मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-17-क्लोंडायक गोल्ड रश - भाग २--B

Started by Atul Kaviraje, November 24, 2022, 09:05:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-17
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "क्लोंडायक गोल्ड रश - भाग २-B"

                           क्लोंडायक गोल्ड रश - भाग २--B--
                          ------------------------------

     परतत असतांना भुकेल्या पोटासाठी काहीतरी शिकार मिळवण्याच्या उद्देशाने Skookum Jim पुढे निघाला. त्याला वाटेत हरिणाची शिकार मिळाली बाकी दोघे मागून येईपर्यंत जेवण शिजवण्यासाठी पाणी आणायला तो क्लोंडायक नदीच्या पात्रात उतरला आणि आश्चर्य घडलं. संपूर्ण परगण्यात आजवर कोणालाही न मिळालेलं, कुणीही न पाहिलेलं इतकं सोनं त्याच्यासमोर होतं. पुढचे दोन दिवस अहोरात्र या तिघांनी क्लोंडायक नदीचं पात्र चाळून काढलं. एकट्या Rabbit Creek मध्ये सुमारे चार डॉलर किंमतीच सोनं होतं. कारमॅक या घटनेविषयी म्हणतो "We did a war dance around that pan: a combination Scottish horn-pipe, Indian fox trot, syncopated Irish jig and Siwash hula-hula. "

     सोनं तर सापडलं होतं पण आता या शोधाचं श्रेय घ्यायचं कोणी हा मोठा प्रश्न होता. दावा नोंदवण्यामधेच खरी मेख लपलेली होती. खरंतर Skookum Jim ला सर्वात आधी ते सापडलं होतं. हा शोध ज्याच्या नावावर नोंदवला जाईल त्याला शोधकर्ता म्हणून श्रेय व हिस्सा मिळेलच पण अजून एक अतिरिक्त हिस्सा मिळणार होता तर इतरांना फक्त एक हिस्सा मिळणार होता. हा शोध कोणाच्या नावावर नोंदवायचा यावरून Skookum Jim व कारमॅकमध्ये मतभेद झाले. सरतेशेवटी, Skookum Jim हा स्थानिक रहिवासी असल्या कारणाने त्याला असा दावा मांडता येणार नाही असा युक्तिवाद कारमॅकने केला व १७ ओगस्ट १८९६ साली जॉर्ज करमॅक हे नाव शोधकर्ता म्हणून नोंदवले गेलं. Skookum Jim आणि Tagish Charlie या दोघांबरोबर त्याने आपला हिस्सा वाटून घेतला. कारमॅकला ज्या ठिकाणी सोनं सापडलं त्या 'Rabbit Creek' चं नामकरण त्याने 'Bonanza Creek' असं केलं.

     ही खबर वणव्यासारखी संपूर्ण युकान प्रांतात पसरली आणि अनेकांनी क्लोंडायक नदीच्या आसपास खोदकाम सुरू केलं. या शोधाने युकान खोऱ्याचा चेहरामोहरा पालटला. सुरवातीच्या काळात अनेक खाणमालकांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं, पण त्याचवेळी अनेकजण आतातयीपणामुळे राजाचे रंकही झाले. सप्टेंबर १८९६ पर्यंत खोदकामासाठी जवळजवळ दोनशे दावे नोंदवण्यात आले होते तर जवळपास दीडशे दावे प्रक्रियेत होते. एखाद्या भागाचा दावा नोंदवणे म्हणजेच सार्वजनिक भागाचा खाणकामासाठी परवानगी मिळवणे. त्याकाळी या भागात दावा नोंदवण्यासाठी पहिल्या वर्षी १५ डॉलर शुल्क होता. पुढील प्रत्येक वर्षासाठी तो वाढवून १०० डॉलर एवढा आकारला जाई.

