आज कृष्णाच्या रंगात सारे रंगले आभाळ,

Started by rupesh, August 01, 2010, 01:51:13 PM

Previous topic - Next topic

rupesh

आज कृष्णाच्या रंगात सारे रंगले आभाळ,
सर रेघ रेशमाची, थेंब-थेंब मोती-माळ....

चिंब भिजून अवनी,
जणू भासे राधा-राणी
मृदा-गंध चहूकडे,
सांगे प्रीतीची कहाणी

बिलगून राधिकेला होई पाऊस खट्याळ

रंग पाचूचा लेऊन,
पुन्हा सजली धरणी
छुन-छुन, रिम-झिम
नाव-चैतन्य अंगणी

घुमे निनाद मंजुळ, पायी पावसाच्या चाळ,

घन सावळे-जांभळे,
मेघ-किनार रुपेरी
डोईवर इंद्रधनू,
अभ्र जाहले सोनेरी

खेळ-खेळती सूर्याशी मृग-धारा अवखळ,

थेंब भरून ओंजळी,
सळ-सळ पानं गाती
किलबिल पाखरांची,
वृक्ष तालात डोलती

एक सुखाची लहर, रंगे सोहळा मंगळ
सर रेघ रेशमाची, थेंब-थेंब मोती-माळ....

rupesh

MK ADMIN

घन सावळे-जांभळे,
मेघ-किनार रुपेरी
डोईवर इंद्रधनू,
अभ्र जाहले सोनेरी

Nice....

gaurig