मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-34-वसईच्या घंटेचा शोध

Started by Atul Kaviraje, December 11, 2022, 09:31:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-34
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वसईच्या घंटेचा शोध"

                                 वसईच्या घंटेचा शोध--
                                ------------------

                   वसईचा किल्ला (Vasai Fort)--

     आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.

     छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.

     ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते. चिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा ... अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा. तसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो .

     सकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.

मग भूषणचा फोन आला,
"कुठे आहेस ? मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. "
"प्लाटफोर्म वर कुठे?"
"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे."
असे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.
मग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.

     साडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो. सव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती. आता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पालिकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की, "तसे नाहीये, "या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. "

--सागर
--सुज्ञ माणुस
(April 25, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2022-रविवार.