मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-15-क्लोंडायक गोल्ड रश - भाग १-अ

Started by Atul Kaviraje, November 22, 2022, 09:19:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-15
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "क्लोंडायक गोल्ड रश - भाग १"

                             क्लोंडायक गोल्ड रश - भाग १--अ--
                            ------------------------------

     इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

     पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलेल्या Vitus Bering ने १७४१ साली हार न मानता पुन्हा प्रयत्न केले. यावेळी बेरिंगने सर्वप्रथम अलास्काच्या दक्षिण किनार्‍यावरील कायक(Kayak) बेटावर पाय ठेवला. या प्रदेशाची नीट पहाणी करून तिथून परताना त्याने 'सी ओटर्स' (Sea Otter) (२) या समुद्री प्राण्याची कातडी रशियात आणली. अतिशय मऊ मुलायम अशा या कातडयाला रशिया व चीन मध्ये बरीच मागणी होती. या कातडयामुळे रशियात बरीच खळबळ माजली. अनेक दर्यावर्दी व्यापार्‍यांनी मौल्यवान कातडयाच्या हव्यासापोटी अलास्काच्या दिशेने प्रवास सुरू केला. शांत अलास्काच्या भूमीवर झालेले हे पहिलं परदेशी आक्रमण.

     अलास्कात शिरकाव करताच रशियनांनी हळूहळू हातपाय पसरायला सुरवात केली. जगातील इतर जेत्यांप्रमाणे इथेही मुळ आदिवासी जमातींवर हल्ला करून त्यांना मूळापासून उखडून टाकायचा प्रयत्न केला. या परदेशी लोकांमुळे कांजण्या व क्षयरोगासारख्या साथी पसरल्या. इथल्या मूळ जमातींनी जेव्हा याचा प्रतिकार केला तेव्हा रशियनांनी हजारो आदिवासींची कत्तल केली. अखेर अजून एक प्राचीन संस्कृती हावरेपणाला बळी पडली.

     १७८४ पर्यंत रशियनांनी आपली पहिली वसाहत अलास्कातील कायक बेटावर वसवली. सर्व काही आलबेल चालत असतांना इ.स. १८६७ च्या आसपास युरोपात उद्भवलेल्या Crimean War मुळे रशियन्स आपली युरोपातली सत्ता टिकवून ठेवण्यात गर्क होते आणि यामुळे अमेरिका खंडातल्या आपल्या वसाहतीकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. आधीच ब्रिटिश व अमेरिका अलास्कावर डोळा ठेऊन होते. सततच्या युद्धामुळे रशियालाही पैशाची चणचण भासू लागली होती. त्यातच ब्रिटीशांकडून युद्ध लादण्याची भीतीही होतीच. ब्रिटीशांना रोखण्यासाठी रशियाने सरते शेवटी अलास्का ही वसाहत अमेरिकेला देऊ केली.

     अमेरिकचा तात्कालीन राज्यसचिव William H. Seward(३) याला हा प्रांत अमेरिकेत सामील करून घेण्यात रस होता. त्याच्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाने क्षेत्रफळाने अतिप्रचंड अशा या प्रांतातील नैसर्गिक संपत्ती, खनिजं, लांबच लांब समुद्रकिनारा याचा भविष्यात अमेरिकेला होणारा फायदा ओळखला होता. त्याने रशियाला अलास्का विकत घेण्यासाठी ७.२ मिलियन डॉलर्स देऊ केले. सुंदर पर्वतराजींनी नटलेला, जगातील सर्वात लांब जागृत ज्वालामुखीची रांग असलेला परंतु मुळ अमेरिकन भूमीपासून बराच लांब, जवळजवळ वर्षभर बर्फाने आच्छादलेला 'अलास्का', ३० मार्च १८६७ साली रशिया व अमेरिकेत झालेल्या करानुसार आता अमेरिकेचा एक भाग बनला होता.

--हेमांगी के
(May 9, 2013)
----------------

(क्रमश:)--
---------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.11.2022-मंगळवार.