पालवी-स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:42:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "पालवी"
                                     ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी यांच्या "पालवी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य"

                            स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-2--
                           -------------------------------

     आज स्त्रियांची क्षितीजे विस्तारलेली दिसू लागलीत. याला कारण नोकरी निमित्ताने तिचे घराबाहेर पडलेले पाऊल म्हणा किंवा शिक्षणाचा परिणाम म्हणा. विकासाच्या तिच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ती आज डॉक्टरांच्या भूमिकेतून रुग्ण सेवा, कायद्याच्या दृष्टीने न्यायाधिशाच्या आणि वकिलीच्या भूमिकेतून न्याय ही देत आहे. तर साहित्यिकाच्या भूमिकेतून जीवनानुभव शब्दबद्ध करुन वाड;मय समृद्ध करत आहे. वैमानिक बनून  गगन भरारी ही घेत आहे. तर राजकारणात पंतप्रधानाची भूमिका ही ती व्यवस्थित पार पाडू शकते. समाजाच्या विविध क्षेत्रात ती भरारी मारत आहे. आज घडीला स्त्रीने कायदे मंडळ, न्याय -व्यवस्था ,प्रशासन आणि प्रसार माध्यम ह्या लोकशाहीच्या प्रमुख आधार स्तंभात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. मात्र प्रसार माध्यमातून तिने अलिकडे केलेले स्वत:चे प्रदर्शन मात्र रक्त बंबाळ करणारे व सर्व स्त्री जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दिलेल्या स्वातंत्राचा गैरवापर करण्यास ती धजावत आहे. त्याचा दुष:परिणाम मात्र पुढची पीढी नक्कीच भोगणार यात वाद नाही. स्त्री ही तुफ़ाना सारखी आहे. घेतलेला वेग आवरण्याची मात्र तिला गरज आहे.

     २१व्या शतकात स्त्रीने पाऊल टाकले काय, अन्‌ उंबरठा ओलांडला काय, स्त्रीचे एक नवीनच रुप बघायला मिळू लागले आहे. आज स्त्री खूपच प्रगत अवस्थेत दिसू लागली. जी पूर्वी चूल आणि मूल एवढेच संभाळत होती,ती आज अंतराळात ,साता समुद्रा पलिकडे, एकटी विहार करु लागली आहे. संसदेत बसू लागली,एकटीच देश संभाळू लागली. मेरिट मध्ये तिच पुढे, क्यु मध्ये तिचाच अग्रकम, मॅनेजर पदापर्यंत पोचत पोचत , सरकारी तिजो-यांशी खेळू लागली. महिलांचे प्रश्न सोडवता सोडवता न्यायासनावर विराजमान ही झाली.रिक्षा ट्रक, ट्रॅक्टरच नव्हे , तर रेल्वे सुद्धा चालवू लागली. ड्रायव्हींगचे क्लासेस ही घेवु लागली.घरचे बाहेरचे संभाळता संभाळता संस्कारित मुले ही घडवू लागली. भारताची आदर्श पीढी ही घडवू लागली. कुठं होती दडली इतके दिवस ही स्त्री? दडवुन ,घुसमटवुन ठेवलेली वाफ़ अखेर अशारितीने बाहेर आली? कोंडलेली वाफ़च ती; स्फ़ोट बनून उफ़ाळून आली. जिकडे तिकडे नजर टाकली ,-स्त्रीचेच दर्शन घडवू लागली. नजर जाईल तिथे स्त्रीचेच चित्र. टी.व्ही.वर स्त्री, जाहिरातीच्या मोठमोठ्या पोस्टर्सवर स्त्री. सिनेमा घरात स्त्री, पडद्यावर स्त्री, बॊईज हॊस्टेलमध्ये देखिल स्त्रियांचीच चित्रे. हेअर सलून मध्ये सुद्धा स्त्रीच स्त्री. घरापासून दिल्ली पर्यंत स्त्रीच स्त्री. स्त्रियांचेच दर्शन. कोक, मोबाईल,कॅम्प्युटर, एवढेच नव्हे,तर सोलर सिस्टीमच्या जहिरातीत स्त्रीच आमची अग्रेसर.

     आज आता स्त्रियांचा मुक्त वावर सगळीकडे होताना दिसतो. खरंतर ही एका चांगल्या बदलाचीच चिन्हे आहेत. आज पर्यंत इतकी वर्षे त्यांची मुस्कटदाबीच होती. स्त्रियांचे उंबरठ्या बाहेर पडलेले पाऊल पूर्वी वेगळ्या अर्थाने प्रचलीत होते. तर आज ते एका स्वावलंबी –स्वाभिमानी स्त्रीचे लक्षण समजले जाते. स्त्रियांच्या सुप्त भावनेत एक 'प्रसिद्धीचे वलय' आहे. प्रत्येक स्त्रीला वाटते की , मी कुणीतरी आहे,मला कुणी तरी ओळखावे, मला प्रसिद्धी मिळावी, माझे स्वतंत्र अस्तित्व असावे. आज काल घरोघरी केबल टी.व्ही.चे आक्रमण झाले आहे. आणि घरोघरी पोहचलेल्या या माध्यमासारखे प्रसिद्धीचा दुसरा सोपा मार्ग कुठला? मालिकांमध्ये प्रत्येकालाच संधी मिळते असे नाही. मग या मालिकांच्या मध्ये मध्ये तरी चमकायला काय हरकत आहे? –म्हणत आज असंख्य स्त्रियाच या प्रसिद्धीच्या ,झगमगत्या क्षेत्राकडे स्वत:हुन शिरल्या. 'स्त्री' चा आज ही 'वापर' केला जातो. 'वस्तु' म्हणुन उपभोग हवा तेंव्हा घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांची आजही शारीरिक, मानसिक कुंचबणा होत आहे. खरंतर याला स्त्रियाच ब-याचशा जबाबदार आहेत. जाहिरातीतून प्रसिद्धीसाठी त्यांचा मादक वावर वाढल्याने ,त्यांचा हवा तसा जाहिरातदार वापर करुन घेत आहेत. आपल्या कलेचा नसून आपल्या शरिराचा हवा तसा वापर हे जाहिरातदार करतात हे त्या मॉडेल विसरतात. हे निश्चितच निंद्द आहे. या साठी स्त्री संघटनानी त्या अनुषंगाने लोकमत जागृत केल पाहिजे. स्त्रियांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्राचा असा गैरवापर करुन घेवु नये.खरंतर स्त्रियांचे स्थान हे फ़क्त कष्टक-याचेच आहे.पूर्वी स्त्री जशी उंबरठ्याच्या आतच सुरक्षित होती, तिच परिस्थिती पुन्हा उदभवते की काय?-असे वाटते.

--सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.
(July 7, 2010)
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-पालवी.वर्डप्रेस.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     --------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.