मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-37-वसईच्या घंटेचा शोध

Started by Atul Kaviraje, December 14, 2022, 09:36:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-37
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वसईच्या घंटेचा शोध"

                                 वसईच्या घंटेचा शोध--
                                ------------------

     मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते.

     पूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.

     सगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या स्थितीत होते.

     दर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.

     या पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.

     जवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो.

     चिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता.

     चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.

     काही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.

     किल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.

     1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.

     बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.

     आजही या तीन घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल. तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. या तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो.

--सागर
--सुज्ञ माणुस
(April 25, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.12.2022-बुधवार.