माझी भटकंती...-माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:18:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "माझी भटकंती..."
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल विजय कुलकर्णी यांच्या "माझी भटकंती..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ...."

                 शिर्षक: माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-3--
                ---------------------------------------------

                      सर्वसाधारण प्रोसेस....

मला वाटतं एवढं पुरेसं आहे, हुश्श !

तर मी मीरतला डेमोसाठी पोहोचलो....!

     पण इथे परिस्थिती वेगळीच होती. जी.पी.एस.साठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे जीपीएसला उपग्रहाचा क्लिअर व्ह्यु असणे आवश्यक असते. जर मोठी झाडे, टोलेजंग इमारती किंवा इतर काही अडथळा जीपीएस अँटेना आणि उपग्रह यांच्यामध्ये आला की मग मात्र अ‍ॅक्युरेसीची वाट लागते. इथे जी डेमोची जागा मला देण्यात आली होती ती आजुबाजुला मोठ मोठ्या इमारती आणि झाडीने वेढलेला होता. त्यामुळे वाईट अवस्था झाली. दहा मिनीटात होणार्‍या कामासाठी दोन तास वेळ द्यावा लागला. पण एकदाचा डेमो आटपला...

     दुपारचे अडीच वाजले होते. माझी परतीची ट्रेन रात्री ९.३० ची होती. म्हणुन आमच्या स्थानिक ड्रायव्हरला पटवून त्याला गाडी "काली पलटन" मंदीराकडे घ्यायला लावली.
"काली पलटन मंदीर"

     प्रत्येक देशभक्त भारतीयासाठी हे मंदीर म्हणजे काशी विश्वेश्वरापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरावे. कारण १८५७ च्या स्वातंत्र्य समराची सुरुवात इथुन झाली होती. या समराचे सगळे नियोजनच मुळी या मंदीरात केले गेले होते.

     त्याकाळी बहुदा ते एक छोटेसे अघोरनाथ शिवशंकराचे मंदीर असावे. पण आज त्या ठिकाणी मोठे मंदीर बांधण्यात आले आहे. इथे शिवशंभुची स्वयंभु पिंडी आहे. मंदीरात पिंडीबरोबरच शिव पार्वतीच्या मुर्तीदेखील आहेत.

     इथुन दर्शन घेवून गाडी 'शहीद पार्क' कडे घेतली.

     १० मे १८५७ रोजी अवघ्या ८५ सैनिकांनी इथे सदर बझार विभागात ब्रिटीशांवर हल्ला चढवला होता. त्यापुर्वी हुतात्मा झालेला मंगल पांडेदेखील याच पलटणीचा सैनिक होता. ही पलटण काली पलटन या नावाने ओळखली जाते. आई कालीमातेच्या नावाने. इथे हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा तसेच एक वस्तु संग्रहालयदेखील आहे. या संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यसमरासंबंधीत वस्तु, छायाचित्रे यांचे संग्रहण आहे. इथेच मला नानासाहेब पेशवा तसेच तात्या टोपे यांचीही छायाचित्रे बघायला मिळाली.

हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा

            हुतात्मा सैनिकांचे स्मारक...

श्रीमंत नानासाहेब पेशवा आणि वीर तात्या टोपे

     संध्याकाळी ६-६.३० पर्यंत सगळे आटपून पुन्हा एकदा हॉटेल गाठले आणि पोटपुजा आटपुन घेतली. कारण एकदा स्टेशनवर गेले की मग सगळे सामान वागवत पुन्हा जेवणासाठी म्हणुन शहरात येणे शक्य नव्हते. साडे सातच्या दरम्यान ड्रायव्हरने मला स्टेशनवर परत सोडले.

जोगिंदर... माझा स्टायलिश ड्रायव्हर !

     रात्री ९.२५ ला येणारी डेहराडुन शताब्दी चक्क..... ९.२५ ला स्टेशनवर हजर होती. (अर्थात नंतर ती गाझीयाबादच्या परिसरात अडकुन माझी वाट लावणार होती ही गोष्ट अलाहिदा). तर आम्ही दिल्लीकडे मार्गक्रमण करते झालो. मधला गाझियाबादचा अडथळा धरुन गाडी १२-१२.३० च्या दरम्यान (दिल्लीत पोहोचायची तिची वेळ १० वाजताची आहे) दिल्लीत पोचली. माझे हॉटेल गुरगावमध्ये होते. मग पुन्हा टॅक्सीवाल्याशी घासाघिशी. सुरुवात साडे आठशे रुपयांपासुन झाली. मी माझे सगळे सेल्सचे कौशल्य वापरुन त्याला ४७५ रुपयात पटवला आणि हॉटेल गाठले. रात्रीचा दिड वाजला होता.

--विशाल विजय कुलकर्णी
(९/१४/२०१०)
----------------------

                   (साभार आणि सौजन्य-येडचॅप.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -----------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.