मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-39-भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)-

Started by Atul Kaviraje, December 16, 2022, 09:03:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-39
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)"

                   भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)--
                  ---------------------------------------- 

                     इलेक्ट्रिक गो-सायकल--

     सायकलीच्या इतिहासाची पाने उलटल्यास 1818 ते 1885 पर्यंतच्या काळात सायकली टप्प्या- टप्प्याने विकसित होत गेल्या व आधुनिक म्हणवून घेणारी रोव्हर सायकल1885 साली बाजारात आली व हे मॉडेल पुढील शंभरेक वर्षे टिकून होती. गेल्या 20 -30 वर्षात computer aided model, कमी वजनाच्या परंतु दणकट अशा धातू - अधातू वापरून सायकलींचे उत्पादन झाले.स्टीअरिंग, ब्रेक्स, ट्यूब - टायर्समध्ये भरपूर सुधारणा झाल्या. शॉक अब्सॉर्बर्स बसवण्यात आल्या. वेग नियंत्रण व संवेग यांचा ताळमेळ राखण्यासाठी सायकलींच्या मूळ फ्रेममध्ये सूक्त बदल करण्यात आले. शारीरिक श्रम कमी करणाऱ्या गीअर्ड सायकली आल्या. कारमध्ये मावणाऱ्या फोल्डेबल सायकली आल्या. व याचाच पुढचा टप्पा म्हणजे शारीरिक श्रमाऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर करणाऱ्या मोटाराइज्ड - इ - सायकली आल्या (व येत आहेत).

     मुळात मोटराइज्ड सायकलीसाठीचे पहिले पेटंट 1895 साली घेण्यात आले होते. 1897च्या अजून एका पेटंटमध्ये दोन मोटर्स वापरण्याचा प्रस्ताव होता. पुढील 100 वर्षानंतर याच पेटंटचा वापर करून 1990 साली काही इ - सायकलींचे उत्पादन करण्यात आले. 30 - 40 वर्षापूर्वी पुण्यातसुद्धा काही उत्साही उद्योजकांनी मोटराइज्ड सायकलींचे प्रयोग करून स्कूटरला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेले काहींना आठवतही असेल. परंतु त्यात डिजाइनचा मागमूसही नव्हता. वापरण्यास त्रासदायक, खर्चिक व देखभालीसाठी किचकट असलेल्या या 'गरीबांच्या बाइक्स' कुठे धूळ खात पडल्या हे कळलेच नाही.

     खरे पाहता सायकलीचा वापर मुख्यत्वेकरून कमी अंतरावर असलेल्या कामाच्या ठिकाणी ये - जा करण्यासाठी होतो. यात थोडा फार शारीरिक श्रम व थोडासा वेळ गेला तरी चालण्यासारखा असतो. परंतु प्रचंड शक्तीचे बाइक्स व स्कूटर्स रस्त्यावर पळू लागल्यामुळे सायकलींचा वापर हळू हळू कमी होऊ लागला. आता सायकली फक्त हौस म्हणून, छंद जोपासण्यासाठी गंमत म्हणून, व्यायामासाठी म्हणून 15 -20 वर्षांच्या मुलामुलींच्या हातात दिसतात. कार्स व बाइक्स-स्कूटर्समुळे शहरातील बहुतेक रस्ते त्यांच्या हवाली केल्यासारख्या झाल्या आहेत. सायकलस्वाराच्या सुरक्षिततेची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. ऊर्जाबचत वा प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत याचा तोंडदाखल्या देखाव्यासाठी काही थातुर मातुर उपाय म्हणून काही शहरात सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स आहेत. परंतु त्याचा वापर बहुतेक ठिकाणी पार्किंगच्या सोयीसाठी होत असते. प्रशासनाला खरोखरच यासाठी काही करायचे असल्यास BRTS साठी ठेवल्याप्रमाणे मुख्य रस्त्याचा काही भाग सायकलीसाठी राखीव ठेवायला हवे. परंतु कार व बाइक्स कंपन्यांचे हित जपणारे प्रशासन अशा सूचनांना केराची टोपली दाखवेल.

     इ(लेक्ट्रिक)सायकलीसाठींची सर्वात मोठी अडचण ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची आहे. बघता बघता बॅटरी ड्रेन होत असल्यामुळे पॅडल मारत सायकल हाकण्याचा प्रसंग सायकलस्वारावर येतो. सायकलीच्या पुढच्या चाकाच्या हबवर मोटर बसवल्यास पुढच्या चाकाचे वजन वाढते. पंक्चर काढताना अडचणी येतात. गीअर्स बसवल्यास चाक जोडताना/काढताना भरपूर वेळ जातो. काही वेळा मोटराइज्ड सायकलीसाठी पुढील चाकाचा व्यास मोठा ठेवावा लागतो. डिस्क ब्रेक मोटर हबवर बसत नाहीत. अशा प्रकारे इ - सायकलीच्या अडचणीचा पाढा आणखी वाढवता येईल. म्हणूनच स्कूटरमधील स्टेपनीच्या चाकासारखे याचेही अजून एक चाक सांभाळावे की काय असा प्रश्न उभा राहतो.

     तरीसुद्धा मोटराइज्ड सायकलींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या जगभर पसरल्या आहेत. यासंबंधात गो-सायकलीने केलेली प्रगती आश्चर्यकारक ठरेल. रिचर्ड थॉर्प या रेस कार्सच्या डिझायनरने 2004 साली फोल्डेबल सायकलीचे पेटंट घेतले व 2007 साली इ-सायकलीचे पेटंट घेऊन उत्पादन सुरू केले. गो-सायकलने इ-सायकलीच्या बहुतेक उणीवावर मात केली आहे असा उत्पादकांचा दावा आहे. पूर्ण चार्ज केलेली बॅटरी 25 कि.मी अंतरासाठी पुरेसे ठरते. बॅटरी 3 तास रिचार्जविना चालू शकते. रिचार्जसाठी कमी ऊर्जा लागते. (100 वॅटचा बल्ब 2 तास वापरल्यास लागणाऱ्या ऊर्जेइतकी) सायकल ताशी 20 कि.मी वेगाने पळू शकते. सायकलीची घडी करता येत असल्यामुळे कार्सच्या डिकीत ठेवता येते. सायकलीचा सांगाडा मॅग्नेशियम अ‍ॅलाय वापरल्यामुळे वजन हलके झाले आहे . (फक्त 16 किलो) पुढच्या चाकासाठी single leg front fork वापरल्यामुळे जोडणीस वेळ कमी लागतो. सायकलीचे हॅंडल, कारमधील डॅशबोर्डसारखे वेग, गीअर्सची स्थिती, बॅटरीतील ऊर्जा इत्यादी सर्व माहिती देते. इलेक्ट्रॉनिक्स वापरून एका क्लिकने गीअर बदलता येते.

     श्रीमंत राष्ट्रातच याची किंमत न परवडण्याइतकी असल्यामुळे आपल्या देशात ही सायकल यायला बराच काळ लागेल.

--प्रभाकर नानावटी
(April 22, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.12.2022-शुक्रवार.