मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-41-लिनक्स विषयी थोडेसे-1-अ-

Started by Atul Kaviraje, December 18, 2022, 09:32:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-41
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिनक्स विषयी थोडेसे"

                             लिनक्स विषयी थोडेसे-1--अ--
                            --------------------------

     उबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. या लेखात लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.

     लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे आहे.

     ज्यावेळी संगणक क्षेत्रात घडवल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्मितीची केवळ दामदुप्पटच नव्हे तर कैक पट वसुली करण्याची पद्धत होती, त्यावेळी मुळच्या फिनलंडच्या आणि नंतर अमेरिकास्थित लिनस टोरवाल्ड्स या संगणक तज्ञाने मोठ्या संगणकावर वापरल्या जाणाऱ्या युनिक्स या कार्यप्रणाली सारखी ताकदवान आणि तिच्याशी नाते सांगणारी नवी प्रणाली व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली.... खरे तर त्याचा गाभा तयार केला. आणि इंटरनेट वरून तो इतरांसाठी खुला केला. जगभर पसरलेल्या संगणक तज्ञांना तो आवडला. नंतर त्यांनी त्या गाभ्यावर अवलंबून अशी कार्यकारी प्रणाली जन्माला घातली. वाढवली. आता या बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे.

     त्याही आधी रिचर्ड एम्. स्टॉलमन या संगणकतज्ञाने असा विचार मांडला की प्रत्येक संगणक प्रणाली मुक्त असायलाच हवी. हा विचार त्याने मग त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फौंडेशन या संस्थेमार्फत जगभर पसरवला. या विचारांमधील मूळ तत्व असे की प्रत्येक प्रणाली व त्यातील प्रोग्राम्स सर्वांना वाचण्यासाठी, कॉपी करण्यासाठी , वापरण्यासाठी आणि बदल करून सुधारणा करण्यासाठी खुले असायलाच हवेत. हा खुलेपणा-स्वातंत्र्य ' फ्री ' या शब्दात अभिप्रेत आहे.

     तलवारी पेक्षा तराजू बरा या न्यायाने नवनिर्मिती, उत्पादन व विक्री याचा वापर इतरांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे तंत्र, यंत्रसंस्कृतीने रुजविले आणि बाजाराचे रूपांतर रणांगणात केले. अशा काळात उत्पादनाच्या वापरकर्त्याला ते उत्पादन बनवण्याची प्रक्रिया सांगून टाकून, त्याची इच्छा आणि कुवत असेल तर त्या उत्पादनात बदल, सुधारणा करण्याचे स्वातंत्ऱ्य देणारे हे तत्वज्ञान स्टॉलमन यांनी मांडले. ज्या बाजारात एखादी वस्तू विकताना किंवा विकण्यासाठी दुसरी वस्तू फ्री म्हणजे फुकट देणारी फसवी युक्ती वापरली गेली, तिथेच फ्री या शब्दाचा दुसरा अर्थ – स्वातंत्र्य , निदान संगणकाच्या क्षेत्रात तरी प्रत्यक्षात आला आहे.

     लिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण याचा नेमका अर्थ काय हे नीट समजून घेऊया. त्यासाठी संगणकीय क्षेत्रातल्या काही पारिभाषिक संज्ञांचा परीचय करून घ्यावा लागेल.

--प्रसाद मेहेंदळे
(April 12, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2022-रविवार.