मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-6-गर्भधारणेचे बाजारीकरण-5

Started by Atul Kaviraje, November 13, 2022, 10:07:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-6
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गर्भधारणेचे बाजारीकरण"

                                 गर्भधारणेचे बाजारीकरण--5--
                                -------------------------

     गर्भधारणेबद्दल बाजारव्यवस्थेला खरोखरच आत्मीयता असल्यास अशा प्रकारच्या जुजबी तंत्रज्ञानापेक्षा वंध्यत्व दूर करण्यासाठी मूलभूत संशोधनाला उत्तेजन द्यायला हवे होते. त्यासाठी पैसा ओतायला हवा होता. वंध्यत्वाची कारणं शोधून तंत्रज्ञान विकसित करायला हवे होते. परंतु या औषधी कंपन्या व त्यांना साथ देणारी वैद्यकीय व्यवस्था संशोधनात पैसे गुंतवण्याऐवजी लगेच परतफेड करू शकणार्‍या तंत्रज्ञानाला पाठिंबा देत आहेत. वायू प्रदूषणावर कायमची उपाययोजना शोधण्यापेक्षा नाकाला रुमाल बांधून गाडी चालवण्यासारखाच हा प्रकार आहे. मूळ दुखणे शोधून त्यावर इलाज करणे गरजेचे आहे.

                   कायदे कानून--

     गर्भधारणाच्या संबंधात आताच्या कायद्यामध्ये अंदाधुंदी आहे. एका देशात बीजांड विकण्यास बंदी, एका देशात गर्भ वाढविण्यास बंदी, दुसर्‍या एखाद्या देशात सरोगेट मातेवर बंदी, अशा अनेक तर्‍हा आहेत. त्यामुळे डेन्मार्कहून शुक्राणू, स्पेनमधून बीजांड, कॅलिफोर्नियात गर्भवाढ व इंग्लंडमध्ये अपत्याची वाढ अशा प्रकारे जन्मलेले मूल जागतिकीकरणाच्या चक्रात अडकून पडत आहे. भारतातसुद्धा यासंबंधीच्या कायद्यात भरपूर संदिग्धता आहे. या पद्धतीने जन्माला आलेल्या मुलावर कायदेशीर हक्क कुणाचा - शुक्राणू देणार्‍याचा, की बीजांड देणार्‍याचा की सरोगेट मातेचा, की मुलाचे संगोपन करणार्‍याचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. केवळ करारपत्रावर सही केली याचा अर्थ इतरांना हात झटकून मोकळा होता येत नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे कायद्यातील कलमांचा योग्य अर्थ ध्वनित होतो की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. थोडासा जरी शिथिलपणा त्यात असल्यास गैरफायदा घेणारे टपलेले असतात.सरसकट बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास मूत्राशय विक्री व्यवसाय जसा फोफावला तसा या जैविक उत्पादनाचासुद्धा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

                   कृत्रिम गर्भधारणा हा उपाय नव्हे--

     मुळात निपुत्रिक असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. निपुत्रिक जोडप्यांनी आपल्या मनातील अपराधीपणाची भावना दूर केल्यास समाधानी जीवन नक्कीच जगता येईल. अपत्य प्राप्तीसाठी एवढा आटापिटा करण्याची खरोखरच गरज आहे का याचाही विचार करावा लागेल. पूर्वीच्या काळी अविभक्त कुटुंबात निपुत्रिक जोडपी आपल्या भावा - बहिणींच्या मुलां-बाळांना आपलेच समजून समाधानी राहत होते. अलीकडील काळात विभक्त कुटुंबांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपलेच मूल हवे हा हट्ट न धरता नात्यातील एखाद्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलून समाधानी जीवन जगणे अशक्यातली गोष्ट नाही.

     आताच्या बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास स्वत:चा वंश पुढे चालवण्याचा अट्टाहास कशापायी असा प्रश्न पडू शकतो. एके काळी मुलं म्हणजे म्हातारपणाचे आधार अशी प्रतिमा होती. आजच्या परिस्थितीत ही संकल्पना कालबाह्य ठरत आहे. पालकांनासुद्धा आपली मुलं म्हातारपणी आपल्याजवळ असतील किंवा त्याच्याजवळ आपण असू याची खात्री देता येत नाही. मुलं दुसरीकडे, वृद्ध आई - वडील आणखी कुठेतरी अशी परिस्थिती असताना अपत्य प्राप्तीचे हे सबळ कारण होऊ शकत नाही. मुलाबाळाशिवाय घराला घरपण येत नाही या मर्यादेपर्यंत अपत्याची गरज भासू शकते. परंतु त्यासाठी एवढा आटापिटा करायचा का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

     आपल्या देशापुरते बोलावयाचे असल्यास या धोकादायक तंत्रज्ञानाची अजिबात गरज नाही. हवे असल्यास लाखो अनाथ बालकांपैकी एखाद्याला/एखादीला दत्तक घेऊन आपले जीवन आनंददायी करता येईल. फक्त आपल्याजवळ पैसा आहे म्हणून एखाद्या गरीब, नडलेल्या स्त्रीला सरोगेट माता होण्यास भाग पाडून तिला गुलामासारखी वागणूक देणे विवेकीपणाचे लक्षण नव्हे. घरात मूल वाढ असताना त्याच्या खोडकरपणातून, खेळकरपणातून बोबड्या बोलातून आनंद मिळविण्यासाठी घरात काही काळ तरी रांगते मूल हवे याबद्दल दुमत नाही; परंतु यासाठी कृत्रिम गर्भधारणा उपाय होऊ शकत नाही.

(समाप्त)--

--प्रभाकर नानावटी
(July 19, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.11.2022-रविवार.