मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-18-बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड-1

Started by Atul Kaviraje, November 25, 2022, 09:28:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-18
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड"

                    बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड--क्रमांक-१--
                   --------------------------------------------------

     कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

     आता आम्ही निघालो होतो आमच्या स्वप्नवत ट्रेक च्या दुसऱ्या टप्प्यात. मुल्हेर किल्ला.

     सकाळी ६ वाजता चहा घेऊन आम्ही पोहोचलो शुक्ल काकांकडे, दुपारचा डबा घ्यायला. रात्रीच सांगून ठेवला असल्याने डबा तयारच होता. तो घेऊन स्वारी निघाली मुल्हेरच्या किल्ल्याच्या दिशेने.

     मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे. सकाळी सकाळी आल्हाददायक हवा आणि स्वच्छ वातावरण. सगळीकडे शांतता पसरलेली, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिंचांनी डवरलेली झाडे, पक्ष्यांचा मुक्त वावर, गावातल्या बायकांची पाण्यासाठीची पळापळ तर काही "अड्ड्यांवर" गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या गप्पा टप्पा, मुलांची शाळेत जायची लगबग, तर दुकानदारांचे दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून दिवसाची जय्यत तयारी. सगळे अनुभवत आम्ही गावाच्या बाहेर येऊन किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.

     किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती काढलेलीच होती. किल्ल्यावर विविध प्रकारची झाडे सापडतात असे ऐकले होते. काटेरी , औषधी, खाज येणारी, विषारी, रक्त गोठवणारी झाडे. किल्ल्याची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था हि चोख होती. ७ दरवाजे एका बाजूने चढताना लागणार होते. तर मोरागडावर ३ दरवाजे. पायथ्यापासून निघणाऱ्या वाटा मुल्हेर माचीकडून तर दुसरी थेट मोरागडावर जाणारी होती. या सगळ्या माहितीने आमची उत्सुकता वाढली तसे आमच्या पावलांचा वेगही वाढला.

                     ऐतिहासिक संदर्भ :--

     मुल्हेर चा उल्लेख रत्नपूर म्हणून महाभारतात आढळतो.हि राजा मयुरध्वज याची राजधानी होती.त्यामुळे गावाला मयुरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले.फार काळापूर्वी येथे नाईक आणि भिल्ल सत्ता होती. इ. स. १०२९ काळात यादव घराण्याची सत्ता आली. पुढे १३०८ मध्ये कनोज येथील राठोड बागुल यांनी येथील सत्ता काबीज करून या प्रांताला बागलाण असे नाव दिले. पुढे ३५० वर्षे त्यांची सत्ता चालली. इ.स. १६३८ रोजी वैभवशाली हिंदूंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली.औरंगजेबाने येथील सत्ता घेतल्यावर किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेर ही बागलणची परंपरागत राजधानी होती म्हणून मुल्हेरजवळ 'ताहीर' नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद/ताहाराबाद असे नामकरण झाले. नंतर ४० वर्षांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेताना मुघल साम्राज्याचा पाडाव करून शिवाजींनी अमाप दौलत मिळवली . पुढे ब्रिटिशांनी हा प्रांत विभाजन करून सटाणा हे बागलाण चे मध्यवर्ती जिल्हा ठिकाण केले.

     प्राचीन काळातील सोमेश्वर मंदिर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असून त्याचा गाभारा हा पाताळात आहे. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. अशी अनेक मंदिरे आणि स्थापत्य कलेचे आविष्कार देशोधडीला लागले आहेत.

                      भौगोलिक संदर्भ :--

     मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात.
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५ किमी अंतर आहे.
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी साधन आहेत.
शेती मोठ्या प्रमाणावर चालत असून भात, ऊस आणि इतर हंगामी पिके घेतली जातात.

--सागर
-------
(May 9, 2013)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.11.2022-शुक्रवार.