मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-13-माझी आजी

Started by Atul Kaviraje, October 26, 2022, 09:40:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-13
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझी आजी"

     मित्रांनो आजी आजोबा म्हटले म्हणजे अनुभवाची खाणच असतात. लहान मुलांना तर आजी आजोबा खूप आवडतात. म्हणून आजच्या या निबंधाचा विषय आहे माझी आजी. ज्याप्रमाणे मुलांना आजी प्रिय असते त्याच पद्धतीने आजीलाही आपली नातवंडे खूप आवडतात. आजी मुलांना छान छान गोष्टी सांगून चांगले संस्कार देते. तर चला सुरुवात करूया अश्याच एका आजी वर लिहिलेल्या निबंधाला.

     माझ्या वडिलांची आई म्हणजेच माझ्या आजीचे नाव पंकजा बाई आहे. माझी आजी खूपच प्रेमळ आहे. तीने लहानपणापासून माझी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे. मला चांगल्या गोष्टी आणि चांगले संस्कार देण्यामागे माझ्या आजीची मोठी भूमिका आहे. मला माझ्या आजी सोबत राहायला खूप आवडते. माझी आजी सकाळी लवकर उठते. सर्वांच्या उठण्याआधी अंघोळ करून तयार होते. व रोज सकाळी घराजवळ असणाऱ्या मंदिरात जाते. लहान असताना आजी मलाही मंदिरात न्यायची. तेथे दर्शन घेतल्यावर आम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायचो. माझ्या या आजीला आयुर्वेदाचे चांगले ज्ञान आहे. शारीरिक रोगांपासून दूर राहण्यासाठी कोवळ्या उन्हाचे महत्व तिने मला सांगितले आहे.

     लहान असतांना आजी मला तिच्या हाताने अन्न भरवत असे. मला जेवत असताना तिच्याशी बोलायला आवडायचे, परंतु ती मला जेवताना अजिबात बोलू द्यायची नाही. आजीचे म्हणणे होते की जेवतांना बडबड केल्याने जेवण व्यवस्थित होत नाही म्हणून जेवताना बोलू नये. माझी आजी घरात नेहमी ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या बनवायला सांगते. तिने मला हिरव्या भाज्यांचे महत्त्व समजावून सांगितले आहे.

     मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला आजी जवळ झोपायला आवडायचे. कारण आजी मला रामायण महाभारतातील गोष्टी सांगत असे. या शिवाय अनेक छान छान, राजा राणी, अकबर बिरबल आणि पऱ्यांच्या गोष्टी ती मला सांगायची. गोष्ट सांगितल्यानंतर ती गोष्टी मधील बोध सांगायला विसरत नसे. बऱ्याचदा आजीची गोष्ट ऐकता ऐकता मला झोप लागून जायची. जेव्हा मी आजारी राहायचो तेव्हा रात्र रात्र जागून आजी माझी काळजी करायची.

     आज माझ्या आजीचे वय जवळपास 70 वर्षे आहे. परंतु अजूनही ती मला चांगले वाईट समजावीत असते. आजीच्या चेहऱ्यावर अनेक सुरकुत्या पडल्या आहेत, तिचे केस पांढरे झाले आहेत, डोळ्यांना चष्मा लागलेला आहे. थोडे फार चालल्यानेही आजी थकून जाते. मी नेहमी माझ्या आजीची काळजी घेतो. तिची तब्येत खराब झाली तर मी सुद्धा त्याच पद्धती नाही काळजी घेतो ज्या पद्धतीने ती माझी काळजी करायची. माझ्या आजीचे समजदारपणा मुळे आमचे कुटुंब एकजुटलेले आहे. आजी आमच्या घराच्या जीव की प्राण आहे. व मला सुद्धा माझी आजी खूप आवडते.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.10.2022-बुधवार.