या माणसाला हा विठ्ठल देवळाच्या दरवाजाशी घेऊन आला होता. पप्पा काही बोलायच्या आत आईने जाहीर केलं. "आता इथे आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जायचं. मग भले कितीहीवेळ लागेना का..."

     वाद घालण्यात अर्थ नाही हे पप्पाना उमजलं. त्यामुळे डायव्हरला गादी पार्क करायला सांगून आम्ही तिघे उतरलो. समोर एक हेमांडपंथी देऊळ होतं. छानसं सुबक. विठ्ठलाच्या दिगंत कीर्तीच्या अगदी विरुद्ध. उशीर झाला तर पप्पा कटकट करत बसतील म्हणून मी धडाधड पायर्‍या चढून दर्शनाला गेले.
"ए म्हशे. इकडे ये." जवळपासच्या सर्व लोकाना ऐकु जाईल इतक्या हळू आवाजात आईने हाक मारली. "इथे बघ, ही नामदेवाची पायरी आहे. तुकारामाच्या पादुका आहेत. नमस्कार कर." इथून पुढे आईने माझ्या गाईडचा भूमिका घेतली.
"नामदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस." मी नमस्कार केला. चोखामेळ्याच्या समाधीवर डोकं टेकवलं.
देवळात गेल्यावर एकदम थंड वाटलं. थोडीफ़ार रांग होती. आजूबाजूच्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. "आई, मी पट्कन जाऊन देवाला हार फ़ुले घेऊन येते."
हारवाल्या बाईकडे गप्पा मारायला वेळ होता. त्यामुळे तिने मला विठ्ठालाचा हार रुक्मिणीची ओटी वगैरे सर्व काहीबाही सांगतच दिलं माझं अर्धं लक्ष रांगेकडे होतं.
"ताई, तुळशीचा हार घ्या ना.."
"नको. एवढे घेतले तेवढे पुरे आहेत.
"ताई, आज एकादशी हाये. इठ्ठलाला तुळशी घालतात."
"बरं द्या."

     मी ते अजून दोन हार घेतले आणि देवळात आले.
"गधडे, आज पंचमी आहे. एकादशी कुठली.. पंचांग सुद्धा नीट थाऊक नसतं.."
माझी आई ना म्हणजे इज्जत का कचरा करण्यात नंबर वन. अख्ख्या देवळाला समजलं.
"पंचांग काय कॅलेंडर धड माहीत नसतं." माझा बार्बीचा बाहुला. पण याला एक दिवस मी बदडणार आहे. सॉरी. देवळात असे विचार मनात आणू नये.
"तुला हंपीमधलं संगीत खांबवालं मंदिर आठवतं? हा तिथला विठ्ठल."
मी कसं विसरेन ते मंदिर. इतकं सुंदर मंदिर मी अजवर कधी पाहिलंच नाही आहे. मोठच्या मोठं देऊळ. प्रत्येक भिंतीवत चितारलेली एकसोएक शिल्पमूर्ती. आणि दगडातून वाजणारी वाद्यं. पण हे सर्व सोडून हा विठ्ठल इथे पुंडलिकाला भेटायला आला. पण पुंदलिक आईवडीक्लाच्या सेवेत गुंतला आहे त्याच्याजवळ वेळ नाही. आणि म्हणून हे परब्रह्म कमरेवर हात ठवून वाट बघत उभं आहे. अठ्ठावीस युगं लोटली तरीही.

--नंदिनी देसाई
(TUESDAY, 25 DECEMBER 2012)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-नंदिनी देसाई.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.