दैनंदिनी-दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:10:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "दैनंदिनी"
                                      ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री निलेश सकपाळ यांच्या "दैनंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दैनंदिनी – ३० जुलै २००९"

                          दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-2--
                         ---------------------------------

     किती समर्थनं!! पण या पलिकडे आपण सार्‍यांनी विचार केलेला नाही किंवा नसतो... ज्यांनी केला ते खरेच धन्य! पण कुणी असा विचार करत नाही की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून परदेशात शिक्षण घेण्यास येणार्‍यांचा मूळ उद्देश काय होता? तेव्हा शिक्षणामुळे सारासार बुद्धी आपोआप यायची किंवा शिक्षण घेतलेल्या माणसाला तसाच मान होता, त्याला चांगल्या वाईटाचा विचार करण्याची क्षमता होती.. अन त्यामुळे जास्त शिकलेला देशासाठी जास्त विचार करू शकतो असे समीकरण झाले होते अन ते प्रत्यक्षातही तसेच दिसले... तेव्हा प्रत्येकाला मिळालेले उच्च शिक्षण हे भारताच्या उत्थानासाठी वापरायचे हाच उद्देश होता, परदेशात असलेल्या सुरक्षिततेपेक्षा भारतात असणारी असुरक्षितता अन पारतंत्र्यता त्यांना जास्त आवाहन द्यायची... आज ही आवाहन स्वीकारण्याची धारणाच नाहीशी झाल्याचे दिसते, तरूणपिढीतले तारुण्य वजा असल्यासारखे भासते, शिक्षणामुळे येणार्‍या तेजापेक्षाही विलासीन सुखांच्या उपभोगाप्रती असलेला पंगुपणा जास्त दिसतो.. गेल्या काही दशकांमध्येच हा देश उत्थानाचा उद्देश पुरेपुर नाहीसा झाला आहे, देशापेक्षाही स्वतःला मोठे समजण्याची घोडचुक करताना आम्ही सगळे आढळतो, माहीत असतानासुद्धा हे करताना प्रौढी मिरवताना बरेच जण दिसतील, देशासाठी खर्च केलेले आयुष्य अनमोल असते यापेक्षाही स्वतःच्या क्षुल्ल्क मोहाच्या पाठी धावताना सुखांच्या गर्दीमध्ये गाडुन घेण्यात सार्थक मानणारी पिढी उदयाला येत आहे... अप्पलपोट्या राज्यकर्त्यांच्या उपर्‍या धोरणांमुळे होत असलेले खच्चीकरण थांबवणे आता दिवसेंदिवस अशक्यतेच्या जवळ जाऊ लागले आहे, ढासळलेली न्यायव्यवस्था, दिशाहीन झालेले नेतृत्व, एक-दोन विकसित देशांचा आराखडा डीट्टो भारतासारख्या देशामध्ये राबविण्याच्या निष्फळ प्रयत्नापायी झालेले अतोनात नुकसान न भरुण येण्यासारखे आहे, हे ओळखण्याचेही भान नसलेली किंवा हे स्वीकारून वाढणारी तरुणपिधी घडत आहे याचे दुःख वाटते... उगीचच वैयक्तिक सुखाच्या मोहापायी आम्ही आमच्या देशाला मात्र विकासापासुन वंचित राहण्यास किंवा अंधारात खितपत पडण्यास भाग पाडतो आहोत हे देखील न समजलेली म्हणजेच 'पुढारलेली' तरुणपिढी येऊ घातली आहे...

     शहरीकरणाला विकासाचे नाव देणे म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला एखादा मुकपट दाखविण्यासारखे आहे.. आपला विकास अधू आहे हे समजणे किंवा याचा उलगडा तरुण पिढीला झालाच पाहीजे... एखादा देश पुढे नेणे म्हणजे तिथल्या जनतेला किंवा सगळ्यात दुर्लक्षित असलेल्या व्यक्तिला प्रमुख प्रवाहात आणणे होय, आमचा विकास इंग्रजीमधुन होत आहे अन आमचा देश भाषांच्या युद्धामध्ये जखडून पडला आहे... इंग्रजी भाषेचे अनभिषिक्त साम्राज्य आम्ही स्वीकारले आहे... किंवा कोणत्याही खंबीर नेतृत्वाने ते कधीच झुगारले नाही तर ते दोन्ही हाताने स्वीकारले हे ही सत्य आहे... आज रशिया किंवा युरोपातील छोटे छोटे देश किंवा जपान किंवा चीन सगळ्यांनीच आपल्या अस्तित्वाची खुण अबाधीत राखली आहे, आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती अखंडीत राखली आहे... आमची तरुणपिढी निर्लज्जपणे या लोकांचे गुणगाण गाताना दिसते पण आपल्या देशात हे का नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची धमक वा हिम्मत त्यांच्यात नाहि हेही तेवढेच लाजिरवाणे व बटबटीत उघड सत्य आहे.. एक म्हणुन उभे राहायचे असेल तर परस्परातील मतभेद पहील्यांदा हद्दपार झाले पाहीजेत पण आम्ही अजुनही पुराणकाळातील असणारे फरक घासुन घासुन ठळक करण्याच्या मागे लागलो आहोत... शिक्षणाचा अर्थ सध्या बदलला आहे.. शिक्षण म्हणजे शेपुट गुंडाळून देशाला पाठ लावून पळून जाणे असाच अर्थ समोर दिसत आहे... आपण स्वतःही त्यामध्ये आहोत याचीही खंत वाटत होती पण आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचे मनाशी निश्चित आहे, ठाम आहे... कितीतरी उच्चशिक्षित परत जाऊन देशाच्या पुनर्बांधणीचे काम करीत आहेत हेही आमच्या पाहण्यातुन सुटले नाही... डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे उदाहरण तर नेहमीच जीवंतपणे समोर उभे राहते...

--निलेश सकपाळ
(३० जुलै २००९)
----------------

                 (साभार आणि सौजन्य-निलेश सकपाळ.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.