मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-4-गर्भधारणेचे बाजारीकरण-3

Started by Atul Kaviraje, November 11, 2022, 09:13:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-4
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गर्भधारणेचे बाजारीकरण"

                                 गर्भधारणेचे बाजारीकरण--3--
                                -------------------------

     फर्टिलीटी क्लिनिक्स व डॉक्टर्स यशाच्या खात्रीबद्दल नेहमीच (चुकीची!) विधानं करत असतात. मूल जन्माला येते की नाही यापेक्षा गर्भ वाढतो आहे की नाही हेच यशाचे निकष ठरत असते. हार्मोन्समधील बदलसुद्धा गर्भवाढीच्या यशाच्या आकडेवारीत टाकले जातात. त्यामुळे हे आकडे नेहमीच फुगवून सांगितलेले असतात. जाहिरातीचा मारा करून वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा एक आक्रमक पवित्रा असतो. 'चमत्कार' म्हणूनच सामान्य लोक या गोष्टीकडे पाहतात आणि डॉक्टर्सना देवत्व बहाल करतात. दत्तक घेऊन किंवा निपुत्रिक राहूनसुध्दा हे दांपत्य सुखाने जगू शकते; परंतु बाजारीकरणाचा सातत्याने होणारा मारा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. खरे पाहता या कृत्रिम पुनरूत्पादनाच्या यशाचा दर 18-20 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. तरीसुध्दा निपुत्रिक जोडपी यांच्या आहारी जातात. 'आम्ही याव्यतिरिक्त काय करू शकतो?' असेच हतबल होऊन ते विचारतात. अपत्य प्राप्ती हवी की नको याचा निर्णय निपुत्रिक जोडप्यांनी घ्यायली हवा; परंतु आजकाल हा निर्णय बाजार लादत आहे.

                     आर्थिक उलाढाल--

     गर्भधारणेच्या व्यापार व्यवहारात पैशाची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. अवयवांची खरेदी-विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु शुक्राणू, बीजांड, गर्भ हे शारीरिक अवयवांच्या सदरात मोडत नसून हे सर्व 'शरीराचे उत्पादन' आहेत अशी पळवाट शोधून त्यांची विक्री होत आहे. शुक्राणूंच्या तुलनेने बीजांडांची किंमतही जास्त व त्याला मागणीही जास्त. या संबंधातील आकडेवारी आपल्या देशात उपलब्ध नसली तरी, अमेरीकेसारख्या विकसित राष्ट्राच्या आकड्यावरून या धंद्याचे स्वरूप कळू शकेल. या दरावरून नजर टाकल्यास हे दर त्या देशातील श्रीमंतांनासुध्दा न परवडणारे आहेत हे लक्षात येईल.

शुक्राणू ..... 30,000 रूपये
बीजांड ..... 4,50,000 रूपये
कृत्रिम गर्भधारणा (प्रत्येक खेपेस) .... 12,40,000 रूपये
भाड्याचे गर्भाशय .... 6,00,000 रूपये
पूर्वजनुक चाचणी .... 3,50,000 रूपये
दत्तक:नात्यांतल्यांसाठी .... 2,50,000 रूपये
दत्तक:अमेरिकेतल्या अमेरिकेत ..... 14,50,000 रूपये
दत्तक:इतर देशातून ..... 24,50,000 रूपये

     भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील राहणीमानाप्रमाणे हे दर दहा टक्के असे धरले तरी हा खर्च भारतीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. तरीसुध्दा फर्टिलिटी क्लिनिक्सची जाहिरात व डॉक्टर्सच्या आग्रहांना बळी पडून या मृगजळांच्या मागे निपुत्रिक दांपत्ये धावत आहेत. अमेरीकेतील या आकडेवारीमुळेच भारतातील गर्भधारणेच्या उद्योजक ठेकेदारांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. भाड्याने गर्भाशय देणार्‍या स्त्रीसाठी (सरोगेट मदर) अमेरिकेत साठ लाख रूपये खर्च होत असल्यास, भारतात केवळ दहा ते बारा लाख रूपये दर ठेऊनसुध्दा प्रचंड नफा कमवता याईल हा हिशोब त्यामागे आहे. परदेशातील जोडप्यांना भारतात बोलावून त्यांच्या राहण्याचा खर्च, पूर्वचाचणी, कृत्रिम गर्भधारणा, नंतरच्या गर्भारपणातील भाड्याने गर्भाशय देणार्‍या स्त्रीची (सरोगेट मातेची) काळजी, प्रसूती इत्यादी सर्व गोष्टी अती कमी पैशात उरकता येतात, हे त्यांच्या लक्षात आले आहे. बाकीच्या चाचणी-गर्भधारणा इत्यादीसाठी फार वेळ लागत नसला, तरी गर्भ वाढवण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतोच. त्यासाठी स्त्रिया पुरवण्याची व्यवस्था केल्यास धंदा तेजीत चालेल हे लक्षात आल्यानंतर भारतात सरोगेट मातांची फौज ठिकठिकाणी उभी केली जात आहे.

                     सरोगेट मातांचे खेडे--

     गुजरातमधील आणंद हे खेडे 'अमुल' दुग्ध उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. दूध सहकारी संघाच्या वितरण व्यवस्थेमध्ये आणंद व आसपासच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी क्रांती केली आहे; परंतु आज हे खेडे युरोप, अमेरिकेत भाड्याचे गर्भाशय पुरवणाऱ्या 'सरोगेट माता' चे खेडे म्हणून नावाजले जात आहे. या गावातील अनेक तरूण/प्रौढ स्त्रिया दोन-चार लाख रूपयांसाठी गर्भव्यापारात भागीदार होत आहेत. फर्टिलीटी क्लिनिक्सचे दलाल बायकांना भुरळ पाडून या धंद्यात खोऱ्याने पैसे ओढत आहेत. गंमत म्हणजे हा सर्व व्यवहार कायदेशीर आहे. नीतीचा प्रश्नसुध्दा ह्या बायकांनी आपल्यापुरता सोडवला आहे. त्यांच्या मते आर्थिक मदत मिळत असल्यास गर्भाशय भाड्याने देण्यात काही गैर नाही. या अतिरिक्त पैशातून मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे चांगल्या घराण्यात लग्न, आजारी नवर्‍याचे औषधोपचार होत असल्यास त्यात काय चूक अशी मानसिकता मूळ धरू पाहत आहे. शिवाय नवर्‍याच्या संमतीनेच त्याची बायको ही गोष्ट करत आहे. अशा व्यवहारात आणंद हे एकमेव खेडे आहे असे म्हणण्याला अर्थ नाही. इतर राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात हे व्यवहार चालत असावेत. फक्त त्यांचा गवगवा झाला नसेल. परदेशासाठी संगणक सेवा पुरवणार्‍या कॉल सेंटर्सप्रमाणे सरोगेट मदर्स पुरवणारे किंवा गर्भधारणा सेवा पुरवणारे केंद्र नजीकच्या काळात देशभर सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही काळात भारत देश हा सरोगेट मदर्सचा देश म्हणूनही प्रसिद्धीला येईल.

(क्रमशः)--

--प्रभाकर नानावटी
(July 19, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2022-शुक्रवार.