मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-26-भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 3/3)-1-

Started by Atul Kaviraje, December 03, 2022, 10:05:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-26
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 3/3)"

                भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 3/3)-क्रमांक-१--
               -------------------------------------------------

                   इलेक्ट्रॉनिक झेड् नोज--

     दहशतवाद्यांच्या दुष्कृत्यामुळे जनसामान्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी CCTV यंत्रणा बसवत आहे. एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन, प्रेक्षणीय ठिकाणं, मोठमोठे हॉटेल्स इत्यादीसाठी कडक सुरक्षा यंत्रणा राबवली जात आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु सक्षम यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ लागते व सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळही लागतो. एअरपोर्टवर चेकिंगसाठी 2-3 तास अगोदर पोचावे लागते. त्यामुळे बहुतेक जण वैतागतात. अनेकांना ही सुरक्षा यंत्रणा म्हणजे भीक नको, कुत्रा आवर असे वाटत आहे. एअरपोर्टवरच्या सुरक्षिततेसाठी लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा साठा वासावरून ओळखणाऱ्या प्रशिक्षित कुत्र्यांचा ताफा बघितल्यावर प्रवासी घाबरून जातात.

     यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रॉनिक नोजची कल्पना पुढे आली. ही यंत्रणा दहशतवादी कृत्य करण्यात वापरण्यात येणाऱ्या गुप्तपणे ठेवलेल्या स्फोटकांचा अंदाज घेऊन संशयिताकडे निर्देश करू शकते. खरे पाहता ही संकल्पना फार पूर्वीची आहे. त्यावेळी याची मांडणी करणाऱ्यांना मूर्खात काढले होते हेही तितकेच सत्य आहे. अन्न पदार्थांची गुणवत्ता शोधण्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक नोजचा सर्रासपणे वापर केला जातो. परंतु ही य़ंत्रणा आकाराने मोठी व अत्यंत खर्चिक आहे म्हणून स्फोटकासाठी वापरता आली नाही. यासंबंधातील अनेक पेटंट्स पडून आहेत.

     उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी काही निमित्त लागते. 1912 साली टायटानिक बोट बुडाल्यानंतर जहाजांच्या सुरक्षिततेसाठी उपाय सुचवणाऱ्या पेटंट्सची संख्या कमी नव्हती. हिमनगांना फोडणारी कल्पना, जहाजातून काही क्षणात बाहेर पडण्यासाठीचे चित्र विचित्र उपायांची संख्याही कमी नव्हती. 9/11च्या भीषण अपघातानंतरसुद्धा अशाच प्रकारच्या कल्पना लढवलेल्या पेटंट्सचा पाऊस पडला होता. वैमानिक असलेल्या फ्लाइट डेकपासून पॅसेंजर कॅबिनला काही सेकंदातच वेगळी करण्याची कल्पना एका पेटंटची होती!

     झेड् नोज हे कॅलिफोर्निया येथील इलेक्ट्रॉनिक सेन्सार टेक्नालॉजी या कंपनीचे उत्पादन आहे. एखाद्या पदार्थाच्या वासावरून पदार्थातील रासायनिक रचनेचे विश्लेषण करणे व या विश्लेषणातून धोका ओळखून संबंधितांना जागृत करणे या ठळक गोष्टींचा यात समावेश आहे. छोट्या बॅगेत मावणारी व सेंद्रीय, जैविक वा रासायनिक पदार्थांची कमीत कमी वेळेत विश्लेषण करू शकणारी त्यांची ही यंत्रणा आहे. ही यंत्रणा 10 सेकंदात पदार्थाबद्दलची सर्व माहिती गोळा करून विश्लेषण करू शकते. या यंत्रणेत एका चिप् वर सेन्सार्स व प्रोसेसर्स बसवून संगणकाशी जोडलेले आहेत. सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विश्लेषण करून स्फोटकं असल्यास धोक्याचा इशारा देण्याची सोय यात आहे. वजन कमीत कमी ठेवल्यामुळे सहजपणे कुठेही नेता येते. कार्गो वा गोडाऊनमध्ये झाकून ठेवलेल्या वा डबाबंद वस्तूंचीसुद्धा ही यंत्रणा शोध घेऊ शकते. कंपनीच्या मते या यंत्रणेत काही बदल करून क्षय वा एड्स सारख्या रुग्णांचीसुद्धा निदान करणे शक्य होणार आहे.

     कंपनीने दावे केल्याप्रमाणे झेड् नोज खरोखरच काम करू शकेल की नाही हे काळच ठरवू शकेल!

--प्रभाकर नानावटी
(May 6, 2013)
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.12.2022-शनिवार.