     जॉर्ज कारमॅकच्या शोधानंतर युकान भागत सोनं सापडल्याच्या अनेक कथा पसरत होत्या. त्यातलीच थॉमस यिप्पीची. थॉमस यिप्पी सिअ‍ॅट्ल YMCA मधली नोकरी सोडून सोनं मिळण्याच्या आशेवर युकानमधे बायकोसोबत आलेला. त्याने एल दोरादोच्या खाडीत ३६ क्रमांकावर बोली लावली होती. एल दोरादो (El Dorado) या स्पॅनिश शब्दाचा अर्थचं मुळी सोनं. या जागेत प्रचंड प्रमाणात सोनं होतं. पण थॉमसच्या बायकोला हवी होती स्वतंत्र खोली. नाईलाजाने थॉमसने ३६ क्रमांकाची बोली सोडून १६ नंबरवर बोली लावली, जी आधीच काही लोकांनी सोडून दिली होती. ही बोली लावयचं कारणही एकच त्याला खोली बांधायला लाकूडफाटा उपलब्ध होता आणि थोड्याच दिवसात थॉमसचं नशीब पालटलं. १६ क्रमांकामधून त्याने कमवले तब्बल १५३०००० डॉलर्स !

     दारुच्या नशेत चार्ली अंडरसनने २९ क्रमांकावर बोली लावण्यासाठी ८०० डॉलर दिले. सकाळी जेव्हा शुद्ध आल्यावर त्याला जेव्हा आपली चूक उमगली तेव्हा पैसे परत मागायला गेला. अर्थातच पैसे काही परत मिळणार नव्हते. चार्ली आपल्या कर्माला दोष देत असतांनाच त्या जागेत जवळजवळ १२५०००० डॉलर्स किंमतीचं सोनं निघालं.

     कारमॅकला ज्या डोंगराच्या पायथ्याशी सोनं गवसलं त्याच डोंगराच्या उलट्या बाजूला हेंडरसन काम करत होता पण आपल्या हाताला एवढं मोठं घबाड लागल्याचा मागमूस ही कारमॅकने त्याला लागू दिला नाही आणि जेव्हा त्याला ही खबर लागली तोवर फार उशीर झाला होता. बरेचसे हक्क विकले गेले होते. या गोष्टीसाठी हेंडरसनने कारमॅकला कधीही माफ केलं नाही. हेंडरसनला नशिबाने फारशी साथ दिली नाही. पुढे कंटाळून हेंडरसनने आपला 'Gold Bottom' चा भाग तीन हजार डॉलर्सला विकून टाकला. पुढे त्याच जमिनीतून ६५०००० डॉलर्सचं सोनं निघालं.

     अत्यल्प प्रसामाध्यामांच्या त्या काळात कारमॅकच्या शोधाची बातमी अलास्का व युकानाच्या बाहेर पोचण्यासाठी बराच काळ जावा लागला. पण जेव्हा ही बातमी बाहेर पडली तेव्हा बेकारी, गरिबीने पिचलेल्या अमेरिकन जनतेला एक आशेचा किरण सापडला होता. त्यातल्या अनेकांना युकान, अलास्काच काय किंवा क्लोंडायक काय, नक्की कुठे आहे याचीही साधी कल्पनाही नव्हती.

युकान होता कॅनडाचा भाग.
अलास्का व युकानला क्लोंडायक नदीचा वेढा होता आणि
अलास्का जरी अमेरीकेच्या ताब्यात आलं असलं तरी कॅनडा व अमेरिकेमधल्या त्याच्या सीमारेषा अजून धूसरच होत्या.
पण या सर्वाची पर्वा होती कोणाला? सोन्याच्या सट्ट्यावर आपलं आयुष्य, घरदार अक्षरश: पणाला लावलेली सिअ‍ॅट्ल बंदरातली गर्दी आवरणं आता कुणालाच शक्य नव्हतं.

--हेमांगी के
(May 12, 2013)
------------------

(समाप्त)--
--------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2022-गुरुवार.