मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-21-बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड-4

Started by Atul Kaviraje, November 28, 2022, 09:21:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-21
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड"

                  बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड--क्रमांक-4--
                 --------------------------------------------------

     पहिल्यांदा वाजवलेला शंख गाभाऱ्यात घुमू लागला तोच दुसरा त्यापेक्षा तीव्र असा ध्वनी त्याला भेदून जात होता. जे काही पाहिलं आणि ऐकले ते केवळ अद्भुत होते.
पूजा झाल्यावर बाहेर येऊन फोटोग्राफी चालू केली. मंदिराबाहेरच मोठी पिंड आणि शेंदूर लावलेली गणपती मूर्ती दृष्टीस पडले.

     सोमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला साफ सफाई चे काम चालू होते. मालेगाव चा एक ग्रुप ते डागडुजीचे काम करत होता. ते मंदिरामध्येच मुक्कामी होते. ( त्यामुळेच मंदिर अफाट गचाळ झाले होते. सगळी कडे अंथरूण, कपडे, खाण्याचे पदार्थ). बराच वेळ घालवल्यानंतर घड्याळाकडे लक्ष गेले. पाहतो तर काय दहा वाजत आले होते आणि अजून आम्ही पायथ्याशीच होतो. आता आमची पळापळ चालू झाली. किल्ला चढायला ४-५ तास लागतील या हिशोबाने चढाई चालू झाली. सोमेश्वर सोडून उजवी वाट ठरली आणि मोती टाक्यांपाशी पोहोचलो. मोती टाक्यांवरून वरती उजवीकडे जायचे असे माहीत होते. पण येथून पुढे रस्ताच सापडेनासा झाला. प्रत्येक ट्रेकला जाताना आधी एकदा वाट चुकून अतिरिक्त पायपीट झालीच पाहिजे असे बहुतेक आमच्या कुंडलीत लिहूनच ठेवले असावे.

     येथून पुढे रस्ताच सापडला नाही. येथून अनेक वाट फुटत होत्या. त्या गुरांच्या वाटा होत्या हे त्या वाटेने जाऊन ती वाट मध्येच संपली की आम्हाला उमगायचे. बराच वेळ तेथेच घुटमळत राहिलो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला मारुती (खालच्या फोटोत )आम्हाला दिसत होता. पण तेथपर्यंत जायचा रस्ता काही केल्या सापडत नव्हता.

     आता वाट फुटेल तिकडे आम्ही जात होतो. कॅमेरे ठेवून दिले आणि झाडे तोडत, घसरत आम्ही जागा मिळेल तेथे मुसंडी मारत होतो. आता किल्ल्यावरील झाडांची विविधता आमच्या लक्षात आलीच होती. त्या विविध प्रकारच्या झाडांना आपण भेटूनच आलोय असे शरीराचे हाल व्हायला लागले. काटेरी झाडांनी हात पायाचे चुंबन घेऊन रक्तवर्णीय नक्षी काढलीच होती. खाजरी झाडे त्या रक्तातूनच "खाज" करीत होती. काट्या कुट्यातून जाऊन दोन्ही हात, दंड ओरखडे उठून रक्ताने लाल झाले होते. चेहऱ्यावर टर्मिनेटर मधल्या अर्नोल्डसारख्या कापल्याच्या खरचटल्याच्या खुणा. :)

     शेवटी पाण्याचा मार्ग पकडला आणि बरेच वर चढून गेलो. पण तेथूनही मार्ग सापडेना म्हणून परत फिरलो. उतरताना मात्र घसरतच उतरावे लागले. इतकी वाईट हालत झाली की चालताही येईना आणि सांगताही येईना :)

     जाताना वाटेत आम्ही अजून दोन टाकी आणि एका गुहेचा शोध लावला असावा, कारण या टाक्यांबद्दल कुठेच वाचलेले नव्हते . तसेच उल्लेख हि नव्हता. बळेच २ तास हिंडून आम्ही माहीत नसलेल्या वास्तू हि पाहून घेतल्या. वाट चुकल्याचा निदान एवढा तरी उपयोग झाला :)

     आता १२ वाजून गेले होते आणि आम्ही अजून पायथ्याशीच होतो. आता पेशन्स संपला होता. आता कधी किल्ला चढणार आणि उतरणार असे वाटू लागले होते. तरी बरे कि मुल्हेर ची चढण हि साल्हेर, सालोटा प्रमाणे पश्चिमेकडूनच असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. सरळ परत उतरून सोमेश्वर मंदिर गाठले. तेथील पुजारीकाकाना विचारले पण त्यांना कमी ऐकू येत असल्याने आम्ही काय म्हणतोय हेच त्यांना कळत नव्हते. शेवटी ते पण आमच्याबरोबर निघाले. मोती टाक्यांपर्यंत येऊन त्यांनी पुढे आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही वर जोपर्यंत ते तेथेच थांबले होते.

     आता साडे बारा झाले होते. आता आम्ही पळतच सुटलो होतो. कॅमेरे ठेवूनच दिले होते. पोटात आग पडली होती, तरी वर पोहोचल्यावरच जेवायचे असा निर्धार करून पळू लागलो.

     काही वेळातच मुख दरवाजा दिसला आणि जर हायसे वाटले. सात दरवाजे तेही ओळीने, एका-आड-एक पाहून सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा असावा हे लक्षात आले.

--सागर
-------
(May 9, 2013)
----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.11.2022-सोमवार.