मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-20-बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड-3

Started by Atul Kaviraje, November 27, 2022, 09:16:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-20
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड"

                 बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड--क्रमांक-3--
                --------------------------------------------------

                  गणेश मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब

     थोडा वेळ फोटो काढण्यात घालवून आम्ही रस्ता सोडून या मंदिराकडे निघालो. मंदिराच्या आत मध्ये अत्यंत सुरेख असे कोरीवकाम आणि रचना केली होती. मंदिराच्या दर्शनी भागात चक्र कोरलेले होते. ते अजूनही तेवढेच स्पष्ट आहे की त्याच्या प्रत्येक आर्र्या दिसू शकतात. काही भाग ढासळून पाण्यात पडलेला आहे. समोरील तलावातील पाणीही प्रतिबिंब दिसेल एवढे स्वच्छ आहे. मोठे मोठे दगड एकमेकांमध्ये गुंफून या मंदिराची रचना केलेली वाटली. पूर्ण मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरीवकाम केले होते. १४०० साली जेव्हा गाव किल्ल्यामध्येच वसलेले होते तेव्हा हे गावातील मंदिर होते.

     गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत मंदिराचे स्थापत्यकला बघायला लागलो. पूर्ण मंदिरात आवाज घुमत होता. जरासे ऊन आल्याने फोटो साठी उपयुक्त रंगसंगती जुळून आली.

     हे मंदिराचे छत घुमटाकार आकाराचे होते. एकावर एक रचलेल्या दगडांनी ते जास्तच आकर्षक दिसत होते.

     पूर्वीच्या काळी युद्धात मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंदिरे नष्ट केली जात असत. हा घुमट हा अश्या पद्धतीने बांधला आहे की घुमटा मधील मधला दगड काढला की आपोआप घुमट पडून जाईल. आता मन आणि डोळे भरून मंदिराचे सौंदर्य पाहून परत बाहेर आलो. मंदिराच्या मागे हरगडा ने दर्शन दिले.

     येथून आता किल्ला दृष्टिपथात आला होता. तरीही किल्ला एवढा अजस्त्र आहे की एकाच फोटोत पूर्ण येणे अवघड आहे.

     तेथून लगेच उजवीकडचा रस्ता पकडून निघालो ते १४०० सालचे पाताळातील सोमेश्वर मंदिर बघायला. १४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो.

     मंदिरामध्ये प्रवेश करताच मोठ्या कमानी च्या अगदी मधोमध असलेला पुरुषभर उंचीचा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. पूर्णतः दगडात कोरलेला हा नंदी असून त्याच्या पुढेच दगडात कोरलेले कासव दिसते. आज पर्यंत कोणत्याही मंदिरात मी नंदी आणि कासव एकत्र पाहिलेले आठवत नाही. हे कासव जरा वेगळे होते.

     मंदिराच्या बाहेरच पादुकांचे दर्शन झाले. लाकडी पादुका होत्या. अश्या लाकडी पादुका घालून अश्या दुर्गम भागात कोण महाभाग आला असावा याने आमची उत्सुकता वाढली.

     मंदिरातून सहज वर बघितले तर डेस्टिनेशन आम्हाला खुणावत होते. अजून एवढे चढायचे आहे या विचाराने आताचं जीव मेटाकुटीला आला.

     सोमेश्वर मंदिर हे पूर्णतः भुयारात आहे. याला पाताळी मंदिर पण म्हणतात. नंदीपासून सरळ जाऊन आम्ही साहजिकच हात जोडले तर पुढे देवच नाही. नुसती भिंत उभी. डावीकडे पहिले तर छोट्या पायऱ्या खाली भुयारात जात होत्या.

     आता मोबाईल चे दिवे पेटवले आणि अंधारात चाचपडत जात राहिलो. मंदिराचा गाभा पाताळात असल्याचे ऐकले होते पण प्रथमच पाहत होतो. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. म्हणून हि रचना होती असे कळले.

     खालून वर बघितले तर वरच्या खिडकीतून नंदी दिसत होता. काय मस्त रचना केली होती बांधणाऱ्या कलाकाराने.

     आत हे पुजारी काका पिंडेची पूजा करण्यात मग्न होते. त्यांचा जप मंदिरामध्ये घुमत होता. आम्ही इतके सुदैवी होतो की, रोज सकाळी सात ला होणारी पूजा आज पुजारीकाका बदलून आल्याने साडे नऊ ला होत होती. आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि पूजा चालू झाली. म्हटले हि देवाचीच इच्छा असावी. त्यानंतर पुजारी काकांनी शंख हातात घेतला आणि ३ वेळा तो असाकाही वाजवला की, रामानंद सागर च्या सीरियल मध्ये देव आला की जसे सप्त वाद्यांचे संगीत चालू होते तसे वाटले. हात आपोआप जोडले गेले.

--सागर
-------
(May 9, 2013)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.11.2022-रविवार.