मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-16-क्लोंडायक गोल्ड रश - भाग २--A

Started by Atul Kaviraje, November 23, 2022, 09:23:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-16
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "क्लोंडायक गोल्ड रश - भाग २-A"

                            क्लोंडायक गोल्ड रश - भाग २--A--
                           ------------------------------

     रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.

     हाताला काहीच न लागल्याने कंटाळून हेंडरसन १८७० साली घरी परतला आणि लग्न करून त्याने मासेमारीचा धंदा सुरू केला. सगळं काही स्थिरस्थावर होत असतांना त्याच्या मनातली सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. यावेळी त्याचा उत्तरेची वाट धरायचा मनसुबा होता. १८९४ मध्ये आपल्या दोन साथिदारांसह त्याने पुन:श्च प्रयत्न करायचं ठरवलं. समुद्रमार्गाने उत्तरेकडे साठएक मैल प्रवास केल्यानंतर त्याच्या दोन्ही साथिदारांनी कंटाळून परतायचा सल्ला दिला. हेंडरसनने अर्थातच तो फेटाळून लावला. मजल दरमजल करीत तो अलास्काला लागून असलेल्या कॅनडातल्या 'युकान' परगण्यात पोचला.

     कॅलिफोर्निया गोल्ड रशनंतर अनेकदा सोनं सापडल्याच्या अफवा उठतच होत्या. हेंडरसनच्या आधीही अनेकजण युकानमध्ये सोन मिळण्याच्या आशेने खोदकाम करीत होते. पण म्हणावं तसं यश कोणालाच आलं नव्हतं. जवळजवळ चार वर्ष खटपट केल्यानंतर १८९६ च्या उन्हाळ्यात हेंडरसनच्या हाताला एका खाडीत सुमारे आठ सेंट किमतीचं सोनं लागलं. या खाडीचं त्याने नामकरण केलं 'Gold Bottom'. तोवर एवढ्या किमतीचं सोनं कुणाच्याच हाती लागलं नव्हतं. उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत हेंडरसन व इतरांना ७५० डॉलर्स किमतीचं सोनं सापडलं. त्याकाळी सामान्य माणसाचं वर्षभराचं उत्पन्नही या पेक्षा कमी होतं. याच दरम्यान, एक दिवस हेंडरसन दैनंदीन गरजेचं सामान घेण्यासाठी जवळच्याच 'Ogilvie' या गावात गेला. परततांना नेहमीची वाट घेण्याएवजी तो क्लोंडायक नदीच्या काठाने निघाला असता त्याची भेट घडली एका अमेरीकन युवकाशी. तो होता, जॉर्ज कारमॅक.

     जॉर्ज कारमॅक मुळचा अमेरीकन. लहानपणीच अनाथ झालेल्या जॉर्जला आजोबांनी वाढवलं. काही काळ अमेरीकेत जहाजावर काम केल्यावर व्यापारासाठी त्याने १८८५ मध्ये अलास्काची वाट धरली आणि पुढे तिथल्याच स्थानिक टॅगिश जमातीतल्या मुलीशी लग्न केलं. जॉर्जला फक्त टॅगिश बोलीभाषा अवगत नव्ह्ती तर त्याने टॅगिश जीवनशैलीही चांगलीच आत्मसात केली होती. त्याचा टॅगिश जमातीत असलेल्या सततच्या वावरामुळे खाणमालक कुत्सितपणे त्याला 'Squa Man' म्हणत असत.

     तर झालं असं, हेंडरसन परतत असतांना, जॉर्ज क्लोंडायक नदीच्या तीरावर आपली बायको, मेहुणा Skookum Jim आणि त्याचा भाचा Tagish Charlie यांच्यासोबत मासेमारी करायला आला होता. सोनं शोधण्यासाठी आलेल्या Prospectors चा एक अलिखीत नियम होता तो म्हणजे - एखाद्याला एका ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त सोनं मिळालं तर त्याने इतरांना ही बातमी सांगायची. हेंडरसननेही तेच केलं. त्याने कारमॅकला ही खबर सांगितली. सोनं सापडलेला काही भूभाग विकत घ्यायचाही सल्ला दिला. कारमॅकही लगेच तयार झाला आणि त्याने Skookum Jim(१) व Tagish Charlie सह इच्छित स्थळी पोचण्याचं आश्वासन दिलं.

     हेंडरसन, कारमॅकशी व्यवहार करायला तयार होता पण त्याने Skookum Jim व Tagish Charlie यांच्याशी व्यवहार करायचे स्प्ष्टपणे नाकारले. त्याकाळी अनेक शोधकर्ते स्थानिक लोकांशी व्यवहार करायचे टाळत असत. त्यांच्या मते स्थानिक लोक Prospectors नव्हेत. कारमॅकला हा अपमान वाटला व त्याने हेंडरसनचा प्रस्ताव धुडकावून लावला. साधारण तीन आठवड्यांनी कारमॅक,Skookum Jim आणि Tagish Charlie पुन्हा एकदा हेंडरसनला भेटले. यावेळी त्याच्याजवळची अत्यल्प सामुग्री पाहून Skookum Jim आणि Tagish Charlie ने त्याला आवश्याक सामुग्री व तंबाकू देऊ केला. पण हेंडसन बधला नाही. तिघांनी रिकाम्या हाताने परतीचा प्रवास सुरू केला.

--हेमांगी के
(May 12, 2013)
------------------

(क्रमशः)--
--------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.11.2022-बुधवार.